शरद पवार नरेंद्र मोदींना का भेटले असतील? संजय राऊत, ईडीच्या कारवाया की आणखी काही...

By यदू जोशी | Published: April 8, 2022 12:11 PM2022-04-08T12:11:12+5:302022-04-08T12:14:51+5:30

Sharad Pawar & Narendra Modi: राजकारणात व्यवहार असतोच. त्या २५ मिनिटांत व्यवहार काय झाला, ते समजेलच! या भेटींची उकल होण्यासाठी काही तास नव्हे, दिवस लागतात!

Why would Sharad Pawar have met Narendra Modi? | शरद पवार नरेंद्र मोदींना का भेटले असतील? संजय राऊत, ईडीच्या कारवाया की आणखी काही...

शरद पवार नरेंद्र मोदींना का भेटले असतील? संजय राऊत, ईडीच्या कारवाया की आणखी काही...

googlenewsNext

- यदु जोशी
(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)

दाेन दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  दिल्लीत भेटले आणि तर्कवितर्कांना उधाण आलं. सगळ्यांच्या मनात एकच शंका : पवार मोदींना का भेटले असतील? - नंतर पवार यांनी पत्र परिषद घेऊन भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील सांगितला. मोदी तर भेटीविषयी काही सांगणार नाहीत. त्यामुळे पवार बोलले त्यावर विश्वास ठेवूनच या भेटीचा अर्थ शोधला पाहिजे किंवा त्यापलीकडे जाऊन काही अंदाजदेखील बांधता येऊ शकतात. ‘पॉलिटिकल गॉसिपिंग’ हे नेहमीच होत असते. खा. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते असले तरी ते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. एकाला खोकला झाला की दुसऱ्याला लगेच सर्दी होते, असे एक आमदार गमतीने म्हणत होते.

राऊत यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उचलल्यानंतर पवार यांनी मोदींची भेट घेतली. हा योगायोग असावा की पवार यांचे राऊत यांच्यावरील विशेष प्रेम? अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतरही पवार मोदींना लगेच भेटले नव्हते. यावरून राऊत यांचे महत्त्व लक्षात यावे. पवार एकूणच ईडीच्या गैरवापराबद्दल मोदींशी बोलले म्हणतात. म्हणजे अनिल देशमुख, नवाब मलिक, अजित पवारांचे नातेवाईक यांच्यावरील कारवाईचा संदर्भदेखील आलाच असेल. पुढच्या टप्प्यात पवार घराण्यातील आणखी काही अगदी जवळच्या व्यक्ती ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता हेही भेटीचे महत्त्वाचे कारण असू शकते, असा दावा भाजपचे काही नेते खासगीत करतात. महाविकास आघाडी सरकारवरील कोणत्याही संकटाबाबत मोदींशी चर्चा करू शकतील, असे पवार एकच नेते आहेत. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचा मोदींकडे जाण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना-भाजपमधील टोकाचा संघर्ष बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘वाचवा’ म्हणत मोदींना साकडे घालतील अशी शक्यता नाही. दोन्हीकडून इगोही आड येतोच. अशा वेळी मोदींशी बोलू शकतात ते पवारच!- पूर्वी मोदी हे पवारांचे काही बाबतीत ऐकत असत. पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो असेही ते एकदा म्हणाले होते.

ताज्या भेटीनंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया थांबल्या वा कमी झाल्या तर याही बाबतीत मोदींनी पवारांचे ऐकले असा तर्क देता येईल. नुसती भेट घेऊन उद्देश सफल होत नाही. त्या भेटीमागचा हेतू सफल व्हावा लागतो. तो सफल झाला तर पवार यांची शिष्टाई सुफळ संपन्न झाली असे म्हणता येईल. कुणाला वाटत होते पवार हे मोदींना शरण जातील. कारवाईचे बालंट टाळण्यासाठी भाजपशी जवळीक साधतील, पण तसे काही झाले नाही. ‘झुकेंगा नहीं’ हे ८२ वर्षांच्या पवारांनी दाखवून दिले. महाविकास आघाडी सरकारचा ते एकखांबी तंबू आहेत अन् राहतील. एका भेटीने केंद्रीय यंत्रणा थांबतील वा कारवाया रोडावतील असे मात्र नाही वाटत. राजकारणात व्यवहार असतोच. २५ मिनिटांच्या भेटीत नेमका व्यवहार काय झाला ते लवकरच समजेल. अशा भेटींची उकल काही तासांत होत नसते, त्यासाठी काही दिवस जावे लागतात.

