अकोल्यातील काँग्रेस एवढी मागे का पडतेय?
By किरण अग्रवाल | Published: April 10, 2022 11:58 AM2022-04-10T11:58:49+5:302022-04-10T11:59:23+5:30
Why is the Congress in Akola lagging behind? : अकोला महापालिकेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, पण येथल्या काँग्रेसला लोकमानस घडविता येत नाहीये.
- किरण अग्रवाल
एकीकडे उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना, दुसरीकडे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. सोमय्यांचा निषेध, तसेच पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त होत असताना, सामान्यांच्या प्रश्नावर मात्र तितकीशी आक्रमकता दिसत नाही. विशेषत: केंद्राच्या अखत्यारीतील व अकोला महापालिकेशीही संबंधित अनेक प्रश्न आहेत, पण येथल्या काँग्रेसला लोकमानस घडविता येत नाहीये.
अकोला महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खोळंबलेल्या निवडणुका नेमक्या कधी होतील, याची निश्चिती नसली, तरी उन्हाच्या चटक्याप्रमाणे राजकारणही तापू लागले आहे. मतदारांच्या पुढ्यात जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धावाधाव सुरू झाली असताना, काँग्रेसमधील स्थिती मात्र जोश हरवल्यासारखीच दिसत असल्याने, या पक्षाच्या अजेंड्यावर महापालिका निवडणूक आहे की नाही, असाच प्रश्न पडावा.
एप्रिलच्या प्रारंभातच वऱ्हाडची भूमी तापू लागली असून, अकोल्याने तापमानाचा जागतिक उच्चांक नोंदविला आहे. याचबरोबरीने येथील राजकारणही आता तापायला लागले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडखळल्या आहेत खऱ्या, पण तारखांची वाट न पाहता, सारे पक्ष सक्रिय झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीतील शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर या पक्षातील नेत्यांमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली होती, परंतु शिव संवाद अभियानात खासदार हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीने गोपीकिशन बाजोरिया व नितीन देशमुख यांना साखर भरवून त्यांच्यातील वाद प्रथमदर्शनी तरी मिटविण्यात आला आहे. अर्थात, हातात असलेला विजय डोळ्यादेखत पक्षांतर्गत कलहामुळे गमावून बसण्याचे दुःख पचविण्यास अवघडच असते, त्यामुळे हे शिवबंधन किती टिकते, याबद्दल शंकाच घेतल्या जात आहेत, पण तसे असले, तरी किरीट सोमय्या यांचा निषेध करण्याच्या निमित्ताने सारी शिवसेना एकवटून जागोजागी रस्त्यावर उतरलेली दिसून आली. शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमकपणे पुढे येतेय, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे काय?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात राज्यभर महागाईच्या निषेधासाठी सप्ताह पाळण्याचे नियोजन केले होते, यात केवळ हजेरी लावण्याखेरीज अकोल्यातील आंदोलन प्रभावकारी ठरू शकले नाही. नेत्यांचीच गर्दी झाली, कार्यकर्त्यांचा पत्ताच नाही, असे या पक्षातील सध्याचे वास्तव आहे. मागे पक्षातर्फे ‘भारत बंद’चे आवाहन केले गेले असता, ज्या अकोल्यात खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना भाऊंनी एक रॅली काढली होती, त्याच शहरात आज या पक्षाला आंदोलनासाठी कार्यकर्ते मिळत नाहीत. युवक काँग्रेसचे पदाधिकारी यंदा मतदानाने निवडले गेले, त्यामुळे त्यांच्या निवडीचा जल्लोष झाला, पण नंतर या पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी काही आंदोलने छेडल्याचे अभावानेच दिसून आले.
प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या मर्जीतील म्हणून अशोक मानकर यांना काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नेमले गेल्यावर, राजकीय पार्श्वभूमी नसलेला नवीन चेहरा म्हणून त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले गेले, पण अल्पावधीतच त्यांनाही गटातटाच्या राजकारणाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. अजून वर्षही झाले नाही, पण त्यांना बदलण्यासाठी काही जण देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत. त्यांनी केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीला म्हणजे, त्यांच्या कार्यकारणीलाही एक-दोनदा नव्हे, तर तीन वेळा प्रदेशकडून स्थगिती मिळाली, यावरून या पक्षात कान भरणाऱ्यांचे किती फावले आहे, ते लक्षात यावे.
महिलांनी प्रदेश स्तरीय परिषद अकोल्यात घेतली, पण युथ व फादर काँग्रेसला तेवढी संघटन शक्ती दाखविता आली नाही. अलीकडेच नजीकच्या शेगाव येथे ओबीसी प्रश्नावर परिषद घेतली गेली. त्यास छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित राहिले. ते अकोल्यातच विमानाने उतरून रस्तामार्गे शेगावला गेले, पण त्याही संधीचे सोने अकोलेकरांना करता आले नाही. वरून आलेला कार्यक्रम राबविण्याखेरीज स्वतःच्या मर्जीने स्थानिक पातळीवर काही केले जाताना फारसे दिसतच नाही. अशा स्थितीत महापालिकेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढणार, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यास पडला असेल, तर तो गैर ठरू नये. विशेष म्हणजे, पटोले अतिशय आक्रमकपणे सत्तेतील सहकारी पक्षांनाही अंगावर घेण्याचे धाडस दाखवत असताना, त्यांचे शिलेदार असे निवडणुकीच्या तोंडावरही स्वस्थ कसे, असाही प्रश्न उपस्थित होणारा आहे.
सारांशात, सक्षम नेतृत्वाअभावी अकोल्यात काँग्रेस मागे पडताना दिसत आहे. ज्या काळात सामान्यांच्या प्रश्नावर रान पेटवून लोकमानसात पक्षाची प्रतिमा मजबूत करायची, त्या काळात जिल्हाध्यक्ष विरुद्धची धुसफूस वाढीस लागलेली दिसून यावी, हे आपल्याच हातून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे ठरावे.