जनतेला धमक्या कशासाठी?

By Admin | Published: December 27, 2016 04:26 AM2016-12-27T04:26:45+5:302016-12-27T04:26:45+5:30

देशाच्या पंतप्रधानपदी आजवर जे १६ जण येऊन गेले, त्यातल्या इंदिरा गांधींचा दरारेवजा अपवाद वगळता मोदींएवढा जनतेला धमक्या ऐकवणारा दुसरा पंतप्रधान झाला नाही.

Why threatens the masses? | जनतेला धमक्या कशासाठी?

जनतेला धमक्या कशासाठी?

googlenewsNext

देशाच्या पंतप्रधानपदी आजवर जे १६ जण येऊन गेले, त्यातल्या इंदिरा गांधींचा दरारेवजा अपवाद वगळता मोदींएवढा जनतेला धमक्या ऐकवणारा दुसरा पंतप्रधान झाला नाही. मुंबईच्या समुद्रात छत्रपती शिवाजीराजांच्या स्मारकाचे जलपूजन करताना आणि पुण्यातल्या मेट्रोचे भूमीपूजन करताना मोदींनी जी भाषणे दिली ती याच धारदार नमुन्याची होती. ‘बेईमानांना झोपी जाऊ देणार नाही’, ‘करबुडव्यांना स्वस्थता लाभू देणार नाही’, ‘आजवरच्या सरकारांनी करबुडव्यांविरुद्ध कठोर कारवाई न केल्यानेच आज देश बँकांसमोर रांगा लावून उभा राहिला आहे, मी तसे होऊ देणार नाही, इ.. इ..’ याआधी त्यांनी व त्यांच्या पाठीराख्यांनी ‘मोदींना विरोध करणारे देशद्रोही आहेत, नोटबंदीला विरोध ही पाकिस्तानला मदत आहे, सरकारवर टीका करणारे देशाचे शत्रू आहेत’ अशी वक्तव्ये ऐकविली आहेत. त्याही अगोदर देशाच्या नागरिकांचे प्रामाणिक व अप्रामाणिक असे व त्याहीपुढे जाऊन रामजादे आणि हरामजादे असे विभाजनही त्यांनी केले आहे. जनतेला भीती दाखवून राज्यकारभार करणे ही लोकशाही नव्हे. तो फॅसिझमचा देशी अवतार आहे. मोदी बोलायला लागले आणि त्यांनी नुसते ‘भाईयों और बहनों’ एवढे म्हटले तरी आता ते काय आघात करतील याची काळजी लोकांना वाटू लागते. दरवेळी ते अप्रामाणिकांना व करबुडव्यांनाच भीती घालतात असे नाही. साधी प्रामाणिक माणसेही त्यांच्या डरकावण्यांना भीत असतात. चलनबदलाचा त्यांचा निर्णय हा असाच सामान्य माणसांच्या आयुष्यावर आघात घालणारा ठरला आहे. या आघाताच्या जखमा फेब्रुवारी २०१७ पर्यंत भरून निघतील असे मोदी सांगत असले तरी येत्या संबंध वर्षात नोटांची तंगी कायम राहील असे त्यांचेच अर्थमंत्री अरुण जेटली आता म्हणत आहेत. यातला खरा प्रश्न दरडावणीच्या या भाषेतून पंतप्रधान खरोखरीच्या चोरांना आणि करबुडव्यांना धाक दाखविताना न दिसणे हा आहे. ललित मोदी पळाला, विजय मल्ल्या पळाला. ही दोन्ही माणसे केंद्रातील वजनदारांच्या मदतीने सहीसलामत देशातून निसटली आणि तसे निसटताना त्यांनी देशाला हजारो कोटींचा गंडाही घातला. ही माणसे आता इंग्लंडची सन्माननीय नागरिक आहेत आणि तेथील राजघराण्यातील मेजवान्यांत दरबारी माणसांसोबत दिसू लागली आहेत. एवढ्या काळात जे सरकार देशाच्या परदेशस्थ गुन्हेगारांना देशात आणू शकले नाही ते या बड्यांना आणू शकणार नाही हे उघड आहे. याहून