मंत्रिमंडळात फेरबदल नाही! 
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात तूर्त कोणताही फेरबदल होणार नाही या शरद पवार यांच्या विधानाने काहींना दिलासा मिळाला तर काहींचे मन नक्कीच खट्टू झाले असेल. काही जणांच्या मंत्री बनण्याच्या मनीषेला स्थगिती मिळाली. आपले मंत्रिपद जाते की काय या शंकेने देव पाण्यात घालून बसलेले मात्र तूर्त सुखावले असतील. शिवसेनेचे एक मंत्रिपद रिक्त आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ते भरलेच गेले नाही. राठोड मंत्रिमंडळात परतण्यासाठी बरेच लॉबिंग करत असल्याचे समजते आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून एकाला मंत्रिपदाची संधी आहे. काँग्रेसच्या कोट्यातील विधानसभा अध्यक्षपदाचा पार बोजवारा उडाला आहे. फेरबदल झालाच तर तिन्ही पक्षांत काही जणांना वगळून नव्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण पवारांच्या विधानाने तीही तूर्त थांबली आहे. नितीन राऊत यांच्या मंत्रिपदावर डोळा असलेल्यांनाही वाटच बघावी लागणार असे दिसते.

कौतुक सुजात अन् कुणालचे 
सुजात आंबेडकर यांनी परवा सक्रिय राजकारणात प्रवेश केला. वडील ॲड. प्रकाश आंबेडकरांचा वारसा ते चालवणार आहेत. पक्ष संघटना बांधण्यात अधिक काळ घालवणार असे ते परवा सांगत होते. नुकतेच ते इंग्लंडमधील रॉयल हॉलोवे युनिव्हर्सिटीतून इलेक्शन कॅम्पेनिंग अँड डेमॉक्रसी हा अभ्यासक्रम पूर्ण करून आले. इंग्रजीवर प्रभुत्व आहे.  निश्चित विचार आहे. संकल्पना स्पष्ट आहेत. परवा मुंबईत त्यांची पहिलीवहिली सभा झाली; प्रभावी बोलले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पणतू मोठी झेप घेईल असे वाटते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल अलीकडे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. नेते निवृत्त होत नाहीत अन् त्यांच्या मुलांचे केस पांढरे झाले तरी त्यांना संधी मिळत नाही, अशी अनेक उदाहरणे असताना कुणाल यांनी स्वत:ची छाप उमटवली आहे. 

जाता जाता : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला होता. आपल्याकडे सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग आहे, सगळेच समोर आणले तर अनेक गौप्यस्फोट होतील असे ते म्हणाले होते. त्या पेनड्राइव्हमधील माहितीला हळूहळू पाय फुटत आहेत. आघाडी सरकारच्या काळात एक मोठा घोटाळा झाला होता. त्यातील मुख्य आरोपीला मध्यरात्रीनंतर तारांकित हॉटेलात अटक झाली तेव्हा एक महिला त्याच्यासोबत होती. राज्यातील एका बड्या घराण्याशी संबंधित असल्याने त्या महिलेचे नाव समोर आले नाही, पण पेनड्राइव्हमध्ये त्याविषयीची धक्कादायक माहिती आहे म्हणतात.
yadu.joshi@lokmat.com

Web Title: Why would Sharad Pawar have met Narendra Modi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.