संजय राऊत हल्ली इतके का वैतागतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 09:39 AM2022-02-11T09:39:34+5:302022-02-11T09:40:42+5:30

राउतांचं पत्र, पंतप्रधानांचं यूपी-बिहारच्या मजुरांबद्दलचं वक्तव्य यावरून राज्य सरकार पुन्हा एकवार केंद्राला हेडऑन घेत असल्याचं दिसत आहे.

Why is Sanjay Raut so annoyed these days? | संजय राऊत हल्ली इतके का वैतागतात?

संजय राऊत हल्ली इतके का वैतागतात?

googlenewsNext


यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना पत्र लिहून आपल्याला ईडीकडून कसं टार्गेट केलं जातंय, ते सांगितलंय. त्या निमित्तानं पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध केंद्र सरकार अन् भाजप, अशी लढाई तीव्र झाली आहे. राऊतांचं पत्र, पंतप्रधानांचं यूपी-बिहारच्या मजुरांबद्दलचं वाक्य यावरून राज्य केंद्राला हेडऑन घेत असल्याचं दिसत आहे. राऊत हे तिन्ही पक्ष आणि त्या पक्षांतील नेत्यांवर भाजपकडून सातत्यानं होत असलेल्या आरोपांचं नेहमीच तडाखेबंद उत्तर देत असतात. नायडूंना त्यांनी पत्र पाठविल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या समर्थनार्थ धावून गेले, राऊत यांना त्यांनी एकटं पाडलं नाही. 

राऊत हल्ली पत्रकारांच्या प्रश्नांना का वैतागतात, हाही एक प्रश्नच आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा ठेका मीच घेतलाय का, सरकार उत्तर देईल, असं ते परवा बोलले. फक्त आपणच  केंद्राला अंगावर घेत असल्यानं उगाच चौकशीचा ससेमिरा आपल्या मागं लागत असल्याचं राऊत यांना वाटत असावं. त्यांनी आज पत्र पाठवलं असलं तरी ईडीच्या चौकशीत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढतील, अशी माहिती आहे. 
केंद्र सरकारच्या विरोधात एखादी प्रतिक्रिया मागितली, तर ‘नको! कशाला उगाच मला वादात ओढता, जे चाललंय ते बरं चाललंय, वरचे लोक कसे खतरनाक आहेत तुम्हाला माहिती आहे ना?’ असं म्हणत प्रतिक्रिया देण्याचं टाळणारे मंत्री महाराष्ट्रात आहेत. केंद्र, भाजपच्या विरोधात रोखठोक बोलण्यानं आपला नवाब मलिक, संजय राऊत होईल, असं त्यांना वाटत असावं. पूर्वी केंद्र अन् भाजपविरोधात आग ओकणाऱ्या एका दबंग मंत्र्यानं तर त्या बाबत सध्या मौनाची गोळी खाल्ली असल्याचं दिसत असून, ते आपलं ओबीसी वगैरे सामाजिक विषयांवरच बोलत असतात.

१० मार्चला सरकार पडणार?
दोन घटनांकडे मात्र जरा बारकाईनं बघायला हवं. राज्यसभेतील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दोन- दोन वेळा तारीफ केली. त्या मागचं गमक काय असावं? भाजप नेहमीच राष्ट्रवादीकडं संभाव्य मित्र म्हणून पाहत आला आहे. अर्थात, शरद पवार यांनी कधीही भाजपशी युती केली नाही. आपण भाजपसोबत जाणार नाही, असं ते वारंवार उक्तीनं आणि कृतीनं सांगत आले आहेत. भाजपसोबत जाण्यास पवारांचा असलेला विरोध हा राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या तीव्र नाराजीचा विषय असल्याचं अनेकदा बोललं जातं. महाविकास आघाडीतच राहण्याची पवार यांची अत्यंत ठाम भूमिका हाच ठाकरे सरकारचा ‘फेविकॉल का जोड’ आहे. तरीही भाजप अधूनमधून दगड मारून  पाहत असतो; लागला तर लागला! दुसरी घटना म्हणजे १० मार्चला राज्यातील सरकार बदलणार हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं विधान. चंद्रकांतदादा आणि भाजपमधील अन्य काही नेते असे मुहूर्त यापूर्वीही देत आले आहेत आणि ते सर्वच्या सर्व सपशेल खोटेदेखील ठरले आहेत. त्यामुळं या वेळचा होरा गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. १० मार्चला पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागेल अन् त्यानंतर मोठ्या घडामोडी घडू शकतील, हाच काय तो चंद्रकातदादांच्या दाव्यातील नवा अँगल आहे.

मुंबईतून यूपीवर मिसाइल -
यूपी, बिहारमधील मजुरांना कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील काँग्रेसच्या सरकारनं परत पाठवलं अन् त्यामुळं कोरोना पसरला या पंतप्रधान मोदी यांच्या विधानाचे पडसाद आणखी काही दिवस उमटतच राहतील. मोदींच्या विधानाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची किनार अर्थातच आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार असताना केवळ काँग्रेसचं सरकार, असंच मोदी का म्हणाले?

सगळ्यांनाच वाटतं की, मोदींनी काँग्रेसला ठोकून काढलं; पण एक अँगल असाही आहे की, मजुरांच्या सुरक्षित स्थलांतराचं श्रेय काँग्रेसला देऊन मोदी उत्तर प्रदेशात काँग्रेसला चर्चेत आणू पाहत आहेत. कारण, सध्या त्या राज्यात बसपा अन् काँग्रेसही अपेक्षित मतविभागणी करताना दिसत नाही. भाजपविरुद्ध सपा असा थेट सामना होऊ पाहत आहे. भाजपला ते अजिबात परवडणारं नाही. त्यांना मतविभाजन हवं आहे. काँग्रेसचं मतदान वाढलं, तर ते भाजपच्या पथ्यावर पडेल, असाही मोदींचा गेम प्लॅन दिसतो. उत्तर प्रदेशातील घमासान लढाईसाठी मुंबईच्या जमिनीवरून मोदींनी मिसाइल डागलं आहे; पण त्याची किंंमत भाजपला महाराष्ट्रात मोजावी लागू शकते. 

चिखलफेकीतही ५० टक्के महिला आरक्षण -
अलीकडील काळापर्यंत राजकीय चिखलफेक ही पुरुष नेत्यांची मक्तेदारी होती. आता ती महिला नेत्या मोडू पाहत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात याबाबतही महिलांनी मागं का राहावं? राजकारणातील दुश्मनीमध्ये एकमेकांना दुखावण्याची स्पर्धा असते. सध्या महिलानेत्या एकमेकांवर चिखलफेक करताना दिसतात. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली पाटील चाकणकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांचे एकमेकांवरील आरोप चर्चेचा विषय होतात. 

अमृता फडणवीस राजकारणात नसल्या तरी जोरदार शाब्दिक फटकेबाजी करतात. त्यांच्यासह महिला नेत्या वापरत असलेल्या भाषेबद्दल उलटसुलट मतं व्यक्त होत असतात. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीनं असं बोलावं का? महिलांनी असं बोलावं का?- असं अगदी स्वत:ला पुरोगामी म्हणविणारेही म्हणत असतात. 
अमृता यांच्यासाठीच वेगळा निकष का? त्यांनाही व्यक्त होण्याचं तेवढंच स्वातंत्र्य आहे, असं मानणाराही वर्ग आहेच. या ‘मिळून साऱ्या जणींनी’ वाक्युद्धाचा नवा पॅटर्न आणला आहे.
 

Web Title: Why is Sanjay Raut so annoyed these days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.