अस्वस्थ मनाला ऊर्जा देणाऱ्या ग्रंथालयांची दारे अजून बंद का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 04:52 AM2020-10-05T04:52:53+5:302020-10-05T04:55:51+5:30

पुस्तके जीवनावश्यकच आहेत. भाकरी ही पोटाची गरज; पण भावना जागवायला आणि स्वप्ने फुलवायला विचारच उपयोगी पडतात. ते केवळ पुस्तकांतूनच मिळतात.

Why libraries are still closed | अस्वस्थ मनाला ऊर्जा देणाऱ्या ग्रंथालयांची दारे अजून बंद का?

अस्वस्थ मनाला ऊर्जा देणाऱ्या ग्रंथालयांची दारे अजून बंद का?

googlenewsNext

- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व ग्रंथालये बंद आहेत. टाळेबंदीनंतर आता सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. अनलॉक-५ची घोषणा करताना सरकारने हॉटेल्स, फूडमॉल्स, रेस्टॉरंट आणि बार हे पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ती देत असताना राज्यातील ग्रंथालयांचा मात्र विचार केलेला नाही. यातून राज्यकर्त्यांची अनास्थाच दिसून येते.

शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे अन्नातून मिळतात; पण मन आणि बुद्धीच्या भरणपोषणासाठी गरजेची असलेली सत्त्वे केवळ वाचनातूनच मिळतात. प्रगल्भ आणि जाणत्या वाचकांमुळेच समाजाची सांस्कृतिक श्रीमंती वाढत असते. सर्वच वाचकांना ग्रंथ खरेदी करून वाचणे शक्य नसते. वाचनभूक भागविण्यासाठी ग्रंथालयांवरच अवलंबून असणारा मोठा वाचकवर्ग आहे. ग्रंथालये बंद असल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. अभ्यासक, संशोधक आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. ग्रंथालये कधी सुरू होणार? अशी विचारणा सातत्याने वाचकांकडून होत आहे. आजही महाराष्ट्रात असलेल्या वाचनालयांचा जो वाचक वर्ग आहे त्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. वाचन हाच त्यांच्यासाठी विरंगुळा असतो. ज्येष्ठ नागरिक संघाचे आणि हास्य संघाचे नियमित होणारे कार्यक्रम आता होत नाहीत त्यामुळे त्यांचा भावनिक कोंडमारा होत आहे. त्यांनी वाचनालयात जाणे सद्य:परिस्थितीत हिताचे नसले तरी त्यांच्या वतीने कुटुंबातील सदस्य पुस्तकांची देव-घेव करण्यासाठी जाऊ शकतात. अनेक ग्रंथालयांची घरपोच सेवा आहे. शासनाच्या अटींचे पालन करीत आवश्यक ती खबरदारी घेत ही सेवाही कुरिअरप्रमाणे सुरू करता येऊ शकते. सार्वजनिक ग्रंथालयातील सेवक आधीच तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत, त्यात टाळेबंदीमुळे त्यांच्या वेतनात मोठी कपात झाली आहे. वाचनालये अशीच बंद राहिली तर त्यांचे जगण्याचे प्रश्न आणखी गंभीर होणार आहेत.



वाचन संस्कृतीला आव्हान देणाºया आणि वाचकांना वाचनापासून विचलित करणाºया अनेक गोष्टी नव्या तंत्रज्ञानाने जन्माला घातल्या आहेत, अशा परिस्थितीत वाचकवर्ग टिकवून ठेवण्याचे काम ग्रंथालये निष्ठेने करीत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून वाचक आणि वाचनालये यांचा संपर्क तुटला आहे. हे असेच चालू राहिले तर वाचकांची पावले पुन्हा वाचनालयाकडे वळणे कठीण होणार आहे. ही बाब वाचनालये आणि वाचन संस्कृती या दोघांसाठीही घातक आहे. वाचनालयात १ एप्रिलनंतर वाचक नव्या वर्षासाठी सदस्य म्हणून नोंदणी करीत असतात. वाचनालये बंद ठेवल्यामुळे नोंदणी करणाºया सदस्यांची संख्या घटली तर त्याचा परिणाम वाचनालयांच्या अर्थकारणावरही होईल. अगोदरच सरकारी अनुदान वेळेत मिळण्याची मारामार; या परिस्थितीत ते कधी मिळेल याची खात्री नाही. त्यात नोंदणी करणाºया सदस्यांची संख्या कमी झाली तर वाचनालये मोठ्या आर्थिक संकटात सापडतील.
वाचनालये बंद आहेत म्हणून पुस्तकांची खरेदी थांबली आहे. त्याचा फटका प्रकाशन व्यवसायाला बसला आहे. प्रकाशक, ग्रंथवितरक आणि विक्रेते अडचणीत सापडले आहेत. वाचनालये सुरू होणार नसतील आणि पुस्तकांची खरेदी होणार नसेल तर नवी पुस्तके प्रकाशितच होणे कठीण आहे. असे घडणे भाषा आणि साहित्यासाठी हानिकारक आहे.



दिवाळी अवघ्या दीड महिन्यावर आलेली आहे. १११ वर्षांची समृद्ध आणि संपन्न परंपरा असलेले दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभवच आहे. कोरोनाच्या संकटकाळात दिवाळी अंकांची समृद्ध आणि संपन्न परंपरा खंडित होऊ नये म्हणून सारे बळ एकवटून संपादकांनी दिवाळी अंक काढण्याचे ठरविले आहे. दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामी ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ती बंद राहिली तर या प्रयत्नांवर पाणी पडणार आहे.

पुस्तके जीवनावश्यकच आहेत. भाकरी ही पोटाची गरज; पण भावना जागवायला आणि स्वप्ने फुलवायला विचारच उपयोगी पडतात. ते केवळ पुस्तकांतूनच मिळतात. या कोरोनाच्या संकटकाळात निराशेने ग्रासलेली आणि भीतीने काळवंडलेली मने प्रज्वलित करून समाजाला सकारात्मक ऊर्जा देणारे काम केवळ पुस्तकेच करू शकतील. म्हणून पुस्तकांचे निवासस्थान आणि वाचन संस्कृतीचे प्रवेशद्वार असलेली ग्रंथालये उचित अटींसह त्वरित सुरू करा.

Web Title: Why libraries are still closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.