कशाला उद्याची बात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:34 AM2017-10-03T02:34:41+5:302017-10-03T02:34:54+5:30
अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे.
अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे. जीएसटीमुळे महसुलात वाढ झाली, तर कदाचित जीएसटीचे दर कमी करण्याचा विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. म्हणजे जीएसटीमुळे झालेल्या महागाईबद्दल ते बोलायलाच तयार नाहीत. माझा गल्ला भरला की काय देता येईल का, ते पाहीन, अशी व्यापारी वृत्ती त्यांच्या बोलण्यातून दिसते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा हे सण संपून आता दिवाळी तोंडावर आली आहे. पण महागाई कमी होण्याचे नाव नाही. हल्ली शिलाई महाग असल्याने बरेच जण रेडीमेड कपडे घेतात. दिवाळीत नवे कपडे घेतले जातात. पण ते खूप महाग आहेत. कापडावरील जीएसटीमुळे व्यापारीही त्रासून गेले आहेत. फटाक्यांचे तामिळनाडूतील अनेक कारखाने २८ टक्के जीएसटीमुळे बंद पडले आहेत. फटाक्यांच्या बॉक्सवर १२ टक्के जीएसटी आहे. पण फटाका उद्योग बंद पडत असल्याने बॉक्स उत्पादक व कामगार अडचणीत आले आहेत. दिवाळी आणि मिठाई यांचे नाते आहे. पण मिठाई व चॉकलेट्सवर अरुण जेटली यांनी २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावला आहे. काही मिठाईवर तो कमी असला तरी सुक्या मेव्यामुळे तीही महागच झाली आहे. परिणामी दिवाळी तुम्हाला त्रासात आणि महागाईतच जावो, असाच संदेश मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिला आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यावर २८ टक्के जीएसटी लावला तरी ते स्वस्त होईल. पण कोणतीही वस्तू स्वस्त मिळूच नये, असा पणच जणू जेटली यांनी केला आहे. आता विमानाला लागणारे इंधन महागले. त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार नाही, असे अनेकांना वाटते. मात्र विमानाने मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. त्यालाही इंधन दरवाढीचा फटका बसणार. डिझेल दरवाढीमुळे अन्नधान्यापासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच महाग होत आहे. या महागाईची झळ अरुण जेटली वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसत नाही. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना बसत असेलच की. पण तेही बोलायला तयार नाहीत. त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. मनामध्ये प्रचंड खदखद आहे, दुसºया पक्षाचे सरकार असते, तर मोर्चे, आंदोलने करता आली असती. पण तेही करणे शक्य नाही. उलट या महागाईचे समर्थन करायची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे म्हणजे घरात महागाईचे चटके सहन करायचे आणि बाहेर सरकारच्या निर्णयाचे नित्यनेमाने गुणगाण गायचे, असेच आहे. दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेने मात्र महागाईविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. मोदी व जेटली यांनी गुजरातसह पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याचा विचार करून तरी यावर तोडगा काढावा. पण महागाईला तोंड द्यावे लागत असताना, पंतप्रधान मात्र स्वच्छ भारताचे नारे देत आहेत. भारत स्वच्छ असू नये, असे कुणीच म्हणणार नाही. पण प्राधान्य महागाई कमी करायला हवे. ते कुठेही होताना दिसत नाही. रेशनवर जे धान्य घेतात, ते मिळत नाही, साखरेचा कोटा सरकारने कमी केला आहे. त्यामुळे मध्यमवर्गच नव्हे, तर गरीबही पिचत चालला आहे. जीएसटीचे दर प्रसंगी कमी करू असे सांगणारे जेटली, त्या करव्यवस्थेतील अडचणीही कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे छोट्या व्यापाºयांची अवस्थाही वाईटच आहे. महिन्यातून तीन-तीनदा विवरणपत्रे भरण्याच्या अटीमुळे ते अतिशय चिडले आहेत. हा खरे तर भाजपाचे समर्थन करीत आलेला वर्ग. पण तोही भरडून निघत आहे. त्यामुळे जेटलीजी, आता कशाला उद्याची बात? ‘उद्या’चा वायदा कधीच नसतो. त्यामुळे आजचे काय ते बोला!