लातूर महापालिकेत भाजपा कार्यकाळ पूर्ण करणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 10:29 PM2018-11-27T22:29:31+5:302018-11-27T22:29:44+5:30
महापौर, उपमहापौर यांची अडीच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लातूर महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपाने पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. आता नव्याने पदाधिकारी निवडले जातील. मात्र एकंदर काठावरचे बहुमत आणि अंतर्गत गटबाजीमुळे सत्ताधारी पक्षही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे
- धर्मराज हल्लाळे
महापौर, उपमहापौर यांची अडीच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लातूर महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपाने पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. आता नव्याने पदाधिकारी निवडले जातील. मात्र एकंदर काठावरचे बहुमत आणि अंतर्गत गटबाजीमुळे सत्ताधारी पक्षही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे लातूर महापालिका भाजपाकडे राहिली तर निधी उपलब्ध होईल. विकासकामांना गती येईल, अशी अपेक्षा आहे. परंतू, ज्यांना पदावरून हटविले जाईल त्यांची नाराजी दूर झाली नाही तर आकड्यांच्या खेळात भाजपाला सत्तेची मिळालेली संधी गमवावी लागेल.
महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे तसेच स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी राजीनामे दिले आहेत. स्वीकृत नगरसेवकांचे मागितल्याचे समजते. लातूर महापालिकेत सत्ताधारी भाजपाचे ३६, काँग्रेसचे ३३ आणि राष्ट्रवादीचे १ असे बलाबल आहे. स्थायी समितीत भाजपा आणि काँग्रेसचे समान सदस्य आहेत. त्यामुळे महापौर निवडीच्या वेळी काँग्रेसने नाराजांना जवळ केले तर सत्ताधा-यांना नामुष्किला सामोरे जावे लागेल. मात्र काँग्रेसची रणनिती सध्या तरी सत्ता हस्तगत करण्याची दिसत नाही़ एकूणच डबघाईला आलेली महापालिका़ सत्ता असूनही मिळत नसलेला पुरेसा निधी ही कारणे काँगे्रसने तूर्त सत्तेपासून दूर राहण्यासाठी पुरेशी आहेत.
सुरेश पवार हे प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये होते. सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक आहेत. कामाचा अनुभव आणि सर्वांशी असेलेले मधुरसंबंध या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. एकंदर महापालिकेत ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे व पक्ष ज्या त-हेने सत्ता हाकत आहे ते पाहता सुरेश पवार हे भाजपासाठी योग्य पर्याय होते. परंतु, नेमके काय बिनसले हे बाहेर येत नाही़ सयंमी स्वभावामुळे पवार कार्यकाळ पूर्ण करतील, अशी आशा होती. मध्यंतरी काँग्रेसने भाजपातील असंतुष्ट गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ऐनवेळी चमत्कार घडेल, असेही सांगितले. त्याचा परिणामही दिसला. महापौरांनी बोलावलेल्या सभेला सत्ताधारी भाजपाचेच अनेक सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे सभा रद्द करण्याची वेळ आली. एकूणच भाजपातील जुन्या आणि नव्या पदाधिकारी व सदस्यांची कुरघोडी चर्चेत आहे. अंतर्गत गटबाजीमुळे धुसफूस सुरू आहे. त्यामुळे नवीन निवड करताना नाराजांचा गट इकडेतिकडे झाला तर राजकीय गणित बदलणार आहे.
महापौरांच्या विरोधात तक्रार देऊन भविष्यात सत्ता बदल घडविण्याचा उत्साह काहीजणांचा असला तरी काँग्रेस श्रेष्ठी घाई करणार नाही. असे दिसते. कामांना गती नसल्यामुळे जनतेत ओरड आहे. करवाढीचा मुद्दा आहे. शहरभरातील खड्डे डांबरीकरणाने दूर झाले ही एक जमेची बाजु सोडली तर महापालिकेच्या कामावर समाधान नाही. मात्र भविष्यात लोकसभा, विधानसभेच्या तोंडावर सत्ता पक्षाला आपल्या सदस्यांना जोडून ठेवणे कठीण जाणार आहे. कालांतराने पक्षांतरांचे वारे वाहतील का ? या प्रश्नाचेही उत्तर लवकरच कळणार आहे.