माणूस का वैतागतो आणि कुणावर वैतागतो ?

By किरण अग्रवाल | Published: October 5, 2017 08:46 AM2017-10-05T08:46:51+5:302017-10-05T08:52:54+5:30

खरे तर हा प्रश्न व्यक्ती व परिस्थिती सापेक्ष आहे. कारण प्रत्येकच व्यक्तीच्या त्रासामागे अगर त्राग्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. तो कोणत्या परिस्थितीला सामोरे जातो आहे.

Why is the man laughing? And laugh at someone | माणूस का वैतागतो आणि कुणावर वैतागतो ?

माणूस का वैतागतो आणि कुणावर वैतागतो ?

Next

खरे तर हा प्रश्न व्यक्ती व परिस्थिती सापेक्ष आहे. कारण प्रत्येकच व्यक्तीच्या त्रासामागे अगर त्राग्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. तो कोणत्या परिस्थितीला सामोरे जातो आहे. त्यावरही त्याचे वैतागणे अवलंबून असते. पण, हे सर्व समजून घेत असताना व समाजशास्त्राच्या चौकटीतून त्याकडे पहात असताना जिवाच्या अंतानंतरही जेव्हा गेलेल्या व्यक्तीबद्दलच्या नसत्या प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ त्याच्या आप्तेष्टांवर येते, तेव्हा येणारा वैताग हा स्वत:सोबतच यंत्रणांबद्दलही चीड, संताप व मनस्ताप देणारा ठरल्याखेरीज रहात नाही. हे सारे काय असते ते अनुभवण्यासाठी नाशिक अमरधाममध्ये जायला हवे !

मृत्यू हा अटळ आहे. तो टळत नसतो हे खरेच; पण मृत्यूनंतरही पुन्हा तो यंत्रणेकडून ओढवल्याचे अनुभव अलीकडे अनेकांना येत असतात. अर्थात, गेलेल्या व्यक्तीच्या विचाराच्या वा आचरणाच्या विरुद्ध जेव्हा घडते तेव्हा त्या व्यक्तीचा पुन्हा मृत्यू ओढवल्याचे म्हटले अगर मानले जातेच; परंतु मृत व्यक्तीच्या मृत्यूबद्दल जेव्हा संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून ती खरेच आपल्यात नाही हे सरकार दरबारी पटवून देण्याची वेळ येते, तेव्हाचे संबंधितांचे वैतागणे याला तोड नसते. कारण, गेलेल्याच्या रितेपणाची बोच मनी घेऊन ते सिद्ध करून द्यावे लागण्यासारखे कष्ट वा वेदनादायी अन्य काही असू शकत नाही.

नाशिक महापालिकेने यात आणखी काहीशी भर घालून जगण्याला नव्हे तर, मरणालाही छळण्याचाच प्रयत्न चालविल्याचा अनुभव हल्ली नाशिककर घेत आहेत. मृत्यू दाखला देण्यासाठी उपयोगी ठरणारी माहिती अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासमयी भरून घेत असताना आता मृत व्यक्तीच्या व्यसनांबद्दलची माहितीही विचारून अर्जात भरून घेतली जात आहे. यात मृताला सिगारेट, विडी किंवा तंबाखूचे व्यसन होते काय? सुपारी, पानमसाला, दारू अथवा तत्सम उत्तेजक पदार्थांचे व्यसन होते काय, अशी प्रश्ने आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरे जिवंतपणी सहजासहजी प्रामाणिकपणे दिली जात नाहीत, ती ही प्रश्ने आहेत. त्यामुळे मृत्युपश्चात कोण आपल्या व्यक्तीचे रेकॉर्ड स्वत:हून खराब करून ठेवणार, असा प्रश्न त्यातून उपस्थित होणे स्वाभाविक ठरून गेले आहे.

मुळात, अशी माहिती संकलित करून तिचे करणार काय, हा यासंदर्भातील प्रश्न आहे. व्यसन अगर जे काही असेल ते संबंधिताबरोबर गेले असताना कागदपत्रांमध्ये ते नोंदवून ठेवण्यात हशील काय? आज व्यसन होते काय, हे विचारले जाणार व उद्या ते नव्हते म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र जोडायला लावण्यासाठी मागे-पुढे पाहिले जाणार नाही, अशी भीतीही त्यातून उपस्थित होणारी आहे. व्यवस्था ही वैतागाला कारणीभूत ठरण्यासंदर्भातले यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण शोधून सापडू नये.

आप्तेष्टाच्या निधनाने हबकलेले, उणेपणाच्या भावनेने व्याकुळलेले कुटुंबीय मृताच्या व्यसनाची यानिमित्ताने उजळणी करून व महापालिकेच्या दप्तरी त्याची नोंद करून कोणत्या आठवणी जपल्या जाणार हा प्रश्नच असताना दुसरीकडे अमरधाममध्ये दिल्या जाणाºया सुविधांबद्दल मात्र महापालिका गंभीर नाही. नाशकातील एकूण ११ अमरधामपैकी केवळ दोनच ठिकाणी मोफत अंत्यविधीशी संबंधित व्यवस्था होताना दिसते. त्यामुळे ‘मरणानंतरचेही मरण’ अनुभवास आल्याखेरीज राहात नाही. त्यातही आता मृत पावलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींच्या बाबतीत अडचणीत वाढ झाली आहे. अपघातातील मृत, बेवारस मृतांच्या बाबतीत तर अधिकच त्रासदायी अशी ही अट आहे. व्यवस्थांबद्दलच्या वैतागलेपणात भर पडून जाते ती या अशा नियम-निकषांमुळेच. जगणे सोपे होत नाही; पण मृत्यूही सोपा-सुलभ राहिला नाही, हेच वास्तव यातून समोर यावे.

Web Title: Why is the man laughing? And laugh at someone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.