फाइव्ह जीमुळे सर्व काही ‘छान छान’ होईल काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 09:07 AM2022-09-16T09:07:02+5:302022-09-16T09:07:24+5:30

फाइव्ह जी तंत्रज्ञानामुळे संवाद-संपर्काचा वेग आणि शक्यता अचाट वाढतील, हे खरे आहे; पण त्यामुळे अनेक नवे प्रश्नही निर्माण होणार आहेत!

Will 5G make everything 'cool'? | फाइव्ह जीमुळे सर्व काही ‘छान छान’ होईल काय?

फाइव्ह जीमुळे सर्व काही ‘छान छान’ होईल काय?

Next

डॉ. एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष, भारतीय तंत्रशिक्षण परिषद

प्रत्येक नवे तंत्रज्ञान आपले आयुष्य बदलत असते. काही वेळा हा बदल आपल्या आकलनापलीकडचा असतो. फाईव्ह जी हे असेच तंत्रज्ञान आहे. म्हणूनच स्वातंत्र्याच्या ७५ व्या वाढदिवशी १५ ऑगस्टला ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना भारतभरासाठी ‘फाईव्ह जी’ सुरू करण्याची घोषणा ही आनंद साजरा करावा अशीच आहे. अर्थात त्याविषयी काही चिंतेच्या बाबीही आहेत.

रिलायन्स जिओ ही भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपनी हे तंत्रज्ञान देत आहे. ७०० मेगाहर्ट्स, १८०० मेगाहर्ट्स, ३३०० मेगाहर्ट्स आणि २६ गीगाहर्ट्स बँडच्या डॉटने केलेल्या लिलावात रिलायन्स जिओने त्याचे स्पेक्ट्रम घेतले. ८८०७८ कोटी रुपयांना वीस वर्षांसाठी हे स्पेक्ट्रम देण्यात आले आहे. कमी, मध्यम आणि एम एम लहरींचे हे स्पेक्ट्रम आहेत. अत्यल्प विलंब, अधिक खात्रीशीरता, अफाट नेटवर्क क्षमता या वैशिष्ट्यांमुळे जास्तीत जास्त लोक या तंत्रज्ञानाकडे वळतात.  

फाईव्ह जी स्पेक्ट्रममुळे वेगवान आणि दर्जेदार नेटवर्क मिळू शकेल. त्याच्या स्वीकारामुळे भारत वायरलेस ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीत जगाचे नेतृत्व करू शकेल. शिक्षण, आरोग्य, कृषी, उत्पादन आणि कारभार या क्षेत्रांचा फाईव्ह जीमुळे फायदा होणार आहे. इंटरनेट ऑफ थिंग्सने (आय ओटी) इंडस्ट्री ४.१ संचालित होते. यामध्ये सेन्सर्स असलेल्या वस्तू ओळखणे, विश्लेषण क्षमता, सॉफ्टवेअर आणि इतर तंत्रज्ञान आहे. ते इंटरनेट व इतर फाईव्ह जी नेटवर्कच्या माध्यमातून इतर उपकरणे व प्रणालींना डाटा पुरवू शकते. फाईव्ह जी शब्दशः अर्थाने यंत्रे, वस्तू, उपकरणे यासह कोणाशीही, कशाशीही जोडले जाऊ शकते. 

१९८० मध्ये वन जीच्या माध्यमातून केवळ अनलॉग व्हॉइस जात असे. १९९० च्या दशकाच्या प्रारंभी टू-जी आले. त्यातून डिजिटल आवाज जाऊ लागला. २००० च्या प्रारंभी थ्रीजी आले. थ्रीजीने मोबाईल डाटा आणला. २०१० मध्ये  फोरजी आले, ज्याला इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) नेटवर्कशी जोडण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम फाईव्ह जी यंत्रणा करते. आपल्याला आजवर अज्ञात असलेल्या गोष्टी फाईव्ह जीमुळे साकार होणार आहेत. दळणवळण, दूरस्थ आरोग्य यंत्रणा, कृषी, डिजिटाईज लॉजिस्टिक्स अशा सर्व क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकेल. जवळपास ६० हून अधिक देशात सध्या फाईव्ह जी वापरले जात आहे. 

‘व्हर्चुअल रियालिटी’ हे शिक्षणाचे भविष्य आहे. व्हर्चुअल रियालिटी हेडसेटमध्ये विद्यार्थ्यांना सुकर इंटरफेस, हावभाव नियमन, अंगभूत शैक्षणिक सामग्री आणि शिक्षकांना वापरण्यास सुलभ अशा अनेक बाबी येतील. प्रत्यक्ष वर्गात शक्य नसणाऱ्या अनेक अनुभवांना विद्यार्थी सामोरा जाऊ शकेल. मल्टी प्लेयर क्लाउड गेमिंगच्या माध्यमातून अध्ययन अध्यापनाची नवी परिभाषा लिहिली जाईल. भविष्यात आपले स्मार्टफोनही अधिक सुधारतील.  आरोग्य क्षेत्रात त्याचा खूपच मोठा उपयोग होईल. विशेषतः शस्त्रक्रिया लांबून नियंत्रित करता येणे शक्य होईल. माध्यम आणि करमणूक क्षेत्रातही कमालीचे बदल होतील. उद्योग क्षेत्रात दुरस्थ नियंत्रणाने चालवल्या जाणाऱ्या स्मार्ट कारखान्यांचा उदय होईल. 

सरकार सध्या शहरे स्मार्ट करू पाहत आहे. ऊर्जा, वाहतूक व्यवस्थापन, हवामानाची अद्ययावत माहिती, जलस्रोत व्यवस्थापन, रस्त्यावर अधिक चांगली प्रकाशयोजना, आणीबाणीप्रसंगी जलद प्रतिसाद आणि गर्दी व्यवस्थापनात फाईव्ह जीचा मोठा उपयोग होणार आहे. फाईव्ह जीमुळे सर्वकाही छान छान होईल काय? - याचे उत्तर अर्थातच “नाही” असे आहे. सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांना ते कितपत उपयोगी पडेल याबद्दल अजूनही शंका आहे. डिजिटल विषमता ही दुसरी समस्या. खेड्यापाड्यातले लोक फाईव्ह जीचा लाभ घेऊ शकतील का, याहीबद्दल शंका आहे. चांगले नेटवर्क कव्हरेज हवे असेल तर फोर जीपेक्षा जास्त अँटेना लागतील. याचा अर्थ जास्त मोबाईल रेडिएशन आणि आरोग्यविषयक समस्यांनाही सामोरे जावे लागेल.

Web Title: Will 5G make everything 'cool'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.