आम्हाला तेव्हाच का बाहेर नाही काढले?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 12:37 AM2019-12-22T00:37:42+5:302019-12-22T00:38:15+5:30
भारतीय संसदेने अलीकडेच संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशातील काही
कुमार बडदे
आम्ही इतकी वर्षे इथे राहतो. आमचे तारुण्य येथे गेले, आमची मुले इथेच मोठी झाली, आमच्या घरातील वडीलधारे याच मातीत मिसळले. आता सरकार आमच्याकडे नागरिकत्वाचे पुरावे मागणार का? आता सरकार आम्हाला या देशाचे नागरिक नसल्याने बाहेर काढणार का? ज्यावेळी आम्ही येथे आलो, तेव्हाच आम्हाला शोधण्यात अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणाची काहीच चूक नाही का? असा सवाल केला आहे मुश्ताक (नाव बदलले आहे) याने. हे सरकारचे अपयश आहे. आमची मते घेतली तेव्हा आमचे मूळ तुमच्या डोळ्यांत खुपले नाही का? असा सवालही मुश्ताकने केला.
भारतीय संसदेने अलीकडेच संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशातील काही राज्यांत हिंसक किंवा लोकशाही मार्गाने आंदोलने सुरू आहेत. यातील काही आंदोलनांनी हिंसक पाऊल उचलल्याने जाळपोळ, दगडफेक सुरू झाली आहे. या कायद्याविरोधात बुधवारी मुंब्य्रातदेखील विशाल मोर्चा काढण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या व सध्या देशाचे पण मूळ बांगलादेशी नागरिक असलेल्या काहींशी संपर्क साधला असता, त्यातील अनेकांनी सध्या सुरू असलेल्या नागरिकत्व कायद्याच्या गदारोळावर सुरुवातीला बोलण्यास नकार दिला. काहींनी आपण मूळचे बांगलादेशी असल्याचे कबूल करण्यास इन्कार केला. मात्र, विश्वासात घेतल्यावर त्यापैकी एक-दोघांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली. अर्थात, कुणी हा त्यांच्यावरील अन्याय असल्याचे मान्य करील तर कुणी त्यांचा हा आक्रमक पवित्रा म्हणजे ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ या पद्धतीचा असल्याचे म्हणेल. याबाबत तलाह मंडल या मध्यमवयीन पुरु षाने सांगितले की, बांगलादेशातील बेरोजगारी, दोन वेळेला पोटभर अन्न मिळवण्यासाठी होत असलेली ओढाताण यामुळे त्याने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. आठ वर्षांपूर्वी गनिमी कावा पद्धतीने देशात प्रवेश केल्याची माहिती त्याने दिली. अशा पद्धतीने देशात येत असलेल्या त्याच्या अन्य समाजबांधवांना त्रास होऊ नये, यासाठी देशात प्रवेश करताना कुठल्या पद्धतीचा वापर केला, त्याबद्दल सविस्तर सांगण्यास मात्र त्याने नकार दिला. मात्र पैसा सब जगह काम कर जाता है, असे सूचक विधान मंडल याने केले.
