शिक्षकांची बदली का नाही? नवे धोरण आणण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 09:05 AM2023-06-19T09:05:02+5:302023-06-19T09:06:08+5:30

सद्य:स्थितीत ऑनलाइन बदल्यांवर बहुतांश शिक्षक समाधानी आहेत. संवर्गनिहाय निकष आहेत. तरीही बदल्यांसंदर्भात अनेक परिपत्रके निघतात. 

Why not transfer teachers? Thinking of coming up with a new policy | शिक्षकांची बदली का नाही? नवे धोरण आणण्याचा विचार

शिक्षकांची बदली का नाही? नवे धोरण आणण्याचा विचार

googlenewsNext

शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे हित राखले जावे आणि शिक्षकांची बदल्यांसाठी होणारी धावपळ धडपड कायमची थांबावी म्हणून राज्यशासनाने शिक्षकांसाठी बदलीचे नवे धोरण आणण्याचा विचार मांडला आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांनी एका नव्या चर्चेला सुरुवात केली आहे. त्याचे स्वागत आणि विरोधही होणार. दोन्ही बाजू समजून घेऊन शासन अंतिम निर्णयाला येईल, अशी अपेक्षा आहे. शासकीय कर्मचान्यांसाठी बदली हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय असतो. बदली अधिनियमानुसार दर तीन वर्षांनी प्रशासकीय बदल्या होतात. शिक्षकांसाठी हा नियम पाच वर्षांचा आहे. नव्या धोरणानुसार सबळ कारण असल्याशिवाय बदली होणार नाही. सद्य:स्थितीत ऑनलाइन बदल्यांवर बहुतांश शिक्षक समाधानी आहेत. संवर्गनिहाय निकष आहेत. तरीही बदल्यांसंदर्भात अनेक परिपत्रके निघतात. 

वारंवार सुधारणा केल्या जातात. त्यातून न्यायालयीन प्रकरणेही उद्भवतात. अशा स्थितीत शिक्षकांची नियमित बदली होणार नाही, शिवाय सबळ कारण असल्याशिवाय विनंती बदली केली जाणार नाही, असे धोरण मांडले जात आहे. त्यामध्ये सबळ कारण कोणते आणि कसे गृहित धरले जाणार? ज्या अपवादात्मक बदल्या होतील त्या ऑनलाइन की अन्य कोणत्या पद्धतीने याबाबत स्पष्टता करावी लागेल, हा निर्णय अंतिम होईपर्यंत अनेक बदल होतील, त्यात सुधारणा होतील. सोयीच्या ठिकाणी असणारे शिक्षक स्वागत करतील; परंतु जे वर्षानुवर्षे दुर्गम क्षेत्रात काम करतात, ज्यांना आंतरजिल्हा बदलीची प्रतीक्षा आहे, तसेच जे शिक्षक पती- पत्नी एकत्रीकरण, आजारपण अशा विविध कारणांनी बदली होईल, अशी अपेक्षा ठेवून आहेत, त्यांच्यासाठी समाधानकारक पर्याय द्यावा लागेल. शिक्षकांच्या वारंवार बदल्या करू नयेत, हा विचार पुढे येण्यामागे अनेक कारणे आहेत.

मुळातच सरकारी यंत्रणेतील बदल्यांमागे स्थानिक हितसंबंध वाढू नयेत हा प्रमुख उद्देश असतो. याउलट शिक्षकांचे स्थानिक पालक- मुलांशी ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावेत, असे अपेक्षित आहे. खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक कायमस्वरूपी त्याच शाळेत राहतात. त्याच धर्तीवर सातत्याने शिक्षक बदलले नाहीत तर विद्यार्थी, शाळा आणि शिक्षक हे नाते अधिक दृढ होईल. विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी शिक्षकांचे उत्तरदायित्व वाढेल. शिवाय, बदली आणि प्रशासकीय कामकाजामध्ये वेळ जाणार नाही, अशी भूमिका मांडली गेली आहे. शिक्षक ग्रामविकास विभागाचे कर्मचारी आहेत आणि ते शिक्षण खात्याच्या निर्देशानुसार काम करतात. त्यामुळे अधिकारी वर्ग शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच वागवताना दिसतात. शिक्षकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे समस्याही अधिक आहेत. अशा परिस्थितीत अपवाद वगळता बदली नाही, हा निर्णय अनेकांना अन्याय करणारा वाटेल. व्यापक धोरण ठरवताना, निर्णय घेताना अभ्यास गट स्थापन करण्याची आवश्यकता आहे. 

आजवरच्या बदली धोरणांचा, निर्णयांचा तसेच त्यावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांचा विचार करून नवे धोरण अंमलात आणले पाहिजे. घाई न करता नियमावली ठरविली पाहिजे. अन्यथा पुरेसे कारण देऊन बदली करता येईल, याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जाऊ शकतो. त्याबद्दलची स्पष्टता नसेल तर गैरप्रकारांना उधाण येईल. शिक्षक त्याच्या कुटुंबासोबत राहत असेल, तो स्थिर आणि समाधानी असेल तर तो अधिक परिणामकारक सेवा बजावू शकेल. सध्या पाच वर्षापर्यंत शिक्षक एकाच शाळेत राहू शकतो. तितका काळ तेथील गुणवत्ता विकासासाठी पुरेसा नाही का? तसेच उपक्रमशील, नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शिक्षकांचा अन्य शाळांतील विद्यार्थ्यांना लाभ देऊ नये का, असे प्रश्न नव्या बदली धोरणाला विरोध करणाऱ्यांकडून उपस्थित होत आहेत. ऑनलाइन बदल्यांपूर्वी गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. 

आजघडीला काटेकोरपणे ऑनलाइन बदल्या होतात. तरीही प्रतिनियुक्ती, तोंडी आदेश, निलंबनानंतरची नियुक्ती अशा अनेक भानगडी जिल्हा परिषदांमधून घडत असतात. मंत्र्यांनी बदल्यांसंदर्भात विधान केले आहे. पुढे ते मंत्रिमंडळासमोर ठेवले जाईल, धोरण होईल, निर्णय येतील तोपर्यंत विविध अंगाने चर्चा होत राहतील. मुळात सरकारी यंत्रणेतील बदली आणि शिक्षकांची बदली यामध्ये फरक करावा लागेल. शिक्षण व्यवस्थेत शाळा, विद्यार्थी केंद्रबिंदू आहे, हे समजून घेतले पाहिजे. शिक्षकांच्या प्रश्नांची, समस्यांची उकल करताना विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल राहील, बदल्यांच्या बदलत्या धोरणाने शिक्षणाचा खेळखंडोबा होणार नाही, याची दक्षता प्राधान्याने घ्यावी लागेल.

Web Title: Why not transfer teachers? Thinking of coming up with a new policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक