सुशासन नेहमीच का नसावे?
By admin | Published: December 27, 2014 04:00 AM2014-12-27T04:00:40+5:302014-12-27T04:00:40+5:30
सुशासन दिवस पाळण्यापूर्वी मानव संसाधन मंत्रालयाने २५ डिसेंबरच्या दिवशी सुशासनावर मुलांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली
राजदीप सरदेसाई, ज्येष्ठ पत्रकार -
वर्षाची अखेर ख्रिसमसने होते, हे समीकरण माझ्या मनात पक्के रुजले आहे. त्या दिवसाने वर्षभराची उजळणी होते आणि मनाला आनंद मिळतो. आमच्या सरदेसाई कुटुंबात अनेक वर्षांपासून ख्रिसमसच्या दिवशी खायला टर्की कोंबडी, प्लम केक आणि वाईन असण्याची परंपरा आहे. आमच्या घरातील जुन्या ख्रिसमस ट्रीला आम्ही सजवतो. शेजाऱ्याला भेटायला जातो आणि त्यांना शुभेच्छा देत असताना, त्यांच्याकडील केकचा आस्वाद घेत असताना त्यांना ख्रिसमसची भेटही देतो.
माझ्या तरुणपणी माझे माता-पिता त्या काळातील ‘मुंबईचे मॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अकबरअलीज’च्या दुकानात जायचो. तिथे सांताक्लॉज हे प्रमुख आकर्षण असायचे. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर ख्रिसमसच्या दिवशी रात्रीच्या प्रार्थनेला गेलो असता, चर्चमधील घंटानाद मनाला वेगळेच समाधान मिळवून द्यायचा. ‘रुडॉल्फ द रेड नोज्ड रेनडियर’ हे गाणे जुन्या टेपरेकॉर्डरवर ऐकल्याशिवाय ख्रिसमसच्या उत्सवाची पूर्तताच व्हायची नाही.
पण, आता इंटरनेटवरील हिंदू लोक मला माझा धर्म विचारतात तेव्हा मी अभिमानाने सांगतो, की मी प्रत्येक धर्माचा उत्सव तितक्याच उत्साहाने साजरा करतो. या सणाच्या दिवशी गोड पदार्थ खाऊन त्या सणाचा आनंद घेतो. दिवाळीचा सण नातेवाइकांसह एकत्र साजरा करतो. त्यांच्यासह गोडधोड खाणे, फटाके फोडणे आणि घरावर रोषणाई करून आपण एक प्र्र्रकारे देवाचे पूजनच करीत असतो. होळीच्या सणात रंग खेळण्याचा आनंद मिळतो. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आलेल्या होळीच्या सणासोबत माझ्या मुलांसह खेळलेल्या होळीच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला माझ्या लहानपणीच्या आठवणी उफाळून येतात. विघ्नहर्त्या गणेशाचे चौपाटीवर विसर्जन करताना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची हमी श्रीगणेशाकडून घेण्यात येते. मी ईददेखील तितक्याच उत्साहाने साजरी करीत असतो. माझ्या मुस्लिम बांधवांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून इफ्तार पार्टीचा आनंद त्यांच्यासोबत घेतो. हरमिंदरसाहिब येथे गेल्याची आठवणही माझ्या मनात ताजी आहे. ‘गुरुबानी’चा आनंद घेत नदीतून केलेला प्रवासही मला आठवतो.
भारतात प्रत्येक ऋतूचे स्वागत सणांनी आणि उत्सवांनी करण्यात येते. या देशात सर्व तऱ्हेचे सण साजरे करण्याची संधी मिळते. येशूचे क्रूसावर चढणे, चर्च, मशिदी, मंदिरे आणि गुरुद्वारा यांच्या माध्यमातून सूफी संतांची, हिंदूंच्या संतांची आणि ख्रिश्चन धर्माची एकाच वडाच्या झाडाखाली भेट होते. हा वृक्ष जणू म्हणत असतो ‘उत्सव’! त्यामुळे ख्रिसमसचा दिवस हा सुशासनाचा दिवस म्हणून पाळण्याचा नरेंद्र मोदींचा निर्णय मला अस्वस्थ करतो. सणाच्या पावित्र्याचा राजकीय प्रतीकांशी अकारण संबंध प्रस्थापित करण्याचा हा निर्णय वाटतो. २५ डिसेंबर हा अटलबिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय या दोन महापुरुषांचा जन्मदिवसही आहे; पण मोदींनी त्याची ओळख वेगळ्या स्वरूपात करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
अटलजी हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते. राजकीय क्षेत्रात त्यांच्याकडे आदराने बघितले जाते, तेव्हा त्यांची ओळख याहून चांगली बाळगायला हवी होती. त्यांनी जेव्हा पाकिस्तानची बसयात्रा केली तेव्हा त्याचे वृत्तांकन करण्यासाठी मी लाहोरला गेलो होतो. त्यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील अविश्वासाचे वातावरण दूर करण्याचा प्रयत्न केला तसेच उभय देशांतील शत्रुत्व संपविण्यासाठी जी मुत्सद्देगिरी दाखविली त्याबद्दल त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यायला हवा होता. केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतरच वाजपेयींना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी एकमुखाने होऊ लागली. ही गोष्ट आपल्या देशातील राजकारणाची पक्षपाती वृत्ती दाखविते. वास्तविक, संपुआ सरकारने या आजारी नेत्याला यापूर्वीच ‘भारतरत्न’ उपाधी द्यायला हवी होती.
