छत्रपतींच्या खांद्यावर बंदूक का ठेवता?

By admin | Published: June 5, 2017 03:33 AM2017-06-05T03:33:23+5:302017-06-05T03:33:23+5:30

भाजपाचे कुमार आयलानी यांच्यावर शिवसेना अगोदरच खार खाऊन आहे

Why keep a gun on the shoulders of Chhatrapati? | छत्रपतींच्या खांद्यावर बंदूक का ठेवता?

छत्रपतींच्या खांद्यावर बंदूक का ठेवता?

Next

भाजपाचे कुमार आयलानी यांच्यावर शिवसेना अगोदरच खार खाऊन आहे. असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून आयलानी उभे राहिलेली छायाचित्रे पाहिल्यावर शिवसेनेला चेव आला. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून शुद्धीकरण केले. उल्हासनगरात १० वर्षे गचाळ कारभार करताना शिवसेनेला छत्रपतींच्या कल्याणकारी राज्यकारभाराची आठवण झाली नाही. शिवाजी महाराजांचे जणू आपणच होलसेल ठेकेदार आहोत, अशा थाटात वावरणाऱ्या शिवसेनेने भाजपासोबतच्या आपल्या द्वेषमूलक राजकारणाकरिता छत्रपतींच्या खांद्यावर बंदूक ठेवणे, हेही तेवढेच गैर आहे...
-सदानंद नाईक
गेल्या आठवड्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांनी अतिउत्साहात उपमहापौर जीवन इदनानी यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फोटोसेशन केले. आयलानी यांनी एक हात छत्रपतींच्या खांद्यावर ठेवल्याचे त्यांच्याच पक्षातील विरोधी गटाच्या लक्षात आल्यावर तो फोटो त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला. शिवाजी महाराजांच्या नावाने पाच दशके राजकारण करणाऱ्या शिवसेनेने तसेच मनसेने यांचा निषेध केला. शिवसेनेने छत्रपतींच्या पुतळ्याला दूध व गंगाजलाचा अभिषेक करून त्याचे शुद्धीकरण करण्याचा आचरटपणा केला.
महापालिकेत शिवसेना व भाजपाने गेले एक दशक सत्ता उपभोगली. आयलानी यांना आमदारपदी निवडून दिले. आयलानी आमदार झाल्यावर सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करतील, असा शिवसेनेचा समज होता. मात्र, काही दिवसांत त्यांच्या विश्वासाला तडा गेला. आयलानी विशिष्ट टोळके घेऊन काम करू लागले. ‘मी मराठी वाचत नाही, मला समजत नाही’ असे वक्तव्य करून त्यांनी शिवसेना, मनसेला उद्युक्त केले. शहर मनसेने त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
अखेर, जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. मुलाच्या लग्नात रिपाइं नेत्यांसह पदाधिकाऱ्यांबद्दल आयलानी यांनी अपशब्द काढले. त्यामुळे रिपाइंच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी लग्नातून काढता पाय घेतला.
महापालिकेवर शिवसेना, भाजपा, साई व रिपाइंची सत्ता होती. करारनाम्यानुसार सव्वा वर्षानंतर साई पक्षाच्या महापौर आशा इदनानी यांना राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र, इदनानी यांनी राजीनामा न दिल्याने शिवसेना नेते व पदाधिकारी संतप्त झाले. या वेळी आयलानी यांनी शिवसेनेची बाजू न घेता साई पक्षाची बाजू घेतली. येथे मोठ्या वादाची ठिणगी पडली. संतप्त शिवसैनिकांनी महापालिका मुख्यालयात महापौर आशा इदनानी यांच्यासह साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, भाजपाचे कुमार आयलानी, नगरसेवक जमनू पुरस्वानी, नगरसेवक सुनील गंगवानी यांच्यासह अनेकांना चोप दिल्याने सिंधीविरुद्ध मराठी वाद चिघळला.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती तुटल्यावर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. मात्र, शिवसेना व भाजपाचा पराभव होऊन मोदीलाटेत राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा विजय झाला. त्यानंतर, महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच वरिष्ठांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचे आदेश शहर पदाधिकाऱ्यांना दिले.
