चहापेक्षा किटली गरम का होते?
By Admin | Published: June 27, 2016 03:39 AM2016-06-27T03:39:14+5:302016-06-27T03:39:14+5:30
‘मंत्र्यांचे पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम’ अशी उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत केली.
‘मंत्र्यांचे पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम’ अशी उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत केली. चहापेक्षा किटली गरम होण्याला जबाबदार कोण? मंत्री कमी पडतात म्हणून पीएंचे फावते की मंत्री पीएंच्या नादी लागत आहेत? राज्य सरकारमधील काही भाजपा मंत्री पीएंमुळे अडचणीत आले आहेत, तर सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, त्यांचे खासगी सचिव सुनील माळी यांच्यामुळे आरोपांचे धनी ठरले आहेत. आरोग्य खात्यातील मनमानी बदल्या करताना माळींची भूमिका काय होती ही बाब आता लपून राहिलेली नाही. नियमांची चौकट पाळून सगळे काही केल्याचा देखावा निर्माण केला जात असला, तरी बदल्यांमधून कोणाला किती टॉनिक मिळाले याची उघड चर्चा विभागामध्ये आहे. गडकरीजी सांगतात, चहापेक्षा किटली गरम झाली आहे. तसे होण्यासाठी मंत्रीच अधिक जबाबदार आहेत. त्यांना एक तर विषय कळत नाहीत आणि कळून घेण्याची त्यांची तयारी नसते. ते वाजवीपेक्षा जास्तच ‘पीएवलंबी’ होऊन जातात. आपली भूमिका ही मंत्र्यांना साहाय्य करण्याची आहे, याचा विसर पीएंना पडतो. असे का होते?
मंत्र्यांना आपली इप्सितं पीएंमार्फत साध्य करायची असतात. पीए मग त्यांना वेगवेगळे मार्ग सांगतात आणि त्यातून संगनमताचा नवा अध्याय सुरू होतो. महादेवापेक्षा नंदीला अधिक भाव येतो. महादेवाला कोण भेटेल कोण भेटणार नाही, याचा निर्णय नंदी घेऊ लागतो तेव्हा गडबड होते. गडकरीजी! सगळा दोष पीएंचा नाही. त्यांना विविध प्रकारच्या ‘व्यवस्था’ करण्यास मंत्र्यांकडून सांगितले जाते. मंत्र्यांच्या बंगल्यावरील जेवणावळींपासून साहेबांच्या नातेवाईक, चेलेचपाट्यांच्या विमानवाऱ्यांची काळजी त्यांना घ्यावी लागते. मग पीए लोक यंत्रणेला कामाला लावतात. दहा पैसे गोळा करताना दोन पैसे स्वत:कडे ठेवून घेण्याचा आपला हक्कच आहे अशी त्यांची भावना बनते. मंत्र्यांचा विभागावर वचक असेल आणि त्यांना काही वरकमाई करायची नसेल तर पीएंचे फावणारच नाही. मंत्री कार्यालयात सौजन्यशील वागणूक मिळत नसल्याच्याही कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील सुमित वानखेडे, दिलीप राजूरकर, पंकजातार्इंचे पीए डॉ. नरेश गिते, ऊर्जामंत्र्यांसोबतचे विश्वास पाठक अशांकडून इतरांनी सौजन्य शिकायला हरकत नाही.
प्रशासनावर पकड कशी असावी? दादासाहेब कन्नमवार हे लोकनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना टी. जी. देशमुख नागपूरचे महापौर होते. टीजींनी नागपूरसाठी त्यावेळी २० लाखाचा निधी मागणारा अर्ज कन्नमवारांंसमोर मंत्रालयात धरताच त्यांनी मंजुरीची सही दिली. दुसऱ्या दिवशी टीजींना बंगल्यावर चहासाठी बोलावले. कन्नमवारांनी विचारले, माझ्या कारभाराबद्दल लोक काय बोलतात? त्यावर टीजी म्हणाले, आपण लोकनेतेच आहात पण प्रशासन अधिक समजावून घेतले तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल. हे ऐकताच कन्नमवारांनी दुसऱ्या क्षणी तेव्हाच्या मुख्य सचिवांना बोलावून घेतले आणि ‘मी काल टीजीच्या अर्जावर २० लाख मान्य केले ते तुम्ही कमी केले का, अशी विचारणा केली. त्यावर, मुख्य सचिव होय म्हणाले. कन्नमवारांनी मग मुख्य सचिवांना झाडले. ज्या हेडमधून मी नागपूरसाठी २० लाख मंजूर केले त्यात तेवढा निधी देता येत नाही हे मलाही माहिती होते. तरीही टीजीला मला ते द्यायचेच होते. मुख्यमंत्री मी आहे, आपण ते परस्पर कमी का केले? तुम्ही तसे केल्याने मला प्रशासन समजत नाही, असा टीजीचा गैरसमज झाल्याचे कन्नमवार म्हणाले आणि त्यांनी टीजींना नागपूरसाठी २० लाखच द्या, असे बजावले. लोकविद्यापीठात शिक्षण घेतलेल्या कन्नमवारांसारख्या नेत्यांचा तो काळ होता. पुस्तकी ज्ञान नसले तरी मंत्र्यांची प्रशासनावर पकड होती.
सातवी पास वसंतदादा हे एक यशस्वी मुख्यमंत्री होऊ शकले. बरेचदा असेही बघायला मिळते की विरोधी पक्षात असताना सभागृहात आणि सभागृहाबाहेरही अत्यंत आक्रमक असे नेते हे मंत्री म्हणून तेवढे यशस्वी झाले नाहीत. नामांकित वकील हा नामांकित न्यायाधीश होतोच असे नाही आणि वकिलीत फारशी गती नसलेले चांगले न्यायाधीश मात्र झाले असा अनुभव आहेच. मुख्यमंत्री आणि चारदोन मंत्री सोडले तर आजच्या सरकारला ‘आवाका’ नाही, हा दोष दोन वर्षे होत आली तरी कायम आहे.
जाता जाता : चहापेक्षा किटली गरम होऊ नये या दृष्टीने मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात, ‘लॅक आॅफ टॅलेंट आणि ‘लॅक आॅफ एक्सपिरियन्स’ची उणीव मुख्यमंत्री दूर करतील, अशी अपेक्षा आहे.
- यदू जोशी