शरद पवार ‘असे’ का बोलले असतील?
By यदू जोशी | Published: April 14, 2023 07:28 AM2023-04-14T07:28:23+5:302023-04-14T07:28:49+5:30
पवार यांना नेहमीच दूरचे दिसते. यावेळीही त्यांना काही दिसले असावे, आणि म्हणूनच त्यांनी भाजपला हलके मधाचे बोट लावले असावे का?
पवार यांना नेहमीच दूरचे दिसते. यावेळीही त्यांना काही दिसले असावे, आणि म्हणूनच त्यांनी भाजपला हलके मधाचे बोट लावले असावे का?
‘आपण भाजपसोबत गेले पाहिजे’, असा आग्रह धरणारे काही नेते राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग केला, त्याआधी आणि नंतरही राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत चला असा हट्ट करत होते पण, साहेब ठाम राहिले. अजित पवार यांचे बंड त्यांनी मोडून काढले. (ते बंड त्यांनीच अजितदादांना करायला सांगितले होते, असाही एक तर्क दिला जातो.)
भाजपसोबत पवार साहेब स्वत: का गेले नाहीत ? - असे म्हणतात की, पुलोद सरकार स्थापन करताना वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या आरोपांचे ओझे इतकी वर्षे वाहत असल्याने त्यांना आता भाजपसोबत जाऊन नवीन ओझे डोक्यावर घ्यायचे नसावे. - पण ‘पवार काहीही करू शकतात’ हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आणि २०१९ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. ‘मी पुन्हा येणार’ या देवेंद्र फडणवीसांच्या निर्धाराला त्यांनी वेसण घातली. आपल्याच काही सहकाऱ्यांचा हट्ट पुरवून पवार भाजपसोबत गेले असते तर, केंद्र व राज्यात सत्तेचा वाटा मिळाला असता. कन्येला मंत्री म्हणून स्थापित करता आले असते.
मात्र, भाजपच्या विरोधातच राजकारण करण्याची भूमिका घेत त्यांनी तो मोह आवरला. भाजप विरोधात देश पातळीवर विरोधी पक्षांची मोट बांधण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा नेता, अशी पवार यांची परवापर्यंत प्रतिमा होती. गेल्या आठवड्याभरातील त्यांच्या विधानांनी या प्रतिमेला तडा गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विख्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर शरसंधान साधत मोदी / भाजपविरोधात काँग्रेसने देश पातळीवर वातावरण तापवले असतानाच पवार यांनी अचानक अदानी यांची तारीफ केली अन् विरोधकांचे चाक पंक्चर झाले. यामागे पवार यांची मोठी राजकीय खेळी असल्याचे कोणाला वाटत असेलही पण, अदानी यांच्याशी असलेली मैत्री त्यांनी निभावली, हा वास्तवाच्या जवळ जाणारा अर्थ आहे. राजकारणापलिकडे जाऊन अशी मैत्री काही व्यक्तींबाबत त्यांनी यापूर्वीही निभावल्याचे दाखले आहेत.
अदानींची प्रशंसा करून मित्रपक्षांची नाराजी ओढवून घेण्याचा धोका आहे, शिवाय आपण भाजपच्या जवळ गेल्याचा आरोपदेखील होईलच, याचे भान पवारांना नक्कीच असणार. तरीही त्यांनी तो धोका पत्करला. त्यानंतर दोनच दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात पवार जे काही बोलले ते अधिक महत्त्वाचे आणि पुढील संभाव्य राजकारण स्पष्ट करणारे आहे. सोबतच्या घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत न करताच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, उद्याचे सांगता येत नाही, पहाटेचा शपथविधी पुन्हा होईल की नाही हे आज सांगता येणार नाही, पण कोणी तशी भूमिका घेतलीच तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल... ही पवार यांची विधाने मविआला चिंतेत टाकणारी आहेत.
पवार असे का बोलले असावेत?
संभाजीनगरमधील सभेने उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे एकखांबी नेते आहेत, हे चित्र समोर आले ते पवार यांना खटकले असावे, असा अर्थ काढला जात आहे. मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारणे ही त्यावेळची मजबुरी होती. मविआचे नेते म्हणून त्यांना नेतृत्व द्यायला पवार यांची तयारी नाही, असा तर्क काढण्यास वाव आहे. कारण मविआचे नेतृत्व ठाकरेंकडे गेले तर पवारांच्या अधिपत्याचा संकोच होतो. आपले वर्चस्व अबाधित राहावे, यासाठी आपल्या पुतण्याला झुकवले ते ठाकरेंना मविआचे नेतृत्व देतील, अशी शक्यता नाही.
दुसरे म्हणजे पवार हे ठाकरेंना कंटाळलेलेही असू शकतात. एकतर दोघांचा स्वभाव मेळ खात नाही. ठाकरे हे त्यांच्या तत्त्वांना भावनिकतेचा मुलामा लावतात. पवार हे भावनिक मुद्यांना तत्त्वांचा मुलामा लावतात, हा मूळ फरक! शिवाय दोघांची धाटणी वेगळी. ‘एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभेची निवडणूक लढू’, असे देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते आज सांगत तरी आहेत पण, ‘आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार’ असे राष्ट्रवादीचा एकही नेता म्हणत नाही. पुढचे राजकारण त्यातच लपले आहे.
हिंदुत्ववादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हिंदुत्ववादी शिवसेनेला पवार यांनी २०१९ मध्ये जवळ केले. तेव्हाही त्या मागे वैचारिक शुद्धता (आयडॉलॉजिकल प्युरिटी) नव्हती. त्यामुळे पुढे पवार यांनी एखादी वेगळी भूमिका घेतली तर, तेव्हाही ती कदाचित नसेलच. भारतीय राजकारण शंभर टक्के तत्त्वनिष्ठेने चालतेच असे नाही. तत्त्वनिष्ठ असणे जरुरीचे नाही, आपण घेतलेल्या भूमिकेला तत्त्वांचा मुलामा लावणे आवश्यक असते, ते पवार यांना चांगले जमते.
राज्यातील सत्ताकारणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. उद्या शिंदे सरकारच्या विरोधात निर्णय गेला, तर राज्यातील समीकरणे लगेच बदलतील. निकाल बाजूने लागला तरीही बदलतील पण, त्यासाठी काही अवधी लागेल . महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली होत जाईल. त्याची सुरुवात झाली आहे. पवार यांना नेहमीच दूरचे दिसते. यावेळीही त्यांना दिसले असावे आणि म्हणूनच त्यांनी भाजपला हलके मधाचे बोट लावले असावे का? सत्तेशिवाय राहिल्यास राष्ट्रवादीची पडझड होते, हे त्यांना ठावूक आहे. नाही पूर्ण राष्ट्रवादी जाऊ शकली तर, काही लोकांना अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पाठविले जाईल का? या सगळ्यांची उत्तरे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्या विरोधात लागला, तर लगेच मिळतील. निकाल बाजूने लागला तर या प्रश्नांची उत्तरे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मिळतील, एवढेच !