कबुतराच्या अंगावर गाडी का घातली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 08:41 AM2023-12-27T08:41:10+5:302023-12-27T08:41:54+5:30
रस्त्यावर बसलेल्या कबुतराच्या अंगावर मुद्दाम गाडी घातली आणि त्यात एका कबुतराचा मृत्यू झाला.
जपानच्या राजधानीत, टोकियो शहरात नुकतीच एक विचित्र घटना घडली. अत्सुकी ओझावा नावाच्या माणसाला टोकियो पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. टोकियोसारख्या प्रचंड मोठ्या शहरात एखाद्या माणसाला अटक होणं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होणं, ही तशी नित्याचीच बाब आहे. विचित्र आहे, ते गुन्ह्याचं स्वरूप. अत्सुकी ओझावा या माणसावर टोकियो पोलिसांनी लावलेला आरोप असा आहे की, त्याने रस्त्यावर बसलेल्या कबुतराच्या अंगावर मुद्दाम गाडी घातली आणि त्यात एका कबुतराचा मृत्यू झाला.
कबुतराकडे शांतीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं. काही लोकांच्या दृष्टीने कबूतर हा पवित्र पक्षी आहे, तर काही लोकांच्या दृष्टीने कबूतर हा शिकार करण्याच्या खेळात शिकार करण्याचा पक्षी आहे. जपानमधली जंगली कबुतरं ही सरकारच्या पूर्वपरवानगीने शिकार म्हणून मारायला परवानगी आहे. परंतु ही कबुतरं कधी मारायची? कुठे मारायची? किती मारायची? या सगळ्यांसाठी नियम आहेत. ते पाळूनच या कबुतरांची शिकार करता येऊ शकते. त्यातही या कबुतरांनी शेतीचं नुकसान केलं किंवा इतर कुठल्याही प्रकारे या कबुतरांचा माणसाला फार त्रास झाला, तर त्यांची शिकार करण्याची, तीही मर्यादित संख्येत, परवानगी मिळते; पण जपानमधल्या शहरी कबुतरांना मात्र जपानी सरकारने पूर्ण संरक्षण दिलेलं आहे. या कबुतरांची शिकार करण्यावर पूर्णतः बंदी आहे.
अनेक लोकांना या कबुतरांचा अतिशय राग येतो. ही कबुतरं उंच उंच इमारतींवर किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या इमारतींवर बसतात. तिथेच बसून शिटतात. कबुतरांची विष्ठा अॅसिडिक असते. त्यामुळे या इमारतींच्या पृष्ठभागाचं, रंगाचं फार नुकसान होतं. तिथला रंग खराब होऊन निघून जातो. कबुतरांनी अशा अनेक इमारती आणि पर्यायाने शहरं विद्रूप केली आहेत. कबुतरांमुळे काही माणसांना श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. यासारख्या कारणांनी कबुतरांचा राग राग करणारीही अनेक माणसं असतात. कदाचित अत्सुकी हा जपानी टॅक्सी ड्रायव्हर त्यांच्यापैकीच एक असेल.
ही घटना घडली त्या दिवशी अत्सुकी ओझावा हे सिग्नल हिरवा होण्याची वाट बघत थांबले होते. त्या सिग्नलच्या पलीकडे रस्त्यावर मोठ्या संख्येने कबुतरं बसलेली होती. सामान्यतः गाड्यांचे आवाज आले की, रस्त्यावर बसलेले हे पक्षी उडून जातात. मात्र, ओझावा यांनी पक्ष्यांना ती संधी न देता अचानक गाडीचा वेग वाढवला आणि ताशी ६० किलोमीटरच्या वेगाने कबुतरांच्या थव्यात गाडी घातली. अशी अचानक अंगावर गाडी आल्यावर त्या थव्यातील बहुतेक सगळी कबुतरं आपापला जीव वाचवून उडून गेली; पण एक कबूतर मात्र मृत्युमुखी पडलं.
गाडी अचानक रेझ केल्याच्या आवाजाने दचकलेल्या एका पादचाऱ्याने ही सर्व घटना बघितली. त्यानंतर पोलिसांनी त्या मृत कबुतराचं शरीर ताब्यात घेतलं. त्याची प्राण्यांच्या डॉक्टरने पाहणी केल्यावर त्या कबुतराच्या मृत्यूचे कारण हे ‘प्राणांतिक धक्का बसल्यामुळे’ आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ओझावा यांच्यावर त्या कबुतराला मुद्दाम मारल्याचा व वन्यजीव कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला.ओझावा यांनी यातला कुठलाही आरोप नाकारलेला नाही. उलट त्यांनी अशी भूमिका घेतली की, त्यांनी जे काही केलं ते त्यांच्या अधिकाराच्या कक्षेतच होतं. ते सिग्नल हिरवा झाल्यानंतर पुढे निघाले होते आणि त्यांनी सरळ रस्त्यावरच गाडी चालवली होती. ‘रस्ता हा माणसांसाठी असतो आणि त्यावर बसलेल्या कबुतरांनी वेळेत उडून जाणं, ही त्यांची जबाबदारी आहे.’ असं ओझावा यांनी म्हटलं आहे.
एका कबुतराचा मृत्यू झाला तरी गाडी चालकाला अटक करणारं जपान त्याच टोकियोमध्ये राहणाऱ्या कावळ्यांच्या बाबतीत मात्र तितकंसं उदार नाही. २००१ साली टोकियोमध्ये कावळ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यावेळी लोकांचा कावळ्यांवर खूप राग होता. कारण, कावळे हॉटेलवाल्यांनी बाहेर टाकलेल्या अन्नात चोच मारतात आणि कुठेही नेऊन टाकतात. पर्यायाने सगळं शहर घाण होतं. कावळ्यांचं मोठ्या प्रमाणावर शिरकाण झालं. इतर बाबतीत अत्यंत न्याय्य असलेल्या जपानमध्ये कावळे आणि कबुतरं या दोन उपद्रवी पक्ष्यांसाठी मात्र वेगवेगळे नियम आहेत, हे मात्र खरं!
३६,००० कावळ्यांविरुद्ध युद्ध
२००१ सालची गोष्ट आहे. टोकियोचे गव्हर्नर शिंतारो इशिहारा यांनी त्यावेळी टोकियोमध्ये असलेल्या सुमारे ३६,००० कावळ्यांविरुद्ध युद्ध पुकारलं होतं. टोकियोमधील कावळ्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या होत्या. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आज टोकियोमधील कावळ्यांची संख्या जवळजवळ दोन तृतीयांश इतकी कमी झालेली आहे.