‘इग्नू’च्या फलज्योतिष-अभ्यासक्रमाला विरोध का करावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 07:46 AM2021-07-03T07:46:08+5:302021-07-03T07:47:13+5:30

कुणी म्हणेल, कशाचाही ‘अभ्यास’ करायला काय हरकत आहे? - पण ‘इग्नू’चा अभ्यासक्रम फलज्योतिषाचा प्रचार व धंदा करण्यासाठी आहे.

Why oppose IGNOU's astrology course? | ‘इग्नू’च्या फलज्योतिष-अभ्यासक्रमाला विरोध का करावा?

‘इग्नू’च्या फलज्योतिष-अभ्यासक्रमाला विरोध का करावा?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘फलज्योतिष हे विज्ञान का नाही?’ हे समजून घेण्यासाठी  खगोलशास्त्रज्ञ असण्याची गरज नाही. शालेय अभ्यासक्रमातील विज्ञानाचे ज्ञान आणि तर्कबुद्धी त्यासाठी पुरेशी आहे.

मुक्ता दाभोलकर

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच ‘इग्नू’ने २४ जून २०२१ रोजी ‘मास्टर ऑफ आर्ट्स इन ज्योतिष’ असा एक अभ्यासक्रम चालू केला. सरकारी अनुदानातून चालविल्या जाणाऱ्या या  प्रतिष्ठित केंद्रीय विद्यापीठाने भारतीय संविधानाच्या चौकटीत बसणारे शिक्षण देणे अनिवार्य आहे. फलज्योतिषाचे शिक्षण हे संविधानाच्या चौकटीत बसणारे शिक्षण नाही, कारण ते वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत आहे आणि संविधानातील कलम ५१ ए(एच)नुसार वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे.

फलज्योतिष हे विज्ञान का नाही?’ हे समजून घेण्यासाठी  खगोलशास्त्रज्ञ असण्याची गरज नाही. शालेय अभ्यासक्रमातील विज्ञानाचे ज्ञान आणि तर्कबुद्धी त्यासाठी पुरेशी आहे. विज्ञानाच्या विचारपद्धतीची सुरुवात गृहीतकांपासून होते व जगाच्या पाठीवर कोठेही गेले तरी ही गृहीतके  तीच राहतात म्हणजेच वैज्ञानिक सत्य हे सार्वत्रिक असते. अशा निश्चित गृहीतकांच्या आधारे भाकिते केली जातात व प्रयोगाच्या साहाय्याने ती भाकिते खरी की खोटी हे पडताळून पहिले जाते. फलज्योतिष या विषयातील गृहीतके जगभरच काय, आपल्या देशातल्या देशातदेखील सारखी नाहीत. कोणी राहू केतू हे ग्रह नसून केवळ छेदन बिंदू असलेल्यांना ग्रह म्हणून कुंडलीत स्थान देतात तर दक्षिणेतील ज्योतिषी मांदी नावाचा अजून एक तिसरा काल्पनिक ग्रह मानतात, पाश्चिमात्य ज्योतिषी हे तीनही ग्रह मानत नाहीत. म्हणजे कुंडलीत किती व कोणते ग्रह मांडायचे? तेच का मांडायचे? कशा पद्धतीने मांडायचे?- ही गृहीतकेदेखील सर्वत्र समान नाहीत. फलज्योतिष असा दावा करते की व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व हे व्यक्तीच्या जन्मवेळेवर अवलंबून असते व कुंडलीच्या आधारे त्याची अचूक माहिती ज्योतिषांना कळू शकते. बर्नी  सिल्व्हरमन या मानसशास्त्रज्ञाने केलेल्या एका अभ्यासात त्याने १६०० विद्यार्थ्यांना त्यांचे गुण, आवडीनिवडी इ. माहिती लिहून द्यायला सांगितली आणि फलज्योतिषाच्या पद्धतीनुसार त्यांच्या जन्मकुंडल्यांवरून त्यांचे स्वभाव, आवडीनिवडी याबाबतच्या भाकिताशी त्याची तुलना केली तेव्हा व्यक्तीच्या म्हणण्यानुसार तिचा असलेला स्वभाव व कुंडलीच्या आधारे केलेले स्वभावाचे भाकीत यात त्यांना कोणताही संबंध सापडला नाही.