येथे आल्यानंतर कुणालाही तो बांगलादेशी असल्याचा संशय येऊ नये म्हणून यापूर्वी देशात दाखल झालेल्या बागलादेशींप्रमाणे त्याने मध्यम किंवा उच्चभू वसाहतीमध्ये न राहता झोपडपट्टीमध्ये राहण्याचे ठरवले. मी माझ्या कुटुंबासमवेत ज्या झोपडपट्टीत राहिलो तेथे असंख्य समस्या त्यावेळी होत्या व आजही आहेत. बांगलादेशात जे हलाखीचे जीणे जगत होतो तसेच जीणे येथेही सुरुवातीला माझ्या नशिबी आले. मात्र फरक एवढाच होता की, येथे माझ्या हाताला काम मिळण्याची शाश्वती होती. ‘ये पापी पेट नही होता तो इतनी बडी मुसीबत मोड के यहां नही आता’, मंडल म्हणाला. तेथे थोडे स्थिरावल्यानंतर माझ्याअगोदर व नंतर आलेल्या जातबांधवांशी संपर्क साधून मोलमजुरी, बांधकाम व्यवसायात रोजंदारी, फळ व भाजीविक्री अशी कामे करून स्थिरस्थावर झालो. मात्र आता नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर पुन्हा अस्थिरतेची भीती वाटू लागली आहे. माझे आता बांगलादेशसोबत नाते राहिलेले नाही. हाच देश माझे पोट भरत आहे, असे मंडल म्हणाला. दुसऱ्या एकाने नाव न छापण्याच्या अटीवर त्यांच्या येथे वास्तव्य करण्याच्या पद्धतीची अत्यंत स्फोटक माहिती दिली. तो म्हणाला की, आम्ही मूळ बांगलादेशी आहोत. परंतु सध्या पोटापाण्याकरिता येथे राहत असल्याने आमच्यापैकी बहुतेकांकडे भारतीय नागरिकांप्रमाणेच शिधापत्रिका, आधारकार्ड इतकेच काय छोटामोठा व्यवसाय करणाऱ्यांकडे पॅनकार्ड आहेत. ते बनवण्याकरिता स्थानिक दलालांनी आम्हाला मोलाची मदत केली आहे. आम्हाला मदत करणारे ते भारतीय नागरिक आहेत. त्या दलालांना पैसा हवा होता. आम्ही ज्या वस्तीत वास्तव्य करतो तेथून विजयी होणाºया लोकप्रतिनिधींना मते हवी होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला सहजगत्या हे पुरावे उपलब्ध करून दिले. मात्र सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी वरील शासकीय कागदपत्रांखेरीज इतर काही कागदपत्रांची मागणी पुरावा म्हणून करण्यात येणार असल्यामुळे आमच्यापैकी अनेकांना ते भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे आमचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आम्ही आता येथे स्थिरावलो आहोत. आम्ही येथे चाळीत, झोपडपट्ट्यांत इतकेच काय इमारतीत घरे घेतली आहेत. आमची हीच कागदपत्रे पाहून आम्हाला येथील वित्तसंस्थांनी कर्जं दिली आहेत. कुणी खाजगी कर्ज काढली आहेत. आता अचानक जर कुणी आम्हाला तुम्ही या देशाचे नागरिक नाही, त्यामुळे चालते व्हा म्हणाले तर आम्ही काय करायचे? आमची मते घेऊन निवडून आलात आणि आता आमच्याच मुळावर उठता? त्यामुळे हा जाचक कायदा रद्द झाला पाहिजे. यावर तोडगा निघेल, असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला.
मूळचे बांगलादेशी असलेल्या या कुटुंबातील स्त्रिया बाजारपेठांमध्ये फिरताना शक्यतो त्यांच्या ओळखीच्या आणि बांगलादेशी जातबांधव असलेल्या स्त्रियांव्यतिरिक्त इतर स्त्रियांशी बोलत नाहीत. बांगलादेशी पुरु ष कटाक्षाने त्यांचे बांधव ज्या सलूनमध्ये केस कापण्याचे काम करतात, त्याच सलूनमध्ये केस कापण्यासाठी अथवा दाढी करण्यासाठी जातात. अनेक बांगलादेशी स्त्रिया येथे वेश्या व्यवसाय किंवा डान्स बारमध्ये काम करतात, असेही त्याने मान्य केले. काही बांगलादेशी तरुणींनी येथील स्थानिक तरुणांसोबत विवाह केल्याचेही त्याने सांगितले. आम्ही बांगलादेशी असल्याने जरी आमच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड असले तरी सतत एक असुरक्षिततेची, भीतीची छाया आमच्यावर असते. नागरिकत्व सुधारणा विधेयकाने आमची झोप उडवली आहे.
काहींनी आपण मूळचे बांगलादेशी असल्याचे कबूल करण्यास इन्कार केला. मात्र, विश्वासात घेतल्यावर त्यापैकी एकदोघांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली. अर्थात, कुणी हा त्यांच्यावरील अन्याय असल्याचे मान्य करील तर कुणी त्यांचा हा आक्रमक पवित्रा म्हणजे ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ या पद्धतीचा असल्याचे म्हणेल.