स्त्री दास्याचा तुरुंग फोडिते! महिलांच्या व्यक्तिगत जीवनात किती घुसखोरी करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 05:35 AM2023-04-15T05:35:50+5:302023-04-15T05:36:01+5:30
महिला आयोगाला तरी हा शब्द आत्ताच का बदलावा वाटला हा ही प्रश्न आता समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी विधवांना ‘गंगा भागीरथी’ असे संबोधावे असे सुचवले. त्यावरून वाद सुरू झाला तेव्हा, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी विधवा उल्लेख बदलण्याबाबत आपल्याला निवेदन दिले होते, असे मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे महिला आयोगाला तरी हा शब्द आत्ताच का बदलावा वाटला हा ही प्रश्न आता समोर आला आहे.
मंत्री काय म्हणतात किंवा महिला आयोगाच्या अध्यक्षा काय सांगतात हे जरी बाजूला ठेवले तरी अशा घटनांमध्ये होणारी सारवासारव नवी नाही. ‘कुमारी’ आणि ‘सौभाग्यवती’प्रमाणेच ‘गंगा भागीरथी’ हेही हिंदूंमध्ये अनेक वर्षांपासून वापरले जाते. मात्र, त्याला सरकारी अधिकृतता देत विधवांची ओळख ठळकपणे दाखवण्यामागे नेमका हेतू आहे तरी काय? मग, अन्य धर्मीय विधवा महिलांचे काय?- अर्थात, हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी मुळात तो दिला जाण्याचे कारणच काय, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.
सरकारने नागरिकांच्या आणि त्यातही (सातत्याने) महिलांच्या व्यक्तिगत जीवनात कोणतेही कारण नसताना किती घुसखोरी करावी, याला काही मर्यादा आहे की नाही?- अशी प्रतिक्रिया गेल्या दोन दिवसात सातत्याने व्यक्त होताना दिसली. सरकारने त्याकडे दुर्लक्ष करू नये. लग्न होणे अथवा न होणे, घटस्फोट घेणे अथवा एकटे राहणे, लिव्ह-इनमध्ये राहणे अथवा पतीचे निधन होणे याचा संबंध कोणत्याही स्त्रीच्या ‘आयडेंटिटी’शी असण्याचे कारण नाही. मात्र, पितृसत्ताक व्यवस्थेला त्याच ओळखीत स्त्रीला बंदिस्त करायचे असते. लग्नानंतर तिचे आडनावच काय, नावही बदलायचे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र द्यायचे, कपाळावर कुंकू लावायचे.
या सगळ्या खुणा कशासाठी? लग्न झालेल्या पुरुषाला मात्र अशा कुठल्याच गोष्टींची गरज नसते. लग्न केल्यामुळे त्याचे काहीच बदलत नाही, अथवा पत्नीच्या निधनानंतर त्याला काही वेगळे पुरावे द्यावे लागत नाहीत. महिलांना मात्र या सगळ्या पुराव्यांची गरज. नवरा गेला की मंगळसूत्र जाते, कुंकू जाते. ‘सौभाग्य’ जाते. मात्र, काळ बदलू लागला. सावित्रीच्या लेकी शिकू लागल्या. स्वयंप्रज्ञ होऊ लागल्या, तशा या जुन्या जोखडातून त्या मुक्त होऊ लागल्या. आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्ने होऊ लागली. स्त्री धीटपणे बोलू लागली. अनेक स्त्रियांनी लग्नानंतर नाव बदलणे बंद केले. कित्येक स्त्रियांनी एकटे राहणे पसंत केले. त्यांनी त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली. जगभर हे सुरू झाले होतेच, त्या वाटेवर मराठी स्त्रियाही आघाडीवर होत्या.
अमेरिकेत कमला हॅरिस यांना किती मुले आहेत आणि त्यांच्या पतीचे नाव काय आहे, हे कोणी त्यांना विचारले नाही. न्यूझीलंडच्या पंतप्रधान असताना जेसिंडा अर्डेन यांनी ‘गुड न्यूज’ दिली, तेव्हा त्या अविवाहित होत्या; पण असले मुद्दे महत्त्वाचे ठरत नाहीत. कारण, त्यांची ओळख कोणाची पत्नी वा कोणाची आई एवढीच नसते. भारतातही अशा महिला कमी नाहीत. राजकारणापुरते बोलायचे तर, इंदिरा गांधी ते जयललिता, ममता, मायावती, सोनिया गांधी अशा अनेक महिला सांगता येतील. त्या सधवा आहेत, अविवाहित आहेत की विधवा आहेत, ही त्यांची ओळख कधीच नव्हती.
या वाटेवर महाराष्ट्र आधीपासून उभा आहे. उलटपक्षी तो दिशादर्शक आहे. जिथे मुलींची पहिली शाळा सुरू झाली, त्या भिडेवाड्याच्या जतनासाठी करोडो रुपये मंजूर करताना, सावित्रीचा हा वारसा मात्र राज्य सरकार विसरलेले दिसते. अन्यथा, असा बुरसटलेला प्रस्ताव तयारच झाला नसता. सर्वच सत्ताधीशांना महिलांचा मुद्दा प्रतीकात्मकतेपुरता वापरायचा असतो. तसे नसते तर संसदेतील महिला आरक्षणाचा प्रस्ताव असा रेंगाळला नसता! ही वृत्ती सर्वपक्षीय आहे. ‘कोरोना’ने अनेक घरे उद्ध्वस्त झाली. खूप महिला एकाकी झाल्या. या एकल महिलांसाठी जे करायला हवे, ते सरकार करत नाही; पण असल्या नामांतरात मात्र यांना खूप रस. या वरवरच्या गोष्टींपेक्षा मूलभूत मुद्द्यांवर काम करायला हवे. स्त्रियांना आत्मसन्मान मिळावा, यासाठी ठोस काही करायला हवे. त्याऐवजी युगायुगाची गुलामी चालच सरकार पुढे चालू ठेवणार असेल, तर दास्याचा हा तुरुंग फोडायला महिलांनाच पुढाकार घ्यावा लागेल. आणि, ठणकावून सांगावे लागेल -
बालपणामंदी बापाचं नाव,
लगीन झाल्यावर पती हा देव
म्हातारपणामंदी पोरांना भ्यावं, असा जीवनी सेवा भाव
बदलाया बंड मी करते, स्त्री दास्याचा तुरुंग फोडिते।।