सलमान खान ‘ओटीटी’वर का इतका चिडलाय?

By मनोज गडनीस | Published: April 12, 2023 06:03 AM2023-04-12T06:03:26+5:302023-04-12T06:03:49+5:30

मनोरंजनाच्या बाबतीत आजही ‘कुटुंबवत्सल’ असलेल्या भारतीय समाजात ओटीटीच्या प्रायव्हसीची व्याख्या रूजण्यास वेळ लागेल, हेच खरे!

Why is Salman Khan so angry on OTT | सलमान खान ‘ओटीटी’वर का इतका चिडलाय?

सलमान खान ‘ओटीटी’वर का इतका चिडलाय?

googlenewsNext

मनोज गडनीस
विशेष प्रतिनिधी, लोकमत, मुंबई

मनोरंजनाच्या बाबतीत आजही ‘कुटुंबवत्सल’ असलेल्या भारतीय समाजात ओटीटीच्या प्रायव्हसीची व्याख्या रूजण्यास वेळ लागेल, हेच खरे!

ओटीटीवरून प्रसारित होणाऱ्या वेबसिरीज, चित्रपट अशा कन्टेंटद्वारे मोठ्या प्रमाणावर अश्लीलता, नग्नता, शिवीगाळ प्रसारित होते. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण हवे, अशी जाहीर भूमिका प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने अलीकडेच एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली. अर्थात, अशी भूमिका मांडणारा सलमान खान हा पहिला अभिनेता नाही. यापूर्वीदेखील या मुद्द्यांवर अनेकांनी आपापली मत-मतांतरे प्रदर्शित केली आहेत. मात्र, सिनेसृष्टीत दबदबा असलेल्या दबंग सलमानने ठोसपणे हा मुद्दा मांडल्यामुळे त्यावर चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. 

आजच्या घडीला भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय असे जे ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, त्यावर साधारणत: ७० टक्के कन्टेंट हा आंतरराष्ट्रीय आहे, तर ३० टक्के कन्टेट हा भारतीय आहे, अशी फोड करता येईल. सलमान खानने मांडलेल्या मुद्द्यांत काही प्रमाणात तथ्य आहे. जे ओटीटीवरचे कार्यक्रम सातत्याने पाहतात, ते या मताशी सहमत होतील. एकतर या प्लॅटफॉर्मवरचा परदेशी कन्टेंट  तिथली भौगोलिक, सामाजिक संस्कृती अन् त्यात घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगाने निर्मित होतो. या तुलनेमध्ये  भारतीय कन्टेंटचा विचार केला तर ‘घरातल्या मनोरंजनाच्या’बाबतीत सर्वसाधारण भारतीय प्रेक्षक आजवर सरावलेला होता तो टीव्ही मालिकांना. त्या कायमच कौटुंबिक, भावनाप्रधान अशा चेहऱ्याच्या, अनेकदा आध्यात्मिकही !  मात्र, ओटीटीवर ज्या भारतीय मालिका अथवा सिनेमा दिसतात, त्यामध्ये निर्मात्याचा फोकस हा अश्लीलता, नग्नता, शिविगाळ ठसठशीतपणे अधोरेखित करण्याकडे असल्याचे दिसते. एखाद्या नव्या सिरीजमध्ये जर कथानकाच्या अनुषंगाने काही लैंगिक संबंधांची दृश्ये असली तर त्या सिरीजची जाहिरात करताना नेमकी तीच भडक आणि आंबट दृश्ये टीझर म्हणून रिलीज केली जातात. बहुधा सेक्स, शिवीगाळ हेच ‘विकले’ जाईल, अशी काही निर्मात्यांची धारणा असावी. मात्र, ते तितकेसे खरे नाही. कथानकाची गरज म्हणून जे दाखवयाचे आहे ते नजाकतीने दाखवता येऊ शकते. त्याकरिता सॉफ्ट पॉर्नचाच आधार घ्यायची गरज नाही. 

सलमानने उपस्थित केलेल्या मुद्द्याला आणखी एक किनार आहे. काही किरकोळ अपवाद वगळता बॉलिवूडमधील स्टार मंडळी अजूनही ओटोटीपासून दूर राहिलेली आहेत. सिनेवर्तुळात यासंदर्भात एक तार्किक गॉसिप नेहमीच ऐकायला मिळते. ते असे की, ओटीटीमुळे अनेक लोकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली आहे. आजकाल मोठ्या शहरांतून सिंगल स्क्रीन सिनेमा जवळपास हद्दपार झालेला आहे. त्यांची जागा मॉलमधील मल्टिफ्लेक्सनी घेतली आहे. अशा ठिकाणी चार जणांच्या कुटुंबाला सिनेमा पाहायचा म्हटला तर किमान तीन - साडेतीन हजार रुपयांचा खर्च होतो. हा खर्च करण्यापेक्षा दोन महिने थांबले तर तोच सिनेमा ओटीटीवर पाहायला मिळेल, अशी लोकांची धारणा असते.  तेवढ्याच रकमेमध्ये महत्त्वाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे वर्षाचे पैसे भरले जाऊ शकतात. वैविध्यपूर्ण कन्टेंट वर्षभर , घरबसल्या, हव्या त्या वेळेला पाहता येतो. सलमान खानचा आक्षेप असा आहे की, प्रौढ दृश्ये, अश्लील किंवा शिविगाळ करणारी भाषा आदी मुद्द्यांमुळे ओटीटीवरून प्रसारित होणारा कन्टेंट तुम्ही कुटुंबासोबत एकत्र बसून पाहणे शक्य नाही.  

मात्र, लोकांच्या प्रगल्भतेवर विश्वास ठेवत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ओटीटी माध्यमांनी एकाच सबस्क्रिप्शनच्या पैशात दोन ते तीन लॉगइन प्रेक्षकांना दिलेली असतात. स्मार्ट टीव्हीच नव्हे तर टॅब्लेट, संगणक, मोबाइलच्या माध्यमातून तुम्ही तुमचे वैयक्तिक लॉग-इन वापरूनदेखील त्यावरील कन्टेंट पाहू शकता. त्यामुळे जसा मोबाइल हा ‘वैयक्तिक’, तसाच ‘ओटीटी’देखील वैयक्तिक आहे, असा तर्क या कंपन्या रूजवत आहेत. पण, मनोरंजनाच्या बाबतीत आजही ‘कुटुंबवत्सल’ असलेल्या भारतीय समाजात ओटीटीच्या प्रायव्हसीची व्याख्या रूजण्यास वेळ लागेल, असे दिसते ! - आणि तोवर त्यावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमधली लैंगिक, उत्तेजक दृश्ये, शिवीगाळ यावर बंधने घालण्याची ही चर्चा होतच राहाणार!
    manoj.gadnis@lokmat.com

Web Title: Why is Salman Khan so angry on OTT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.