स्त्रियांची कौमार्य चाचणी ‘अभ्यासात’ तरी कशाला हवी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 05:39 AM2021-06-04T05:39:13+5:302021-06-04T05:39:42+5:30

वैद्यकशास्त्रात कोणताही आधार नसलेली कौमार्य चाचणी हा विषय वैद्यकीय अभ्यासक्रमातूनही तातडीने काढून टाकण्यात यावा!

Why should a womans virginity test be studied | स्त्रियांची कौमार्य चाचणी ‘अभ्यासात’ तरी कशाला हवी?

स्त्रियांची कौमार्य चाचणी ‘अभ्यासात’ तरी कशाला हवी?

googlenewsNext

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

गेल्या तीन दशकांपासून अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे काम करत आहे. गेल्या दशकापासून समितीने ‘जात पंचायत मूठमाती अभियान’ हा स्वतंत्र विभाग केला आहे. त्या अंतर्गत जात पंचायतीच्या अन्याय, अत्याचार व मनमानीविरोधात काम केले जात आहे. जात पंचायत ही समांतर न्याय व्यवस्था असून लोकशाहीला घातक आहे. जात पंचायतचे न्यायनिवाडे व शिक्षा या अंधश्रद्धेवर आधारित असून अनिष्ट व अघोरी कुप्रथांचा अवलंब त्यातून होतो. विशेषत: महिलांवर होणाऱ्या अन्यायाचे अनेक दाहक प्रकार समोर आले आहेत. चारित्र्य तपासणीसाठी उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढणे, झाडाचे पान ठेवलेल्या हातावर तप्त लालबुंद कुऱ्हाड ठेवणे, गुप्तांगात मिरचीची पूड कोंबणे, पंचांची थुंकी चाटणे, विविध कारणाने वाळीत टाकणे आदी शिक्षा जात पंचायतीकडून महिलांना दिल्या जातात.



कौमार्याची परीक्षा अशीच ही अघोरी कुप्रथा आहे. एका समाजात तर मुलीवर बलात्कार झाला असेल तर तिच्या गुप्तांगात कोंबडीचे अंडे घालून कौमार्याचा निकाल दिला जातो. दुसऱ्या एका समाजात लग्नाच्या रात्री पंचांनी दिलेली पांढरी शुभ्र चादर वधू व वराने शय्या म्हणून वापरायची असते. काही वेळाने जात पंचायत बसते व त्यात ते वस्त्र तपासले जाते. त्यावर रक्ताचा लाल डाग असेल तर लग्न ग्राह्य धरले जाते. अन्यथा वधूचे चारित्र्य शुद्ध नाही समजून तिला शिक्षा दिली जाते. तिला मारहाण केली जाते. तिच्या आयुष्यात कोणत्या पुरुषाशी  तिचा लैंगिक संबंध आला याची विचारणा केली जाते. तिच्या पित्याला आर्थिक दंड केला जातो. दंडाची रक्कम पंच आपसात वाटून घेतात. अशा महिलेला आयुष्यभर एकटे राहावे लागते. ही कौमार्याची परीक्षा घेणारे कुणी अडाणी नसून उच्चशिक्षित पंच आहेत. अगदी परदेशात शिक्षण घेतलेलेपण यातून सुटलेले नाहीत.



अशा समाजातील काही पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते याविरोधात उभे ठाकले आहेत. काहींनी या कुप्रथेविरोधात जाऊन कौमार्य चाचणी झुगारून बंड केले, हे आश्वासक आहे. पण, त्यांना समाजातून बहिष्कृत व्हावे लागले. कौमार्य चाचणीचा व चारित्र्याचा काहीही संबंध नसतो. अगदी खेळताना, सायकल चालवताना, व्यायाम करताना स्त्रीच्या गुप्तांगातील पातळ पडदा फाटू शकतो, असे प्रबोधन अभियानाकडून  केले जाते. मात्र पंचांकडून परंपरेच्या नावाखाली कौमार्य चाचणीचे समर्थन केले जाते. तरीही सुसंवादाची भूमिका समितीने कायम ठेवली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने शासन दरबारी अनेक बैठका झाल्या. शासनाने अशी कौमार्य चाचणी घेण्यावर बंदी आणली आहे. तसे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.



शासन कौमार्य चाचणीबाबत संवेदनशील आहे, ही लढ्याला बळ देणारी बाब असली तरी कुप्रथांना उत्तेजन देण्याचे काम  वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून होत आहे. वैद्यकशास्त्राच्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या न्यायवैद्यकशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात ‘टू फिंगर टेस्ट’चा उल्लेख आहे. त्यानुसार बलात्कार पीडित स्त्रीच्या गुप्तांगाची  तपासणी करून तिच्याशी शारीरिक संबंध झाले किंवा नाही ते ठरविले जाते. स्त्रीच्या कौमार्य पटलाचे माप व योनी मार्गाचा लवचीकपणा यांचे परीक्षण केले जाते. परंतु ही चाचणी अवैज्ञानिक व अशास्त्रीय आहे. अभ्यासक्रमात खरी कुमारी व खोटी कुमारी याचे काही निकषही दिले आहेत. कौमार्य चाचणी ही केवळ स्त्रीची केली जाते. पण पुरुषांच्या कौमार्य चाचणीचा यात उल्लेख नाही. कौमार्य हा खूपच वैयक्तिक विषय आहे. कौमार्य चाचणीच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होते. प्रत्येक  डाॅक्टरच्या हाताच्या बोटांचे माप वेगळे असते. शिवाय स्त्रीने हस्तमैथुन केले असेल तर तेही गृहीत धरले जात नाही. कौमार्य चाचणी ही अवैद्यकीय असल्याचे अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांच्या बोलण्यातून पुढे आले आहे.

वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयाचे प्राध्यापक डाॅ. इंद्रजित खांडेकर यांनी अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास दिला आहे. विद्यापीठाने त्यावर एक समिती तयार केली आहे. वैद्यकशास्त्रात कोणतेही संशोधन न झालेली कौमार्य चाचणी हा विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानने केली आहे. 

या आशयाचे निवेदन आम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री, राज्यपाल व महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू यांना दिलेले आहे. ज्या पुस्तकात कौमार्य चाचणीचा उल्लेख केला आहे अशी पुस्तके विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सुचवू नयेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हे सर्व केल्यास देशासाठी तो एक पथदर्शक निर्णय ठरेल.
krishnachandgude@gmail.com

Web Title: Why should a womans virginity test be studied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.