श्रद्धा देवावरच का, माणूसपणावरही असावी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 08:50 AM2021-07-10T08:50:56+5:302021-07-10T08:56:13+5:30

जगभरातले शासक जेव्हा अश्‍वमेधाचा घोडा घेऊन धावत असतात तेव्हा त्यांना रणांगणावर पडलेल्या प्रेतांचा खच दिसत नाही हे सत्य आहे!

Why should faith be in God, it should also be in humanity! | श्रद्धा देवावरच का, माणूसपणावरही असावी!

श्रद्धा देवावरच का, माणूसपणावरही असावी!

Next

नीरजा, ख्यातनाम साहित्यिक

सध्याच्या अस्वस्थ वर्तमानातलं काय अधिक डाचतं? 
 फार मागे नको जायला, पण गेल्या वीसपंचवीस वर्षांत एक विचित्र घुसमटीचं वातावरण तयार होत गेलेलं दिसतं. कोरोनाकाळ हा त्याचा एक भाग. बाबरी पाडल्यावर उसळलेल्या दंगली, बॉम्बस्फोट, धर्माचं राजकारण, जागतिकीकरणातून तयार झालेला नवश्रीमंत वर्ग असा काळाचा पट पाहिला तर माणसं आत्मकेंद्री होत हळूहळू हिंसेकडे वळत गेलेली दिसतात. काय  खावं, प्यावं, ल्यावं, बोलावं, लिहावं, कसं जगावं याचे निर्णय ‘ठरावीक शक्ती’ घेतात असं अलीकडं दिसतंय. मी नव्यानं लिहायला लागले तेव्हा माझ्या त्या वर्तमानात जे घडत होतं ते मी मोकळेपणानं लिहू शकायचे. आज तुम्ही विशिष्ट गटातटांच्या विरोधी लिहाल तर झुंड तुमच्या मागे लागते. कधी प्रत्यक्षात, कधी व्हर्च्युअल. 

हे ट्रोलिंग मला कोरोनापेक्षा भयंकर वाटतं. कोविडची साथ भयानक आहेच, माझ्या आजी-पणजीनं गावंच्या गावं उठण्याच्या गोष्टी सांगितलेल्या आठवतात.  कठीण काळात माणूसपणाची, शासकांचीही परीक्षा तेव्हाही होत होती, आताही होणार. सामान्य माणसं या कसोटीवर अनेकदा खरी उतरताहेत. मात्र केवळ सत्तेचा विचार करणारे जगभरातले शासक जेव्हा अश्‍वमेधाचा घोडा घेऊन धावत असतात तेव्हा त्यांना रणांगणावर पडलेल्या प्रेतांचा खच दिसत नाही हे सत्य आहे.  या साथीतून आपण सगळे सुखरूप बाहेर पडू, पण ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या ‘समाजचित्रा’ची काळजी वाटते.  आपली जवळची, आसपासची माणसं भरडली जाऊ नयेत याचं भय स्वत:च्या नाहीसं होण्याहून जास्त असतं, याचा अनुभव मलाही कोरोनाने दिला.

सोशल मीडियावर तुम्ही नाही. लेखकानं सार्वजनिक राहाण्याच्या/होण्याच्या काळात खाजगीपणाचा संकोच अस्वस्थ करतो का?
 सोशल मीडियामुळे लोक बहिर्मुखी व कंठाळी होतात असं मला दिसतं. त्यातून खुजेपण येतं.  माझ्या लहानपणी बाबांकडे (डॉ. म.सु. पाटील) वेगवेगळी विचारसरणी असलेली लेखक, समीक्षक मंडळी येत असत. वाद, चर्चा रंगायच्या. पण दुसऱ्याचं ऐकून घेणं, बाजू मांडणं यात एक प्रकारची सभ्यता होती. आज सोशल म्हणवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर लोक आक्रमक होतात. मी तंत्रज्ञानविरोधी मुळीच नाही, मात्र मी वापरत असलेल्या माध्यमावर माझं विवेकपूर्ण नियंत्रण असावं असं मला वाटतं. सोशल मीडियात हा संयम माणसं गमावताना दिसतात. म्हणून मी जाणीवपूर्वक तिथे नाही.

 ‘प्रखर स्त्रीवादी’ अशी तुमची ओळख. काळानुसार ही संकल्पना बदलते आहे का?
बाईनं पुरुषाशी निष्ठावान राहाण्याचे, घरादाराची मर्जी राखत आदर्श स्त्री होण्याचे धडे समाज देत होता त्या काळात सानिया आणि गौरी देशपांडे यांच्या नायिका मला भेटल्या. धीट निर्णय घेणारी स्त्री टॉलस्टॉयच्या ‘अ‍ॅना कॅरेनिना’मध्ये भेटली. माझ्यात आधीपासूनच वसतीला असलेल्या बंडखोर स्त्रीशी जुळणारा विचार बाहेरच्या जगात  खूप आधी झाला आहे, यानं मला आणखी बळ मिळत गेलं.  