पंडित मदन मोहन मालवीय यांनाही याहून अधिक चांगला सन्मान मिळायला हवा होता. ते शिक्षणतज्ज्ञ होते आणि राजकारणीही; पण काँग्रेसच्या इतिहासकारांनी त्यांना ‘हिंदू राष्ट्रवादी’ बनवून टाकले. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी दिलेले योगदान झाकोळले गेले. शिक्षणासाठी त्यांनी केलेली बनारस विद्यापीठाची स्थापनाही उपेक्षिली गेली. अटलजींचे आयुष्य आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या स्मृती जपण्याची निकड पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत असेल, तर त्यावर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. प्रश्न हा आहे, की भारताच्या अनेक भागांत उत्साहाने साजरा केल्या जाणाऱ्या ख्रिसमसच्या दिवसाचीच त्यांनी सुशासन दिन पाळण्यासाठी निवड का करावी?
सुशासन दिवस पाळण्यापूर्वी मानव संसाधन मंत्रालयाने २५ डिसेंबरच्या दिवशी सुशासनावर मुलांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यावर भाषण देण्यासाठी मुलांवर त्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती केली होती. हा प्रकार एका वृत्तपत्राने उघडकीस आणल्यावर सरकारने माघार घेतली. त्या दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहणे हे वैकल्पिक होते, असा खुलासा करण्यात आला. हे इथेच थांबले नाही. सरकारतर्फे ख्रिसमसच्या दिवशी सुशासन दिवस पाळण्यात यावा, यासाठी वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यातून सुशासनाचा संदेश देण्यात आला. सुशासनाविषयी असलेली मोदी सरकारची बांधिलकी प्रशंसनीय आहे; पण प्रत्येक दिवस हा सुशासनाचा दिवस म्हणून का पाळण्यात येऊ नये? काही व्यक्तींच्या वाढदिवसाचा उपयोग त्यासाठी करणे हा सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यासारखे नाही का? आपल्या नेत्यांचे वाढदिवस या प्रकारे करण्याचा हा अट्टहास भारतात कशासाठी करण्यात येतो? काँग्रेस सत्तेवर असताना २० आॅगस्ट आणि १९ नोव्हेंबर हे दिवस राजीव गांधी आणि इंदिरा गांधींच्या आठवणीसाठी वापरले जात असताना, त्या दिवशीदेखील सरकारी खर्चाने मोठमोठ्या जाहिराती प्रकाशित केल्या जायच्या. लोकांकडून कराच्या रूपाने वसूल केलेल्या पैशाची ही उधळपट्टीच आहे. माजी पंतप्रधानांच्या आठवणी ठेवण्यासाठी याहून चांगले मार्ग नव्हते का?
जी गोष्ट संयुक्त पुरोगामी आघाडी करीत होती, तीच आपण अधिक चांगल्या प्रकारे का करू नये, हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ठरविलेले दिसते. जे चेहरे लक्षात ठेवायचे, तेच तेवढे बदलले आहेत. त्यामुळे महात्मा गांधींना घालवून त्यांच्या जागी दीनदयाळ उपाध्याय यांना आणण्यात येत आहे. एकीकडे, संघ परिवारांकडून ख्रिश्चनांचे स्वरूप राक्षसी असल्याचे दर्शविण्यात येत असतानाच सुशासनाच्या कल्पनेचा पुरस्कार करण्यात येत आहे. संघ परिवाराने धर्मांतराविषयी ओरड करून ‘घरवापसी’च्या नावाने धर्मांतराचा प्रकार पुढे रेटण्याचा प्रकार सुरू केला आहे. देशातील अल्पसंख्याक समाजाचा पवित्र सण ख्रिसमस हा अनेक वर्षांपासून राष्ट्रीय सण म्हणून साजरा होत असताना तो रद्द करून त्या दिवशी राज्याकडून पुरस्कृत केलेला सुशासन दिवस साजरा करण्यासाठी याहून चुकीची वेळ दुसरी असूच शकत नाही.
जाताजाता - संसदीय व्यवहारमंत्री वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे, की २५ डिसेंबर रोजी अटलजी यांचा जन्म झाला, त्याला आपण काय करू शकतो? त्यांनी सर्वसमावेशक वृत्ती बाळगण्याचे आणि देशाचे बहुरंगी स्वरूप मान्य करणाऱ्या या माजी पंतप्रधानांनाच विचारावे, की त्यांनी अशा स्थितीत काय केले असते?