गांधी नावाच्या ‘ग्लोबल ब्रॅण्ड’चा मेकओव्हर कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:26 AM2021-08-25T07:26:38+5:302021-08-25T07:28:29+5:30
१२०० कोटी खर्चून साबरमती आश्रमाचा ‘कायापालट’ करण्याचा घाट सरकारने घातला आहे. या ‘वर्ल्डक्लास टुरिझम सेंटर’ची आज गरज आहे, की गांधी-विचारांची?
- नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, औरंगाबाद
मोहन करमचंद गांधी हे जगातलं आठवं आश्चर्य मानायला हरकत नाही. एकविसावं शतक अर्ध्यावर आलं तरी गांधी नावाच्या माणसाचं गारूड आजही कायम आहे. जगाच्या पाठीवर असा एकही देश नसेल जिथं गांधी पोहोचलेले नाहीत. बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते शी जिनपिंग, शिन्जो आबे यांच्यापर्यंत जगातील महासत्तांचे राष्ट्रप्रमुख ज्या-ज्या वेळी भारत भेटीवर येतात तेव्हा त्यांच्या कार्यक्रमात ‘गांधीभेट’ ठरलेली असते. मग कोणी दिल्लीतील राजघाटावरील बापूंच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करतात, तर कोणी अहमदाबादेतील साबरमती आश्रमाला भेट देतात. बापूंचा चरखा तर अनेकांसाठी नवलाईची गोष्ट. या चरख्यातून निघालेल्या धाग्याने मानवतेची निरगाठ बांधली. दोन काडीच्या चष्म्यानं संपूर्ण मानवजातीला सहिष्णुतेची दृष्टी दिली आणि अंगावरच्या वीतभर पंचानं साधेपणाची शिकवण. चरखा, चष्मा, पंचा या केवळ बापूंच्या वस्तू नाहीत, तर एका व्रतस्थ फकिरानं स्वीकारलेल्या स्वावलंबी जीवनशैलीची प्रतीकं आहेत.
साबरमतीचा आश्रम तर साक्षात मानवतेचं मंदिर! अंगभर कपडेही नसलेल्या एका नि:शस्त्र माणसानं बलाढ्य अशा ब्रिटिशांशी लढा दिला, यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नाही; पण बापूंकडं ‘अहिंसा’ नावाचं ब्रह्मास्त्र होतं, ३३ कोटी लोकांचं पाठबळ होतं. गांधींचा कोणता पंथ नाही, पक्ष नाही की संप्रदाय! पण ‘गांधीवाद’ नावानं ओळखलं जाणारं तत्त्वज्ञान जगभरातल्या विद्यापीठांतून शिकवलं जातं आणि या गांधीविचारानं भारलेली लाखो माणसं दरवर्षी साबरमती आश्रमाला भेट देतात. बापू आणि बा(कस्तुरबा) यांचं निवासस्थान राहिलेल्या ‘हृदयकुंज’चं मनोभावे दर्शन घेतात. याच आश्रमाच्या परिसरात १९६० साली बांधलेल्या संग्रहालयात बापूंशी संबंधित अनेक वस्तू जतन केल्या आहेत. या आश्रमात विनासायास कोणालाही प्रवेश मिळतो. शाळकरी मुलं बापूंच्या वस्तूंना स्पर्श करून या महात्म्याच्या अलौकिकत्वाची अनुभूती घेतात.
बापूंच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या साबरमती आश्रमाचा ‘मेकओव्हर’ करण्याचा निर्णय आता सरकारनं घेतला आहे. सुमारे १२०० कोटी रुपयांचा ‘गांधी आश्रम स्मारक आणि परिसर विकास प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साबरमती आश्रमाचे ‘वर्ल्डक्लास टुरिझम सेंटर’मध्ये परिवर्तन करण्याचा सरकारचा मानस आहे. यात अर्थातच, व्हीआयपींसाठी खास व्यवस्था असणार आणि पासशिवाय कोणालाही प्रवेश नसणार. म्हणूनच, या प्रकल्पाला राजमोहन गांधी यांच्यासह आनंद पटवर्धन, रावसाहेब कसबे, रामचंद्र गुहा, अरुणा रॉय, न्या. ए.पी. शहा आदी नामांकित मंडळींनी आक्षेप घेतला आहे. या बुद्धिवाद्यांच्या आक्षेपाचा मुद्दा असा की, अत्यंत साधेपणानं आयुष्य जगलेल्या या महात्म्याच्या स्मृतिस्थळाचं पर्यटनाच्या नावाखाली बाजारीकरण करणं योग्य नाही. जगभरातील गांधीप्रेमी आज लाखोंच्या संख्येनं साबरमती आश्रमाला भेट देत असताना पर्यटनवृद्धीसाठी या ऐतिहासिक स्मारकाचं मनोरंजन पार्कमध्ये रूपांतर करणं म्हणजे एक प्रकारे गांधीविचारांची प्रतारणा ठरेल. सत्य, अहिंसा आणि साधेपणा ही गांधीजींच्या जीवनाची त्रिसूत्री होती. मात्र, या प्रकल्पाच्या माध्यमातून साबरमती आश्रम नावाच्या या मानवतेच्या मंदिराचे काँक्रिटीकरण होणार असेल, तर त्यास कडाडून विरोध केला पाहिजे. - तसाही या सरकारला स्मारकं आणि भव्यतेचा भारी सोस. सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारला. आता गांधींच्या नावानं एका ‘इव्हेंट’ची तयारी सुरू आहे. त्यासाठी साबरमती आश्रमासारखी दुसरी जागा कोणती असू शकते?
Nandu.patil@lokmat.com