एक असा युक्तिवाद केला जातो की कशाचाही ‘अभ्यास’ करायला काय हरकत आहे? परंतु इग्नूच्या फलज्योतिषविषयक अभ्यासक्रमात या विषयाचा चिकित्सक अभ्यास केला जात नाही. फलज्योतिषाचा अभ्यास करणे नव्हे, तर त्याचा प्रचार व धंदा करणे हा अशा अभ्यासक्रमाचा हेतू आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते गमतीने म्हणतात की, जगात अतींद्रिय शक्ती अस्तित्वात नाही याची दोन प्रकारच्या लोकांना नक्की खात्री असते. एक म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ता व दुसरे म्हणजे बुवाबाजी करणारा भोंदूबाबा. तद्वतच आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो त्यातील आंतरविसंगतींची फलज्योतिषाचा अभ्यासक्रम तयार करणाऱ्या व्यक्तींना नक्की जाण असणार त्यामुळेच त्या उघड होतील असे फल ज्योतिषाची चिकित्सा करणारे कोणतेही अभ्यास त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असणार नाहीत. कारण वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केल्यानंतर आपल्या हितसंबंधांना बाधा येत असली तरी सत्य स्वीकारावेच लागते. जे शिकवायचे आहे त्यातील खरे काय व खोटे काय ते बघणे व जे खरे असेल त्याचा अभ्यासक्रमात समावेश करणे ही ज्ञानार्जनासंदर्भातील एक मूलभूत अट हे अभ्यासक्रम पूर्ण करीत नाहीत. दोन हजार वर्षांपूर्वीचे आकलन नव्या ज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेतले पाहिजे. अशा अभ्यासक्रमातून किती तरी अपसमज, गैरसमज समाजमनात ‘वैध ज्ञान’ म्हणून रुजण्यासाठी मदत होऊ शकते. उदाहरणार्थ  अमावास्या - पौर्णिमेला मनोविकार बळावतात ही समाजात खोलवर रुजलेली अंधश्रद्धा आहे. एका बाजूला मानसिक आजारावर शास्त्रोक्त उपचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची निकड असताना चंद्राच्या कला आणि मानसिक स्वास्थ्य यांचा संबंध जोडून दाखवणारे शिक्षण त्याला ग्रहण लावेल. फलज्योतिषाच्या दृष्टिकोनातून ग्रहणांबद्दल माहिती सांगताना ‘ग्रहणकाळ अशुभ असतो ही अंधश्रद्धा आहे’ अशी चौकट अशा अभ्यासक्रमात टाकली जाईल का?

इग्नूच्या या अभ्यासक्रमात ‘तंत्र’ हा एक अभ्यासविषय असल्याचे समजते. तथाकथित तंत्रविद्येतील अघोरी उपचार करणे हा महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे.  शासनाचा कोणताही निधी किंवा मदत मिळणाऱ्या महाराष्ट्रातील एखाद्या शैक्षणिक आस्थापनेकडून अंधश्रद्धांना खतपाणी घालणारा फलज्योतिषाचा अभ्यासक्रम चालवला जात असेल तर तो बंद करण्यासाठीदेखील शासनाने योग्य ती पावले उचलावीत. कोणतेही ज्योतिष आणि कोणीही ज्योतिषी भविष्य सांगू शकत नाही याचा निश्चित अनुभव आपण कोविड काळात घेत आहोत. संकटकाळी शिकलेले धडे विसरण्यात अजिबात शहाणपणा नाही.

(लेखिका, अंध‌श्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ता आहेत)

muktadabholkar@gmail.com

Web Title: Why oppose IGNOU's astrology course?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.