अध्यात्माचा विसर का पडतोय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 06:54 PM2019-06-18T18:54:03+5:302019-06-18T19:06:45+5:30
मिलिंद कुलकर्णी धर्म, अध्यात्म किंवा धार्मिक आणि अध्यात्मिक या संकल्पनांविषयी समाजजीवनात संभ्रमाचे वातावरण दिसते. धर्म म्हणजे काय, अध्यात्म कोणते ...
मिलिंद कुलकर्णी
धर्म, अध्यात्म किंवा धार्मिक आणि अध्यात्मिक या संकल्पनांविषयी समाजजीवनात संभ्रमाचे वातावरण दिसते. धर्म म्हणजे काय, अध्यात्म कोणते याची व्याख्या, विवेचन अनेकांनी केलेले आहे. पण दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करताना गल्लत होताना दिसतेय. लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या माध्यमांकडून देखील अशीच कृती होताना दिसत आहे. यासंबंधी विचारमंथन करण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या जगातील सर्वात मोठ्या अध्यात्मिक संस्थेने राजस्थानातील माऊंट अबू येथे राष्टÑीय संमेलन घेतले. त्यात सहभागी झाल्यानंतर देशभरातील विविध पत्रकारांच्या भूमिका समजून घेता आल्या.
एकीकडे केवळ अध्यात्म हा एकमेव विषय घेऊन चालणाऱ्या दूरचित्रवाहिन्या आहेत, दुसरीकडे वाचकांची मागणी असल्याने वर्तमानपत्रात दैनंदिन स्वरुपात अध्यात्माविषयी मजकूर दिला जात आहे. त्यासोबत हिंसक घटना, गुन्हेगारी कृत्ये याविषयी वेगवेगळे कार्यक्रम, कथा सादर करणाºया वाहिन्या आणि मुद्रित माध्यमे आहेत. अध्यात्म व गुन्हेगारीविषयक दिवसभर चालणारे कार्यक्रम असो की, ठराविक जागेत येणारा मजकूर असो..दोघांनाही चांगला श्रोता वा वाचक वर्ग आहे. वेगवेगळे धर्म, पंथ, संप्रदाय, संस्था, प्रवचनकार, कीर्तनकार हे रसाळ भाषेतून अध्यात्म उलगडून सांगत आहेत. बोजड भाषेतील तत्त्वज्ञानापेक्षा रसाळ भाषेतील भावार्थ लोकांना आवडतो, समजतो. जीवनातील, संसारातील छोट्या छोट्या उदाहरणांवरुन ते अध्यात्मातील संकल्पना लोकांना उलगडून सांगतात, तेव्हा हे अध्यात्म पुस्तकी वाटत नाही, जवळचे वाटते.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयासारख्या अध्यात्मिक संस्था आणखी पुढचा विचार करताना दिसत आहेत. अध्यात्माचा प्रचार, प्रसार करीत असताना प्रत्येक घटकाने त्याच्या दैनंदिन जीवनात अध्यात्माचा अंगिकार करायला हवा. उक्ती आणि कृतीमध्ये समानता दिसायला हवी, तरच लोकांना त्या घटकावर विश्वास बसतो. पत्रकारांनी वार्तांकन करताना नकारात्मक बाबींना महत्त्व न देता सकारात्मक गोष्टींवर भर द्यायला हवा. संमेलनात झालेल्या चर्चेनुसार, गुन्हेगारी किंवा हिंसक कृत्यांची संख्या सुमारे ५ ते १० टक्के असावी. परंतु, त्या घटनांची प्रसारमाध्यमांवरील व्याप्ती ही ८० ते ९० टक्कयांवर असते. दूरचित्रवाहिन्यांवरील ठळक बातम्यांमध्ये त्याचे प्रत्यंतर आपल्याला येते. अर्थात अलिकडे बदल होऊ लागला आहे. बहुसंख्य वर्तमानपत्रे आता मुखपृष्ठावर अपघात, खून अशा घटनांची छायाचित्रे प्रसिध्द करीत नाहीत. सकारात्मक बातम्या देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. या उपक्रमांचे लोक स्वागत देखील करतात.
कोणताही धर्म हा हिंसा शिकवत नाही. सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय अशाच कथा, प्रसंग आपल्या बहुसंख्य धर्मग्रंथांमध्ये दिसून येतील. परस्परांचा द्वेष करु नका, असे धर्मसंस्थापक सांगताना दिसतात. मग जगभर धर्मा-धर्मांमध्ये वाद का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. धर्मातील अध्यात्मिक मूल्याकडे झालेले दुर्लक्ष याला कारणीभूत आहे, असे मला वाटते. आम्ही सोयीचे तेवढे तत्त्वज्ञान उचलतो, तेच घेऊन भूमिका बनवितो. त्यातून हे संघर्ष उभे राहतात. अशा स्थितीत लोकशाहीच्या चारही स्तंभांनी तारतम्य भाव ठेवून कर्तव्यपालन केले तर हे प्रसंग टाळता येऊ शकतात.