मोठा व महत्त्वाचा प्रश्न जनतेला भय घालण्याविषयीचा आहे. ‘ही तर सुरुवात आहे. यापुढे आणखी गंभीर व मोठ्या कारवाया यायच्या आहेत’ असे वेळोवेळी लोकांना बजावत राहण्यातून जनतेच्या मनात एक भयगंड उभा होतो आणि प्रामाणिक लोकही त्या गंडाचे शिकार होतात. त्यातून मोदी एकवार बोलले की त्यांचे चेले दहावार बोलतात. मग ते विरोधी नेत्यांना धमकावतात, टीकाकारांची टवाळी करतात. बँकांसमोरच्या रांगात उभे राहणे ही देशभक्ती असल्याची भंकस भाषा बोलतात आणि मोदींचे शत्रू हे देशाचे गुन्हेगार असल्याची आरोळी ठोकतात. आणीबाणीत लोकांनी सरकारी यंत्रणेचे असे भय अनुभवले आहे. तेव्हाच्या कारवाया घटनेनुसार आणि कायद्याला अनुसरून होत होत्या. आता घटना नाही, कायदा नाही. मात्र त्यांचा आधार न घेताच लोकांना भीती घालण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे. मोरारजींचे सरकार कर्मठ होते, राजीव गांधींचे कार्यक्षम व लोकाभिमुख तर विश्वनाथ प्रताप सिंगांचे हंसतमुखाने देशात दुही माजवणारे. मोदींचे सरकार त्याच्या घोषणाबाजीतून जनतेला दरडावीत सुटले आहे. या दरडावणीचे परिणाम दलितांत दिसले, अल्पसंख्यकांतही ते पहायला मिळाले. ज्यांना कायदा, पुढारी, सरकारी यंत्रणा यांच्या दारात उभे राहण्याचे मुळातच भय वाटते त्या सामान्य प्रामाणिक स्त्रीपुरुषांनाही आता ते वाटू लागले आहे. हेन्केन नावाचा अमेरिकी पत्रकार एकदा म्हणाला, ‘जनतेच्या मनात एखाद्या नसलेल्या बागुलबुवाविषयीचा भयगंड निर्माण करायचा आणि त्या बुवापासून तुमचे रक्षण केवळ मी करणार आहे, असे सांगायचे याचे नाव राजकारण आणि पुढारीपण.’ मोदी नेमके असे राजकारण सध्या करीत आहेत. आश्चर्य याचे की त्यांचे सहकारी त्यांच्या या भाषेविषयी व दरडावणीविषयी जराही कुठे बोलताना दिसत नाहीत. कारण एकतर ते स्वत: त्यांच्यामुळे भयभीत आहेत आणि जनतेनेही असे भयाच्या छायेत रहावे असे त्यांना वाटत आहे. कधीकाळी आपल्या खात्यात १५ लाख रुपयांची भर घालू म्हणणारे मोदी ते हेच काय, असा प्रश्न अशावेळी जनतेच्या मनात उभा होत असेल तर तो तिचा दोष नव्हे. लोकशाहीत लोक राजे असतात आणि ते निर्भय असावे लागतात. आपले राजकीय व अन्य निर्णय त्यांना स्वत:च्या बळावर घ्यायचे असतात. आजवर या देशातली जनता अशी निर्भय राहिली. गुन्हेगारांना पूर्वीही शासन होतच होते. करबुडव्यांना कायदा लागू होतच होता. मात्र समाजाला धमकावण्याचे प्रकार याआधी असे कधी झाले नाहीत. समाजाला धमकावणे ही जनतेचा आपल्यावरील विश्वास अपुरा असल्याचे वाटायला लावणारी सरकारची मानसिकता आहे. ती राजकारणाला फॅसिस्ट वळण देणारी आहे. जनतेला धमकावण्याऐवजी तिला विश्वासात घेणे हे खऱ्या लोकशाहीचे लक्षण आहे.

Web Title: Why threatens the masses?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.