नावे बदलण्याचा पोरकट खेळ कशासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 09:36 AM2023-02-08T09:36:41+5:302023-02-08T09:41:28+5:30
‘मुघल गार्डन’चे नामकरण ‘अमृत उद्यान’ करणे या पोकळपणातली लाक्षणिकता फार धोकादायक आहे. संस्कृती, वारसा जपण्याशी त्याचा काहीही संबंध नाही.
पवन वर्मा, राजकीय विषयाचे विश्लेषक -
या देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून शहरे, रस्ते, जागा यांची नावे बदलणे आपल्याला काही नवीन नाही. वसाहतवाद्यांनी पुसून, झाकोळून टाकलेला आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुन्हा जिवंत करण्याचा अधिकार स्वतंत्र देशाला नक्कीच आहे. अगदी ताजे उदाहरण म्हणजे ‘मुघल गार्डन’चे नामांतर ‘अमृत उद्यान’ असे करण्यात आले.
खरे तर विल्यम मस्टो या ब्रिटिश उद्यानविद्या जाणकाराने हे उद्यान मुघलांच्या पारंपरिक उद्यानांच्या धर्तीवर तयार केले होते. मुघलांची शैली म्हणून ब्रिटिशांनी या उद्यानाला नाव दिले ‘मुघल गार्डन!’
भारतात १८ कोटी मुस्लिम राहतात. देशातील तो सर्वात मोठा अल्पसंख्य समाज असून, जगातल्या मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारत येतो; परंतु भाजपची अशी समजूत आहे की जणू ते अस्तित्वातच नाहीत किंवा सगळे मूळचे हिंदूच आहेत. त्यांनी या देशाला जे योगदान दिले ते सहज पुसता येईल, या विचित्र अट्टाहासाने देशाची बहुरंगी वीण विस्कटण्याचा धोका असतो, शिवाय भारताची परदेशात प्रतिमा बिघडते ती वेगळीच. मुस्लिम आक्रमकांनी या देशावर अत्याचार केले हे खरे आहे; पण त्याच्या आठवणी आज काढणे, नावे बदलणे, आजच्या मुस्लिमांना त्यांच्या पूर्वजांनी शतकांपूर्वी आपल्यावर अन्याय केला होता म्हणून सारखेच तोलणे यासारख्या लाक्षणिक गोष्टी म्हणजे राजकीय हेतूंनी प्रेरित टोकाचा राष्ट्रवाद होय.
केवळ नावे बदलण्यापलीकडे आपण आपला वारसा सांभाळण्यासाठी काय केले? आपल्याकडची शिक्षणपद्धती ब्रिटिशांनी आणली. तिच्यात आपण थोडेच बदल केले. आपल्या इतिहासाची पुस्तके पुनर्रचित केली गेलीच नाहीत. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे राजकीय अंतरंग फारच थोडे अभ्यासले गेले. तेच महाभारताच्या शांतिपर्वाचे! भक्तिकाळातील अभूतपूर्व प्रबोधन पुढची सहा दशके टिकून राहिले. अत्यंत महत्त्वाची अशी भक्ती कविता त्यातून जन्माला आली; परंतु हे सारे आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या परिघावरच राहिले. तत्त्वज्ञान तसेच जीवनाचे अध्यात्म या भारतीय संस्कृतीने दिलेल्या मौल्यवान गोष्टी तत्त्वज्ञान विभागात कोंडल्या गेल्या.
आजही आपल्याकडे पाश्चिमात्य विचारांचाच प्रभाव दिसतो. जेमिनी, कपिल, गौतम, कानडा, पतंजली आदि शंकराचार्य यांच्यासारख्या महान तत्त्ववेत्त्यांची नावे अनेकांना ठाऊक नसतात. नालंदा विद्यापीठाची महान कामगिरी अभ्यासक्रमात क्वचितच दिसते. भारतीय गणिती आणि खगोल विज्ञानाचा पुरेसा संदर्भ न घेता आपल्याकडे विज्ञान शिकवले जाते. इंग्रजी अभ्यासक्रमांना मागणी असते; पण पाणिनीने व्याकरणात केलेले अष्टाध्यायीसारखे काम, भाषाशास्त्र तसेच व्युत्पत्तीशास्त्र यात झालेले मोठे काम, संस्कृत तसेच अन्य भारतीय भाषांत निर्माण झालेले अभिजात साहित्य याकडे प्राय: दुर्लक्षच होत आले. आपल्या अभिजनांच्या शाळांना शेक्सपिअर माहीत असतो; पण कालीदास नाही!
आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत रामायण महाभारतासारख्या महान महाकाव्यांना स्थान नाही. तुलसीदास तसेच थिरूवल्लुवर यांच्या लक्षणीय अशा शिकवणुकीकडे दुर्लक्षच होते. जीवनातील चार आश्रम, भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग, धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही जीवनाची ध्येये किंवा चारी पुरुषार्थातील उल्लेखनीय समतोल याला आपण शैक्षणिकदृष्ट्या फारसे महत्त्व दिलेले नाही. देशी म्हणी, वाक्प्रचार याचा मोठा खजिना आपल्याकडे आहे; पण शिक्षणक्रमात त्याचा अंतर्भाव दिसत नाही. भरतमुनींचे नाट्यशास्त्र कदाचित जगातले पहिले सर्वसमावेशक असे कलांवर प्रकाश टाकणारे पुस्तक असेल; पण आजही ते फार कुणाला माहीत नाही. भारताने सौंदर्यशास्त्रातही मोठे योगदान दिले आहे. आपला रससिद्धांत तर जगात केवळ आपल्याकडेच आहे. मात्र, अगदी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनाही तो ठाऊक नसतो. आपल्या कला शाखेचे अभ्यासक्रम आजही पाश्चिमात्य संकल्पनांनीच ठासून भरलेले असतात.
आपल्या सांस्कृतिक सुविधाही गचाळ आहेत. देशात जागतिक दर्जाची परिषद केंद्रे किंवा भव्य सभागृहे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. आपली बहुतेक स्मृतिस्थळे मोडकळीला आलेली आहेत, विद्रूप झाली आहेत! नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नॅशनल म्युझियम अशा ठिकाणी आपल्या समृद्ध संस्कृतीचा खजिना भरलेला आहे; पण वर्षातून फार थोडे प्रेक्षक तेथे भेट देतात.
अभिजात संगीत, नृत्य, याची मोठी वैभवशाली परंपरा आपल्याकडे प्राचीन काळापासून आहे. गुरू-शिष्य परंपरेचा भाग म्हणून कलावंतांना शिक्षण देण्यासाठी सरकारने आजवर काय केले? हम्पीत झालेल्या अभिजात संगीत-नृत्याच्या महोत्सवात एरवी प्रेक्षक फिरकत नाहीत, असे कारण देऊन बॉलीवूड कलाकार नाचवले गेले. बहुतेक विद्यापीठांचे मानव्यविद्या विभाग मठ्ठ लोकांनी भरले आहेत. भारतीय नाटकांची अवस्था शोचनीय आहे. अनुदान नाही, प्रेक्षकांची हमी नाही, महाराष्ट्र, बंगालमध्येच काय ती बरी स्थिती आहे.
परंपरा सांभाळायची तर साधनसामग्री लागते. २०१९-२० मध्ये सांस्कृतिक मंत्रालयावर नक्त देशांतर्गत उत्पन्नाच्या ०.०१२ टक्के खर्च झाले. (आदल्या वर्षाच्या तुलनेत १५ टक्के कमी) ताज्या अर्थसंकल्पात केवळ अल्पशी वाढ मिळाली आहे. सांस्कृतिक विषय प्राधान्याचा नाही. त्यात खासगी सहभाग आणण्यासाठी स्थापन झालेला राष्ट्रीय सांस्कृतिक निधीही सुप्तावस्थेत गेला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुघल गार्डन’चे नामकरण ‘अमृत उद्यान’ करणे हा पोकळपणा झाला. त्यात धोकादायक लाक्षणिकता दडलेली आहे. संस्कृती, वारसा जपण्याशी त्याचा काहीही संबंध नाही.