असे जीवघेणे साहस कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 09:50 PM2020-09-02T21:50:00+5:302020-09-02T21:50:05+5:30

मिलिंद कुलकर्णी जीवन अनमोल आहे, असे आपण म्हणत असलो तरी जीवावर उदार होऊन जेव्हा काही लोक अकारण साहस करतात, ...

Why such a life threatening adventure? | असे जीवघेणे साहस कशासाठी ?

असे जीवघेणे साहस कशासाठी ?

Next

मिलिंद कुलकर्णी
जीवन अनमोल आहे, असे आपण म्हणत असलो तरी जीवावर उदार होऊन जेव्हा काही लोक अकारण साहस करतात, ते का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. यंदाही गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींचा तलाव, नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे.
खान्देशकन्या शीतल महाजन ही स्कायडायव्हींगमध्ये विश्वविक्रम करणारी तरुणी आहे. शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेऊन तिने असे अनेक साहसी पराक्रम केले. एखाद्या विषयात पारंगत होऊन धाडस करणे वेगळे आणि अतिआत्मविश्वासाने पराक्रम करायला जाणे वेगळे. असा हा फाजील आत्मविश्वास जीवघेणा ठरतो आणि स्वत:चा जीव गमावण्यासोबत संपूर्ण कुटुंबाला दु:खाच्या खाईत लोटतो, हे कटुसत्य लक्षात घ्यायला हवे.


पावसाळ्यात वर्षा सहलीची मजा काही और असते. यंदा कोरोनामुळे हा आनंद घेता आला नाही. पण तरीही नियमभंग करीत अनेक जण धबधबे, नदी - नाले याठिकाणी गेले. प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे, अटकाव करणे शक्य नाही. त्यातून दुर्घटना घडल्या. पाणी बघीतल्यावर त्यात उतरण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. जलतरण तलावात पोहण्याचा सराव असलेली मंडळी उत्साहाने आणि विशेषत: मित्रमंडळींना कसब दाखविण्यासाठी नदी, तलावांमध्ये उतरतात. जलतरण तलावातील स्थिर पाणी, सुरक्षित वातावरण आणि नदी, तलावातील पाणी, खोली यात फरक असतो. कुठे डोह असतो, कुठे भोवरा असतो, त्याचा अंदाज नसल्याने दुर्घटना घडतात. एक जण बुडायला लागला की, त्याचे मित्र, सहकारी त्याला वाचवायला जातात आणि तेदेखील बुडतात. पुरेशी काळजी न घेता, खबरदारी न घेता केलेले हे साहस अंगलट येते आणि कुटुंबाला अंधाराच्या खाईत ढकलते.


पावसाळ्यात अनेक ठिकाणी फरशी पुलांवरुन पुराचे पाणी वाहते. मोठे पूल नसल्याने असा प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतो. त्यामुळे फरशी पुलावरुन पाणी कमी होण्याची वाट पाहायला हवी. अनेक जण तसे करतात. परंतु, काहींना भलतीच घाई झालेली असते तर काहींना आपल्या धाडसीवृत्तीचा परिचय करुन द्यायचा असतो. त्यातून दुर्घटना घडतात. संयम हा खूप महत्त्वाचा असतो, हे अशा घटनांमधून कळते.


मोबाईलद्वारे घेतली जाणारी सेल्फी हे देखील दुर्घटनांचे मोठे कारण आहे. किल्ले, दरी -डोंगर, धबधबे, नदी -तलाव याठिकाणी जाऊन निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायला हवा. पण हा आनंद कॅमेराबध्द करण्याची धडपड अनाठायी वाटते. हे दुष्टचक्र आहे. धोकेदायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, हे वेड जीव घेणारे ठरत आहे. असे फोटो काढून ते फेसबूक, व्हॉटस अ‍ॅप अशा समाजमाध्यमांवर टाकले जातात. आपल्या आवडी, छंद जगजाहीर करणे, त्याचे प्रदर्शन करणे आणि त्याला आभासी जगतात पसंती मिळावी, यासाठी ही धडपड असल्याचे दिसून येत आहे. त्यातून अचाट पराक्रम केले जातात आणि ते अंगलट येत असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी तरुणाईचे कुठे तरी प्रबोधन व्हायला हवे. आभासी जग आणि वास्तवातील जग यातील अंतर, फरक त्यांना कळण्यासाठी समाजाकडून प्रयत्न व्हायला हवे, हे प्रकर्षाने जाणवते.


पालकांच्या दुर्लक्षाकडे अंगुलीनिर्देश केला जातो. पण पालकांना पूर्ण दोष देऊन चालणार नाही. पालकांची अवस्था अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे. स्वत: पालकांच्या धाकात वाढलेली, त्यामुळे अंगी शिस्त बाणलेली ही पालकांची पिढी एकविसाव्या शतकात पाल्यांना स्वातंत्र्य देण्याच्या भूमिकेपर्यंत आली आहे. आपण नाही मोकळेपणाने जगू शकलो, पण मुलांना तसे जगू देऊया, असा विचार करणारे बहुसंख्य पालक आहेत. पाल्यांचे स्वतंत्र जग आहे, त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात जास्त डोकावू नये, म्हणून आताशा पाल्यांसाठी स्वतंत्र खोल्या आल्या आणि पालकांनी त्यांना स्वातंत्र्य दिले. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,याची जाणीव पाल्यांनी ठेवायला हवी. त्यासोबतच पालकांनीदेखील अगदी निर्धास्त राहून चालणार नाही. पाल्याचे मित्र कोण, तो कोणाकडे जातो, त्याच्याकडे कोण येतो, सवयी काय, पैशांचा विनियोग कसा करतो, यासंबंधी किमान चौकस रहायला हवे. लक्ष ठेवायला हवे. ढवळाढवळ नको, पण लक्ष असायला हवे. त्यातून पाल्यांवर नैतिक दडपण राहते. एकंदरीत गोळाबेरीज केली तर परिपक्वता, समंजसपणा आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो, हे लक्षात येते.

Web Title: Why such a life threatening adventure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.