नारायण राणेंनी ‘भाजपा’त का जाऊ नये ?

By राजा माने | Published: September 1, 2017 03:02 AM2017-09-01T03:02:21+5:302017-09-01T03:03:11+5:30

सुशीलकुमार शिंदेंची राणे सोलापुरातील मेळाव्याला हजर राहतील अशी अपेक्षा फोल ठरली. शेवटी ‘राणेंनी भाजपात का जाऊ नये?’ या सवालाचा अर्थ ज्याने त्याने आपल्या सोयीनेच घ्यावा...

Why should not Narayan Ranee go in BJP? | नारायण राणेंनी ‘भाजपा’त का जाऊ नये ?

नारायण राणेंनी ‘भाजपा’त का जाऊ नये ?

Next

सरला आठवडा पावसाच्या चर्चेचा होता. त्यामुळे नारायण राणे भाजपात जाणार हा विषयही मागे पडला. रविवारी सोलापुरात इंदिरा गांधी व वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आ.प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय नेते मोहनप्रकाश यांच्या साक्षीने राज्यातील जवळजवळ सर्वच नेत्यांचा मोठा मेळावा घेतला. त्या मेळाव्याला नारायण राणे मात्र आले नाहीत. शनिवारी राणे येतीलच असा विश्वास सुशीलकुमारांनी व्यक्त केला होता. भाजप प्रवेश चर्चेच्या पार्श्वभूमीवर नारायणदादांचे न येणे तसे खटकणारे होते. पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या सुशीलकुमारांनी ‘कात टाकावी’ असे मी ‘लोकमत’ आॅनलाईन आवृत्तीला काही दिवसांपूर्वी लिहिले होते. त्यावर राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने ‘सुशीलकुमारांना का त्रास देताय?’ असा मिश्किल सवालही फोनवर केला होता. कोणी काहीही म्हणो, सुशीलकुमारांनी कात टाकली की नाही हे माहीत नाही पण त्यांनी काम मात्र सुरू केले. त्या कामाचा भाग म्हणूनच इंदिरा गांधी व वसंतदादांच्या जन्मशताब्दीचा सोहळा थाटात पार पाडला, असे म्हणायला हरकत नाही. त्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘नारायण राणेंनी भाजपमध्ये का जाऊ नये?’ हा सवाल मनोरंजक आणि विचार करायला भाग पाडणारा ठरतो. या सवालाचा अर्थ काय, राणेंनी भाजपमध्ये जावे की न जावे? ज्याला जो हवा तो अर्थ त्याने घ्यावा. पण सोलापुरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेसजनांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे अशीच परिस्थिती आहे.
२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्टÑातील सर्वच जिल्ह्यातील काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे नेते हे आत्मविश्वास हरवून बसले आहेत. कुठलीही भूमिका नाही, दिशा नाही केवळ प्रत्येकाने आपल्या ‘गॉडफादर’च्या तोंडाकडे आशेने पाहत बसायचे! हे चित्र प्रत्येक जिल्ह्यात अनुभवायला मिळते. त्यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यातील दोन्ही पक्षांचे गावपातळीवरील कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांतदादा पाटील, सुभाष देशमुख या भाजपच्या नेत्यांनी हीच बाब हेरली आणि जिल्ह्या-जिल्ह्यातील काँग्रेस व राष्टÑवादीचे तथाकथित नेते गळाला लावले. भाजप गळ टाकत असताना काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे राज्य पातळीवरील तथाकथित नेते काय करीत होते? सोलापूरसारख्या जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांची सदस्य संख्या सत्ता मिळविण्यास पुरेशी असूनही सत्ता मात्र भाजपच्या हातात जातेच कशी? असेच प्रश्न राज्यातील सर्वच जिल्ह्यातील काँग्रेस व राष्टÑवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत आहेत. या पार्श्वभूमीवर राणेंनी भाजपमध्ये का जाऊ नये? या प्रश्नाला खूप महत्त्व येते. दिल्लीपासून गल्लीपर्यंतची सर्व सत्तास्थाने काबीज करण्याचा सपाटा भाजपने लावला. तो लावत असताना प्रत्येक जिल्ह्यातील विरोधकांची पद्धतशीर नाकेबंदी करण्याची काळजीही त्यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर सैरभैर झालेल्या जिल्हा पातळीवरील नेत्यांना आधार देण्याची जबाबदारी घ्यायला कोणीही समर्थपणे पुढे न आल्यामुळे भाजप प्रवेशाची लाट राज्यभर गतिमान होत आहे. राणे व त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत मात्र फक्त त्या लाटेचा नियम लावता येणार नाही. नारायणदादांचा मूळ पिंड हा शिवसैनिकाचा! तरीही काँग्रेस संस्कृतीची झूल पांघरुण ते सातत्याने आपली मूळ आक्रमकता दडवत आले. उद्धव ठाकरेंशी पंगा घेत त्यांनी सेना सोडली म्हणून त्यांच्या लेखी त्यांचा पहिला राजकीय शत्रू शिवसेना. सेनेच्या लेखी काँग्रेसपेक्षा राणे हाच त्यांचा एक नंबरचा राजकीय शत्रू ! शत्रुत्वाच्या या गणितात आज भाजपच्या ‘शत्रू त्रैराशीका’त सेनेचा शत्रू तो आपला मित्र असे सूत्र मांडले जाणारच. त्या सूत्रानुसार आज काँग्रेसचे असले तरी राणे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांना मित्र वाटणारच ! त्यांची मैत्री पक्षाच्या मुळावर येऊ नये म्हणून काँग्रेसने काय केले? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेतृत्वाला आणि राणेंनाही सापडत नसावे. त्याचमुळे ‘राणेंनी भाजपमध्ये का जाऊ नये?’ या प्रश्नाचा अर्थ ज्याने त्याने आपल्या सोयीने घ्यावा, अशीच परिस्थिती आहे.

Web Title: Why should not Narayan Ranee go in BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.