माणसाने शिकायचे कशासाठी? फक्त पोट भरता यावे म्हणून?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 09:23 AM2022-11-21T09:23:34+5:302022-11-21T09:23:48+5:30

बदलत्या जगात कौशल्य आधारित शिक्षणाची गरज वाढती आहे हे मान्य; पण म्हणून शिक्षणाची बाकी सारी उद्दिष्टे एकदम मातीमोल ठरवून टाकायची?

Why should a person learn? - Just to be fed? | माणसाने शिकायचे कशासाठी? फक्त पोट भरता यावे म्हणून?

माणसाने शिकायचे कशासाठी? फक्त पोट भरता यावे म्हणून?

Next

प्रा. प्रणव खोचे, लासलगाव महाविद्यालय -

“यापुढे फक्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांना परवानगी नाही”- ही बातमी नुकतीच वाचली.  कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम असतील तरच महाविद्यालयांना परवानगी मिळेल, असे या शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे. त्यातच मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, रोजगार देणे आणि उद्योजक तयार करणे; हेच उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. हे सारे वाचून, ऐकून अस्वस्थता येते आणि काही महापुरुषांचे शिक्षणविषयक विचार आठवतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “व्यक्तीला तिच्या अस्तित्त्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय!”  तर स्वामी विवेकानंद म्हणाले होते, “माणसात असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण! तो माणूस घडवायला शिक्षकाने फक्त सहाय्य करायचं आहे. न पचविलेल्या माहितीची मेंदूतील सरमिसळ म्हणजे शिक्षण नव्हे. तर शिक्षण म्हणजे अशी प्रक्रिया, की ज्यामुळे चारित्र्य घडते, मन:शक्ती वाढते, बुद्धिमत्ता धारदार होते आणि ज्यामुळे माणूस स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो!”

शिक्षणाने रोजीरोटी कमावण्याची क्षमता विकसित केली पाहिजेच, पण माणसाने फक्त आपले पोट भरण्याचे साधन मिळावे म्हणूनच शिकायचे असते का? बदलत्या जगात कौशल्य आधारित शिक्षणाची गरज वाढती आहे हे मान्य; पण म्हणून  शिक्षणाची बाकी सारी उद्दिष्टे एकदम मातीमोल ठरवून टाकायची हा कुठला तर्क झाला?

 भाषा, साहित्य, मानव्यविज्ञान, सामाजिक शास्त्रे यांचा समावेश असणारी कला शाखा, आर्थिक बाबी, बँकांचे व्यवहार, कर रचना आदिंच्या अभ्यासाची वाणिज्य आणि  मूलभूत विज्ञान शाखा या सर्वांना एकदम तुच्छ दर्जा देण्याचा विचार सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि त्यामुळेच ही बातमी एकूण शिक्षण विचाराविषयी नकारात्मक वाटते. भाषा विषयांतून मिळणारी कौशल्ये मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी किती महत्त्वाची आहेत, हे वेगळे सांगायची गरज आहे का? साहित्यातून मिळणारी सहवेदना, माणुसकी, सद्सद्विवेक बुद्धी, वैश्विक बंधुत्व ही मूल्ये आजच्या काळात सर्वाधिक गरजेची आहेत. मानसशास्त्रातून मिळणारे माणसाला ओळखण्याचे ज्ञान निरूपयोगी म्हणता येईल का? असेच प्रश्न अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल आदी विषयांबाबत विचारता येतील. वाणिज्य शाखा ही निरूपयोगी कशी काय होऊ शकेल? मूलभूत विज्ञानाच्या सहाय्याने निसर्ग आणि विश्वाचे रहस्य उलगडणे महत्त्वाचे नाही का आता?
जर जगभरातील प्रगत देशांचा विचार केला तर या शाखांना तिथे आत्यंतिक आदर बहाल केलेला असतो. नोबेल पुरस्कार हे साहित्य, मूलभूत विज्ञान याच क्षेत्रात दिले जातात. अभियांत्रिकीस हीन लेखण्याचा हेतू अजिबात नाही. मात्र, पारंपरिक विद्याशाखांना आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीविषयी विशाद जरूर आहे. या विषयांना असेच मागे टाकले गेले तर आपले युवक हे कौशल्य असलेले परंतु भावनाहीन, मूल्यहीन यंत्रमानव बनण्याची शक्यता दूर नाही.

पारंपरिक विद्याशाखांचा उपयोग विद्यार्थी त्याच्या पायावर उभा राहण्यासाठी होत नसेल तर दोष त्यांचा नाही तर हे शिक्षण फक्त पुस्तकी व कौशल्यरहित ठेवणाऱ्या अभ्यास पद्धतीचा आहे. आज कितीतरी खासगी आस्थापनांमध्ये या शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना चांगला पगारसुद्धा मिळतो आहे. क्रिएटिव्ह हेड, प्रसिद्धीतज्ज्ञ, वैज्ञानिक, भाषांतरकार किंवा दुभाषी असे काही व्यवसाय वानगीदाखल सांगता येतील. कौशल्ये आणि मूलभूत ज्ञान याचा संगमच शिक्षणाचा मूळ उद्देश पूर्ण करू शकेल. केवळ कौशल्ये यंत्रमानव घडवतील, नागरिक नव्हे!
pranav.khoche@rediffmail.com

Web Title: Why should a person learn? - Just to be fed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.