क्रूरकर्मा हुकूमशहा किम जोंग यांच्यावर माफी मागण्याची वेळ का आली?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 01:44 AM2020-09-28T01:44:55+5:302020-09-28T01:45:03+5:30
तर माफी मागायची वेळ मुळात आलीच का?
हे आक्रित घडलं कसं? याचं जगभरात सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. मुळात आश्चर्य म्हणण्यापेक्षा सुखद धक्का. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चक्क माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. हुकूमशहा, क्रूरकर्मा आणि विरोधकांना अतिशय भयंकर शिक्षा देऊन त्यांचा थेट नायनाटच करण्याची ख्याती असलेले उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग यांनी ‘सॉरी’ म्हणणं ही काही लहानसहान गोष्ट नव्हे. मात्र मुळात स्वत:ला सर्वशक्तिमान म्हणवणाऱ्या आणि ज्याच्याविषयी शेकडो आख्यायिका आहेत त्या नेत्यावर माफी मागण्याची वेळ का यावी? मुळात किम जोंगही ‘माफी’ मागू शकतात, हा दिवस उगवलाच कसा, यावरच जगभर चर्चा आहे. त्यानिमित्तानं सोशल मीडियातही विनोद, मिम्स फिरु लागले आहेत. मात्र त्यानिमित्तानं का होईना एक आशेचा किरण दिसतो आहे की, निदान कोरोना काळात तरी ‘संवादाला’ जागा शिल्लक ठेवावी असं किम जोंग यांनाही वाटलं हेच किती महत्त्वाचं आहे.
तर माफी मागायची वेळ मुळात आलीच का?
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्या सीमांवर नेहमीच चोख बंदोबस्त असतो. तणावही असतो. उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात पळून जाण्याचा प्रयत्न करणारेही काहीजण सापडतात. मात्र आता कोरोनाकाळात उत्तर कोरियानं ठरवलं की, दक्षिण कोरियातून कुणीही उत्तर कोरियात येता कामा नये. तसं कुणी बेकायदा येताना दिसलं तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सैन्याला देण्यात आले. सरकारी सेवेत असलेल्या एका ४८ वर्षीय दक्षिण कोरियन व्यक्तीला उत्तर कोरियाच्या सैनिकांनी मारलं, पेटवून दिलं आणि समुद्रात फेकून दिलं असा आरोप दक्षिण कोरियाने केला.
संबंधित व्यक्ती सागरी आणि मत्स्य मंत्रालयात काम करत असल्याचं दक्षिण कोरियाचं म्हणणं आहे. संबंधित व्यक्ती ही कर्तव्य बजावत होती आणि त्याकाळात दोन्ही देशांच्या सागरी सीमेवर ही घटना घडली. त्यातून दक्षिण कोरियन जनतेत मोठा असंतोषही निर्माण झाला. विशेष म्हणजे दक्षिण कोरियाने आरोप करताच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांच्या कार्यालयाने, सेउलला अर्थात दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रात स्पष्ट केलं की, या घटनेविषयी मी खेद आणि दिलगिरीही व्यक्त करतो. मुख्य म्हणजे उत्तर कोरियाने हे मान्य केलं की त्या व्यक्तीला उत्तर कोरियाच्या सैनिकांनीच मारलं. ‘आमच्या देशाकडून, सैनिकांकडून चूक झाली. मी माफी मागतो’, हे किम जोंग यांनी म्हणणं, जगजाहीर मान्य करणं हेदेखील या साºया घटनाक्रमात चकीत करणारं आहे. २००८ सालीही दोन देशांच्या समुद्री सीमेवर अशीच घटना घडली होती. दक्षिण कोरियन पर्यटक महिलेला उत्तर कोरियन गार्डसनी गोळ्या घातल्या होत्या, त्यावेळी मात्र त्यांनी या घटनेच्या संयुक्त चौकशीलाही नकार दिला होता.
मग यावेळी माफी मागावी असं किम जोंग यांना का वाटलं असेल?- तर त्याची कारणं दोन असावीत, एक म्हणजे झाल्या घटनेमुळे जगभर त्यांची बदनामी झाली. कोरोना केसेस दडपणे, किंवा जगाला आकडेवारीच न सांगणे या साºयामुळे जगभराचा रोष त्यांना पत्करावाच लागत आहे. अर्थात, त्यांनी जगाची पर्वा कधीही केली नाही. मात्र आता याकाळात त्यांना दक्षिण कोरियन जनतेचा रोष पत्करण्याची इच्छा दिसत नाही. तो सामूहिक क्षोभ शांत व्हावा, दक्षिण कोरियाशी संवाद सुरूठेवण्याची इच्छा आहे असं किमान जगाला आणि दक्षिण कोरियन लोकांनाही दिसावं म्हणून हे माफीपत्र पाठवलं गेलं असावं.
त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे १० आॅक्टोबरला एक भव्य सैनिकी परेड करायचे किम जोंग यांनी ठरवलं आहे. त्याची जोरदार तयारीही सुरूआहे. सत्ताधारी वर्कर्स पार्टीचा त्यादिवशी ७५वा वर्धापनदिन आहे. त्याचं भव्य आयोजन, जोरदार सैन्य शक्तिप्रदर्शन किम जोंग करणार आहेत.
त्याकाळात शेजारी देशाशी तणाव नको म्हणून ‘दिलगिरी’ व्यक्त करण्यात आली असावी अशीही चर्चा आहे. मात्र तरीही किम जोंगसारखा हुकूमशहा, ‘माफी’ मागतो, हेच कोरोनाकाळात पुरेसं बोलकं आणि वेगळं आहे, हे मात्र नक्की !