CoronaVirus News : स्वस्त, गुणकारी सोडून महागड्या औषधांचा सोस कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 03:04 AM2020-07-13T03:04:51+5:302020-07-13T03:06:23+5:30
अशाच प्रकारे दिसून येणारा आणखी एक सोस कसा चुकीचा आहे, हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे.
- डॉ. गणेशन कार्तिकेयन (विभागप्रमुख, ‘एम्स’, दिल्ली)
सध्याच्या ‘कोविड-१९’ साथीचा यशस्वी मुकाबला करताना योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, सध्या माध्यमांमध्ये माहितीचा एवढा महापूर येत आहे की, खरे काय आणि खोटे काय हे ठरविणे सामान्यांना सोडा, पण तथाकथित तज्ज्ञांनाही अशक्य होत आहे. याचा परिणाम सदोष निर्णय घेण्यात, गैरसमजात आणि चुकीच्या अग्रक्रमात होत आहे. ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’साठी केमिस्टच्या दुकानात पडलेल्या उड्या हे याचे ताजे उदाहरण आहे.
अशाच प्रकारे दिसून येणारा आणखी एक सोस कसा चुकीचा आहे, हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे. ‘रेमडेसिविर’ या अँटिव्हायरल औषधाचा आणि ‘प्लाझ्मा थेरपी’ या उपचाराचा कोरोनावरील रामबाण उपाय म्हणून बहुतांश वृत्तवाहिन्यांवर व वृत्तपत्रांमध्ये उदोउदो सुरू आहे. काही अपवाद वगळता तज्ज्ञही या सुरात सूर मिळवीत आहेत. ‘प्लाझ्मा थेरपी’चा वापर केवळ प्रायोगिक स्वरूपात करावा, हा ‘आयसीएमआर’चा संयमित सल्ला या गोंधळात कोणी लक्षातच घ्यायला तयार नाही. त्यामुळे ‘कोविड’वर सध्या फक्त हेच दोन उपचार उपलब्ध आहेत, असा समज सामान्य नागरिकांनी करून घेतल्यास नवल नाही.
दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत ‘कोविड’वर गुणकारी औषधाचा मागमूसही नव्हता. परंतु, ब्रिटनमधील संशोधकांनी ‘डेक्झामेथॅसॉन’ या औषधावर प्रयोग करून केलेल्या अभ्यास पाहणीचे निष्कर्ष जाहीर केले आणि चित्र एकदम बदलले. भारतातील वृत्तवाहिन्यांनी याची दोन दिवस दखल घेतली आणि ‘रेमडेसिविर’, ‘प्लाझ्मा थेरपी’ आणि ‘फ्लाविपिरॅविर’ या आणखी एका असिद्ध औषधाचे गुºहाळ सुरू केले. परंतु, भारतीय माध्यमांनी दुर्लक्षित केले तरी ‘डेक्झामेथॅसॉन’चे महत्त्व दोन कारणांसाठी लक्षात घ्यावेच लागेल.
पहिले म्हणजे, ‘कोविड’च्या रुग्णांचा मृत्यू होण्याचा आणि व्हेंटिलेटर लावावे लागण्याचा धोका हे औषध निर्विवादपणे कमी करते. खूप आजारी असलेल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी हे औषध १० दिवस देणे पुरेसे होते. याउलट ‘रेमडेसिविर’ने रुग्णाचे केवळ इस्पितळातील वास्तव्यच चार दिवसांनी कमी होऊ शकते, पण मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी त्याचा काहीच फायदा होत नाही. ‘प्लाझ्मा थेरपी’चा ‘कोविड’ रुग्णांना होणाऱ्या लाभांचे विश्वासार्ह निष्कर्ष अद्याप यायचे आहेत व अन्य फ्लूच्या आजारातही त्याचा काहीच फायदा होत नाही किंवा अत्यल्प फायदा होतो.
दुसरे असे की, ‘डेक्झामेथॅसॉन’ हे औषध स्वस्त आहे व ते जेनेरिक स्वरूपातही भारतात सहज उपलब्ध आहे. या औषधाच्या एका कोर्सचा खर्च प्रतिरुग्ण १० रुपयांहूनही कमी येतो. याउलट भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या ‘रेमडेसिविर’चा एका कोर्सचा खर्च काही हजारांच्या घरात जातो. याचप्रमाणे स्वयंसेवकांकडून प्लाझ्मा देण्यासाठी उभारावी लागणारी यंत्रणाही खूप खर्चिक आहे.
पूर्ण माहिती नसेल तर ग्राहक कोणत्याही वस्तूची गुणवत्ता सर्वसाधारणपणे त्याच्या किमतीवरून ठरवत असतो. आरोग्यक्षेत्रात माहितीच्या उपलब्धतेचे असंतुलन असते. जे आरोग्यसेवा पुरवीत असतात त्यांनाच ही माहिती अधिक असते व ती फक्त त्यांनाच समजू शकेल, अशा भाषेत असते. औषध कंपन्या व नफ्यासाठीच चालविली जाणारी इस्पितळे ही उणीव भरून काढून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतील, अशी अपेक्षा ठेवणे बालिशपणाचे ठरेल. त्यामुळे या माहितीच्या खिंडीतून माध्यमांना आणि आपल्या निर्णयकर्त्यांना सहीसलामत बाहेर काढण्याची जबाबदारी डॉक्टरांवर व सार्वजनिक आरोग्यसेवांवर येऊन पडते.
तुलनेने कमी गुणकारी आणि अधिक महागड्या औषधांचा पुरस्कार करण्याची देशाची अर्थव्यवस्था व जनतेचे आरोग्य या दोन्ही दृष्टींनी मोठी किंमत मोजावी लागू शकते. म्हणून सर्वांत परिणामकारक असे उपचार जास्तीत जास्त लोकांना परवडणाºया दरात कसे उपलब्ध होतील, याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकवेळा स्वस्त पर्यायही उत्तम असू शकतो, हा संदेश समाजात ठणकावून द्यायला हवा.