कानडी-मराठीने का करावा एकमेकींचा द्वेष?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 05:11 AM2021-02-06T05:11:12+5:302021-02-06T05:12:00+5:30
Kandi-Marathi : कन्नड व मराठी भाषा तसेच संस्कृतीमध्ये शतकानुशतकांचं साहचर्य आहे. हा सांस्कृतिक पूल दोन्हीकडल्या माणसांना का नाही जोडून ठेवू शकत?
- उदय कुलकर्णी
(ज्येष्ठ पत्रकार)
कोणतीही भाषा व संस्कृती यांचा उद्देश समाजात संवादाचे पूल तयार करणं हा असतो. काळाच्या प्रवाहात राजवटी बदलतात, राज्यांच्या सीमा बदलतात त्याप्रमाणं भाषा व संस्कृती यांच्यावर पडणारा राजकीय प्रभावही बदलत असतो. खरंतर, भिन्न भाषा व संस्कृती यांच्यामध्ये आदान-प्रदान होत राहते तेव्हा दोन्ही भाषा व संस्कृती आणि माणसंही सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होत असतात. कन्नड व मराठी भाषा तसेच संस्कृती यामध्ये असं साहचर्य शतकानुशतके चालत आलेलं आहे. भाषावार प्रांतरचनेचा फतवा अंमलात आला आणि वादग्रस्त सीमा भागातील परभाषिकांकडे राज्यकर्ते जणू शत्रू म्हणून पाहू लागले. आपल्या राज्यातील परभाषिकांचं व त्यांच्या भाषेचं खच्चीकरण करण्याचा विडा उचलल्याप्रमाणं विशेषत: कर्नाटक सरकार गेली अनेक वर्षे वागत आलं आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांतील सत्तेवरचे पक्ष बदलले, पण या प्रश्नाबाबत दोन्ही राज्यांतील राजकीय नेत्यांची वक्तव्ये आक्रमकच राहिली. वास्तविक, दोन्ही भाषिकांना आपापल्या भाषांच्या विकासाची आणि समृद्धीची संधी मिळेल याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी होती. प्रत्यक्षात न्यायालय राज्यांच्या सीमेबाबत द्यायचा तो निर्णय देईल, पण त्याचा परिणाम मानवी संबंधांवर व सांस्कृतिक आदान-प्रदानावर होऊ नये.
आपण मराठी माणसं अण्णा, अप्पा अशी जी संबोधनं वापरतो त्यांचं मूळ कानडी भाषेत आहे हे आपल्याला माहीत आहे का? मराठी स्त्रिया अय्या किंवा इश्श असं म्हणतात तेव्हा ते शब्द तमिळ भाषेतून मराठीत आलेत हे तरी कुठे आपल्याला माहीत असतं? प्रख्यात गायक भीमसेन जोशी आणि गंगूबाई हनगल यांना एकमेकांशी बोलताना ज्यांनी ऐकलं असेल, त्यांचं भाग्य मोठं. भीमसेनांचं वास्तव्य नंतरच्या काळात पुण्यात आणि गंगूबाईंचं कर्नाटकात, पण गंगूबाईंनी ‘भीमण्णा’ अशी हाक मारली की भीमसेन ज्या प्रेमानं त्यांच्याकडं धावत जायचे ते प्रेम ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट होती. कोण कुठं राहतं या बाबी कलेच्या आड कधी आल्या नाहीत आणि म्हणूनच मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व यांच्यासारख्या गायकांवर मराठी माणसानंही भरभरून प्रेम केलं व कन्नडभाषिकांनीही!
प्राचार्य डॉ. व्ही. के. गोकाक हे प्रख्यात कन्नड साहित्यिक. ‘ज्ञानपीठ’ पारितोषिक मिळालेला हा साहित्यिक काही काळ सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमध्ये आणि नंतर कोल्हापुरातील छत्रपती राजाराम महाविद्यालयात प्राचार्य होता. या दोन्ही महाविद्यालयांत काम करताना त्यांनी तेथील शैक्षणिक दर्जा ज्या पद्धतीनं उंचावला त्यांची आपण केवळ ते कर्नाटकी म्हणून उपेक्षा करणं योग्य ठरेल का? डॉ. बाळकृष्ण यांचा महाराष्ट्राशी तसा काही संबंध नव्हता, पण त्यांनी इंग्रजी भाषेत पाच खंडांत शिवचरित्र लिहिलं.
कै. अलूर व्यंकटराय यांनी टिळकांचं ‘गीतारहस्य’ कानडीत भाषांतरित केलं आहे. साने गुरुजींच्या कथा, रणजीत देसाईंच्या कथा असं खूप काही मराठी साहित्य कानडी साहित्य रसिकांपर्यंत गेलं आहे; तर भैरप्पा, शिवराम कारंथ, गिरीश कार्नाड, सुधा मूर्ती, वैदेही, डॉ. चंद्रशेखर कंबार अशा अनेक कन्नड साहित्यिकांच्या भाषांतरित साहित्यकृती मराठी वाचक आजही आवडीनं वाचतात.
मराठी व कन्नड भाषेतील देवाणघेवाणीबाबत विचार करताना कै. डॉ. द. रा. बेंद्रे यांच्यापासून अगदी अलीकडच्या कै. पंडित आवळीकर, सौ. उमा कुलकर्णी अशा अनेकांचं स्मरण करावं लागतं.
एकमेकांच्या भाषेचा द्वेष करून किंवा बेताल वक्तव्य करून सतत सीमाभाग धुमसत ठेवण्यात कोणतं शहाणपण आहे?- याबाबत कर्नाटकमधील राजकारण्यांना जितक्या लवकर सुबुद्धी मिळेल तितक्या लवकर महाराष्ट्रातून त्यांच्या वेडेपणाला अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर मिळणं थांबेल!