अंदमान बेटांवरच्या आदिम जमाती का संतापल्यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 01:34 PM2018-12-04T13:34:36+5:302018-12-04T13:37:11+5:30
अंदमान बेटांवरील आदिवासी समाज प्रकाशझोतात येण्याचे कारण त्यांनी ठार केलेला एक अमेरिकी नागरिक. या बेटांवरील आदिवासींनी यापूर्वी परकीयांना ठार केलेले नाही, असे नाही; या बेटांनजीक मासेमारी करण्यासाठी गेलेल्या काही मच्छीमारांनाही त्यांनी यापूर्वी यमसदनी पाठविले होते.
- राजू नायक
अंदमान बेटांवरील आदिवासी समाज प्रकाशझोतात येण्याचे कारण त्यांनी ठार केलेला एक अमेरिकी नागरिक. या बेटांवरील आदिवासींनी यापूर्वी परकीयांना ठार केलेले नाही, असे नाही; या बेटांनजीक मासेमारी करण्यासाठी गेलेल्या काही मच्छीमारांनाही त्यांनी यापूर्वी यमसदनी पाठविले होते. या बेटांवर जाण्यास मनाई असतानाही हे लोक अतिसाहस करून तेथे गेले व प्राणास मुकले.
वास्तविक परकी मानवापासून त्यांना संसर्ग होऊ शकतो; असे मानून त्यांच्यापासून आधुनिक मानवाला दूर ठेवण्याचे भारत सरकारचे धोरण राहिले आहे. परंतु हल्लीच, ऑगस्टमध्ये आपल्या सरकारने पर्यटन धोरण थोडे सौम्य करून लोकांना तेथे जाण्यास मान्यता दिली. त्यानंतर तेथे जाण्यास देशी पर्यटकांची एकच रीघ लागली असून अंदमानमधील बेटे जोडण्यासाठी सरकारने २५०० कोटी रुपये खर्चून ३३३ किमी हमरस्त्याचे विस्तारीकरण हाती घेतले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत दुप्पट वाढ होण्याचा अंदाज आहे. सरकारी अंदाजानुसार प्रतिवर्षी अंदमान बेटांना पाच लाख पर्यटक भेट देतात. अंदमान-निकोबारमध्ये २४ बेटे आहेत व त्यात उत्तर सेंटिनल भागाचाही समावेश आहे; तेथे आदिम मानव अवस्थेतील हे लोक राहातात. त्यांच्याबद्दल खूप थोडी माहिती प्रगत जगाला आहे.
१९७० पासून भारतीय मानववंश सर्वेक्षण संस्थेद्वारे (एएनएसआय) तेथे जाण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या व त्यांतील काही मानवंशशास्त्रज्ञ डॉ. टी. एन. पंडित यांच्या नेतृत्वाखाली होत्या. त्यांनी कधी आपल्याबरोबर बेटांवरील इतर आदिवासींनाही मदतीला घेतले. २००३पर्यंत उत्तर सेंटिनल बेटांवरील आदिमानवांबरोबरचे हे प्रयत्न चालू होते. सुरुवातीला या आदिवासींनी प्रयत्नांना विरोध केला व धनुष्यबाणांनी प्रतिकारही केला. परंतु त्यानंतर ते ‘भेटी’ स्वीकारू लागले व बाहेरच्या ‘जगातील’ लोकांच्या ‘हातातून’ वस्तूही स्वीकारू लागले होते.
परंतु वास्तव हे आहे की बाहेरच्या जगाशी संपर्क न ठेवताही ते ‘जगू’ शकतात हे सत्य उघडकीस आले. अंदमानवरील इतर आदिवासी ओंगे किंवा जटावा यांनी बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवला आहे. मी या बेटाला सहा वर्षापूर्वी भेट दिली तेव्हा लोक रस्त्यांवर मोटारींनी जात, त्या थांबवून ते वस्तू मागत. त्यांच्याही अंगावर खूप कमी कपडे असत व काही तर जवळ जवळ नग्नावस्थेत असत, तर सेंतीनेली वंशाचे लोक मात्र हातात धनुष्यबाण घेऊनच शिकार करून जगतात. आदिमानवाचे हे पुरातन रूप आहे आणि त्यांना आहेय त्या अवस्थेत ठेवावे, लोकसंपर्क टाळावा असे मानले जाते.
दुर्दैवाने ‘सुमानी’च्या मोठ्या तडाख्यातूनही वाचलेले हे सेंटिनल बेटावरचे लोक आज केवळ ५० शिल्लक आहेत. मानववंशशास्त्रज्ञ मानतात की ३५ हजार वर्षापूर्वी ते आफ्रिकी खंडातून भारतात आले. हिमयुगामध्ये सागराचे पाणी कमी होते, त्यामुळे चालत किंवा गावठी होडय़ांमधून ते सुमात्रा, माले व बर्मा किना-यांवरून सध्याच्या ठिकाणी आले. सुरुवातीच्या या रहिवाशांमध्ये १३ भाषिक गट होते; त्यानंतर १८५८ मध्ये ब्रिटिशांनी तेथे पहिली वसाहत स्थापन केली. त्यानंतर मानवी संपर्क व रोगराई यात बरेचजण दगावले व ५० जण कसेबसे तग धरून राहिले आहेत.
मानववंशशास्त्रज्ञ मानतात की आदिमानव स्थितीत असलेल्या या लोकांशी जेवढा कमी संपर्क ठेवता येईल तेवढा ठेवून त्यांची जमात जतन करून ठेवावी. दुसरा वर्ग मानतो की मानवाला अभ्यासाच्या नावाखाली जनावरांपेक्षा वाईट अवस्थेत ठेवणो चूक आहे. जगातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी मात्र जगात जेथे जेथे अशी वसती आहे, तेथे कमीत कमी आधुनिक जगाचा संपर्क यावा, असाच दृष्टिकोन ठेवला आहे. त्यातूनच केंद्राने आपल्या पर्यटन धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे व ती करण्यात राष्ट्रीय वर्गीकृत जमाती आयोगाने पुढाकार घेतला आहे. परंतु सरकारी योजनांबरोबरच अंदमानमध्ये मोठय़ा प्रमाणात खासगी गुंतवणूक यावी यासाठी केंद्राचा प्रयत्न असून निती आयोग त्यासाठी अनुकूल आहे. अंदमानच्या बेटांवर ६५० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून बाहेरच्यांना प्रवेशबंदी असलेल्या भागांमध्येही विदेशी नागरिकांना नियम शिथिल करण्याचा विचार आहे. अमेरिकी नागरिकाच्या हत्येनंतर या बेटांवरील ‘विकासाला’ लगाम बसण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात.
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)