उल्हासनगरवर भाजपाचाच महापौर निवडून आणण्यासाठी शिवसेनेला बाजूला ठेवून कोणत्या पक्षासोबत आघाडी करायची, याची चाचपणी सुरू केली. पक्षाचे हे धोरण आयलानी यांना माहीत असतानाही अखेरपर्यंत शिवसेनेसोबत युतीचे गुऱ्हाळ सुरू ठेवून ऐनवेळी युती तोडली. याचाही राग शिवसेनेला आहे.
भाजपाने यापूर्वी कायम कलानीविरोधी भूमिका घेतली. मात्र, या वेळी अचानक सत्तेसाठी कलानी कुटुंब भाजपाला आपलेसे वाटू लागले. वादग्रस्त पप्पू कलानी यांचे चिरंजीव ओमी कलानी यांच्यासोबत संधान बांधले. कलानी यांनीही अप्रत्यक्ष भाजपात प्रवेश केला आहे. पत्नी पंचम कलानी यांच्यासह समर्थकांनी थेट भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. सत्तेसाठी आयलानी यांच्याजवळ असणारे जीवन इदनानी यांना भाजपाने स्वत:कडे घेतले. शिवसेनेनेही साई पक्षासोबत सत्तेसाठी बोलणी करून त्यांना महापौरपद देण्याचे वचन दिले होेते. आयलानी यांना ओमी टीमसह पक्षातील एक गटाचा विरोध असतानाही महापौरपद आयलानी यांनी स्वत:कडे खेचून आणले. याचा राग शिवसेनेला आहे. त्यामुळे आयलानी यांना टार्गेट करण्याची संधी शिवसेना शोधत होती. छत्रपतींच्या खांद्यावर हात ठेवल्याने ती शिवसेनेकडे चालून आली. मात्र, हे अत्यंत
गलिच्छ राजकारण आहे. भाजपा आणि सेना या दोघांनीही ते करणे गैर आहे.
शिवसेना छत्रपतींचा अपमान झाल्यामुळे गळा काढते, पण छत्रपतींनी रयतेकरिता जसा चोख कारभार केला, तसा सत्ताकाळात करते का, या प्रश्नाचे उत्तरही शिवसेनेने दिले पाहिजे. शिवसेना-भाजपा महायुतीने गेल्या १० वर्षांत उल्हासनगरकरिता काय केले? युतीच्या सत्ताकाळात एकही योजना पूर्णत्वास गेली नाही. शहर विकास होण्याऐवजी स्वविकास झाल्याची टीका होते. बीएसयूपीचे ३२ कोटी तसेच श्रमसाफल्यचा ८ कोटींचा निधी परत गेला. ३०० कोटींची पाणीयोजना ठप्प पडली. नगररचनाकार विभागातील सावळागोंधळ सर्वश्रुत असून बेपत्ता झालेले नगररचनाकार संजीव करपे अजून सापडले नाहीत. डम्पिंगसाठी पर्यायी जागा मिळवता आली नाही, एलबीटी घोटाळा, कर विभागातील घोटाळा असे एक ना अनेक घोटाळे व गोंधळाची जंत्री देता येईल. केवळ छत्रपतींच्या कर्तृत्वाच्या कहाण्या लोकांना सांगायच्या. मात्र, आपण स्वत: गचाळ कारभार करायचा, असे शिवसेनेचे दुटप्पी वर्तन आहे. सत्ता गमावल्याने शिवसेनेचे काही नेते बेचैन झाले आहेत. आयलानी हेही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. तेही पक्के स्टंटबाज आहेत. आपल्या वर्तनाने त्यांनी शिवसेनेच्या हाती कोलीत दिले. शिवाय, झाल्या प्रकाराबद्दल माफी मागून मोकळे होण्याचा मोठेपणाही त्यांच्याकडे नाही. भाजपा व शिवसेनेने आपले राजकीय हिशेब चुकते करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवणे, हेही तेवढेच दुर्दैवी आहे.

Web Title: Why keep a gun on the shoulders of Chhatrapati?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.