बाई खरेच बोलल्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2017 03:11 AM2017-06-17T03:11:49+5:302017-06-17T03:11:49+5:30
गाय आणि माय हे दोन्ही विषय हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने नाजूक व आस्थेचे आहेत. याच आस्थेच्या भावनेतून ज्या ज्या ठिकाणी गोहत्येच्या घटना निदर्शनास आल्या
गाय आणि माय हे दोन्ही विषय हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने नाजूक व आस्थेचे आहेत. याच आस्थेच्या भावनेतून ज्या ज्या ठिकाणी गोहत्येच्या घटना निदर्शनास आल्या त्या त्या ठिकाणी गोरक्षकांनी आक्षेप घेतले, मोर्चे-आंदोलने करून निषेध नोंदविले तर काही ठिकाणी मारहाणीच्या घटनानेखील घडल्या आहेत. गोहत्या या विषयावर सर्वत्र वादंग निर्माण होत असल्याचे निदर्शनास येताच फडणवीस सरकारला राज्यात गोवंश हत्याबंदीची घोषणा करावी लागली. गायींची काळजी घेताना देशातील बार्इंच्या आरोग्याकडेही सरकारने लक्ष द्यायला हवे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी लगावला. वाघ यांच्या वक्तव्याला टीका-टिपण्णी किंवा उपरोध अशी कोणतीही विशेषणे लावण्याचा भाग जर वगळला तर त्यांच्या बोलण्यात नक्कीच एक दखलपात्र असा मतितार्थ दडला आहे. सॅनिटरी पॅड करमुक्त करावेत आणि जीएसटीतूनही सॅनिटरी नॅपकीन्स वगळावेत यासाठी त्यांनी मुंबईत स्वाक्षरी मोहीमही राबविली, परंतु त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही. हे पॅड वापरणे परवडत नसल्याने ८० टक्के महिला ते वापरत नाहीत. परिणामी जगात दरवर्षी गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या २० टक्के महिलांमध्ये भारतीय महिलांचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच ‘राज्य व केंद्र सरकारच्या अजेंड्यावर सध्या फक्त गायींचा विषय आहे, महिलांच्या आरोग्याचे काय’ हा चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेला विषय वस्तुस्थितीदर्शक वाटतो. अशीच खंत यापूर्वी जया बच्चन यांनीही व्यक्त केली होती. गाय वाचविण्यासाठी शासनस्तरावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर रणकंदन माजले असताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणीच ठोस अशी पावले उचलताना दिसत नाही, हे अधिक क्लेशदायक आहे. बलात्कार, अत्याचार, हुंडाबळीच्या घटना कोठे ना कोठेतरी रोजच घडत असल्याने हे शब्द आता गुळगुळीत आणि परवलीचे वाटावेत इतके या घटनांचे प्रमाण वाढलेले आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणामुळे देशवासीयांच्या मनात संतापाचे डोंब उसळले होते म्हणून त्या प्रकरणाचा निपटारा जलदगतीने झाला. आपल्या अवतीभोवती अशा कितीतरी निर्भया रोजच वासनांध नराधमांची शिकार होत आहेत. पण हे प्रकार थोपविण्यासाठी ज्या कठोरतेने कारवाईचा आणि कायद्याचा बडगा उगारायला हवा, तितका तो उगारला जात नाही म्हणूनच महिलांच्या मनात पावलोपावली असुरक्षिततेची भावना आहे. गोहत्याबंदीच्या घोषणेसोबत महिलांच्या रक्षणासाठीही ठोस असे सुरक्षा कवच तयार केल्यास महिलाही सुरक्षित राहू शकतील.