स्त्रियांचा आदर करणारं माझं घर, माझी आत्मनिर्भर आई,  त्यात माझा बंडखोर पिंड या साऱ्यातून माझी भाषाही घडत गेली. स्त्रीला केवळ शरीरानं ओळखणाऱ्या  पुरुषी मानसिकतेचा अनुभव तुमच्या वयात येण्याआधीपासून यायला लागतो. मलाही आला.  अशा पुरुषांविषयी चीड निर्माण व्हायची. ‘मला काढून टाकायचाय गर्भाशयाच्या वाटेवरचा त्याचा अहोरात्र पहारा’ यासारखी त्या वेळी बोल्ड वाटणारी अभिव्यक्ती त्यातूनच येत गेली. स्त्रीवादाची मांडणी वाचून व्यापक पातळीवरचं स्त्रीचं शोषण कळतं, पण या शोषणाविषयी बोलण्याची आणि लढण्याची उर्मी ‘आत’ असावी लागते. केवळ कोणती विचारधारा वाचून  तुम्ही त्या विचारसरणीचे होत नसता.  आजही स्त्री लढते आहेच, फक्त या लढ्यात तिच्यासोबत पुरुषही आहेत. असे बदल महत्त्वाचे. ते होत राहातील.

लेखकाच्या लेखनाची चरित्रात्मक समीक्षा होते हा तुमचाही अनुभव. त्याबद्दल काय सांगाल?
 लेखकाचं चरित्र तपासायला वाचकांना आवडतं. विशेषत: बाईनं काही स्फोटक किंवा तीव्र लिहिलं तर तिचं चरित्र आणि चारित्र्य याविषयीची शोधमोहीम सुरू होते. माझंही बरं चाललं आहे ना, असा प्रश्‍न लोकांना पडतो. खरंतर, साहित्य हे केवळ लेखकाचं वैयक्तिक जगणं नसतं.  अनेक कवी आत्मानुभवाविषयी बोलतात, पण माझी मुलं, कुटुंब, माझा वैयक्तिक भवताल इतकाच असतो का आत्मानुभव? हे विराट विश्‍व आहे भोवती. तुम्ही सगळ्या विश्‍वाशी जोडून घेत असता. जेव्हा ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर्स’ असं अमेरिकेत कुठंतरी म्हटलं जातं तेव्हा ते अस्वस्थ करत असतं मला.  आत्मानुभव हा वाचनापासून ते आपल्या जगण्यात आलेल्या प्रत्येक कडीतून उगवत असतो. त्याचा व्यक्तीपुरता संकोच करून आपण विस्तारित जगाच्या शक्यता गमावतो.

 तुम्ही निरीश्‍वरवादी! मग संभ्रमाचं, भीतीचं ओझं कुणावर टाकायचं?
धारणा घडत जातात. माझ्या घरी  संमिश्र वातावरण होतं. बाबा काहीच मानत नव्हते, आई जगरहाटीप्रमाणे थोडंफार करायची. पण ती हळूहळू थांबली. माणूस चंद्रावर गेला तेव्हा माझ्या आजीनं संकष्टी बंद केली. अनेकदा दुसऱ्यांचं अनुकरण करताना आपण काही अंधश्रद्धांचे बळी होतो. हे संभ्रमाचं धुकं विचारानं फिटत जातं. कॉलेजच्या दिवसात  कामू आणि सार्त्र यांनी झपाटून गेल्यावर मला एकाएकी सारंच निरर्थक वाटायला लागलं. अंधश्रद्ध होत चालल्याच्या जाणीवेनं अस्वस्थ झाले तेव्हा बाबा म्हणाले, ‘निरू, श्रद्धा ही ईश्‍वरावरच असते असं नाही. ती आपल्या कामावर, विचारावर, माणसावर, माणूसपणावरही असू शकते.’ 

मी म्हणाले, ‘मग माझी तुमच्यावर श्रद्धा आहे.’ तेव्हा मला थांबवत ते म्हणाले. ‘आंधळेपणाने कुणावर व कशावरही श्रद्धा ठेवायची नाही.’ - मनातलं भय दूर करण्यासाठी कोणी अज्ञात आणि अदृश्य मसीहा, देव, स्वामी वगैरे येईल यावर माझा विश्‍वास नाही. आपल्या आजूबाजूच्या माणसातला चांगुलपणा मदतीला येतो, त्यासाठी देव कशाला? ‘गॉड इज गुडनेस इन यू’ यावर श्रद्धा ठेवत देवाच्या नावानं राजकारण करून हिंसा घडवणाऱ्या लोकांना खरंतर प्रश्‍न विचारायला हवेत आपण. 
मुलाखत : सोनाली नवांगुळ
 

Web Title: Why should faith be in God, it should also be in humanity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.