झुंडशाही रोखणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:43 PM2017-09-08T23:43:31+5:302017-09-09T00:25:28+5:30
केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यापासून गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यांची ही झुंडशाही एवढी नियंत्रणाबाहेर गेली की खुद्द पंतप्रधानांनी त्यांना दोनदा
केंद्रात मोदी सरकार आणि काही राज्यांमध्ये भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यापासून गोरक्षकांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यांची ही झुंडशाही एवढी नियंत्रणाबाहेर गेली की खुद्द पंतप्रधानांनी त्यांना दोनदा ताकीद देऊन गोरक्षेच्या नावावरील हिंसाचार कदापि सहन केला जाणार नाही असे स्पष्ट बजावले. हे कमी होते की काय म्हणून सरसंघचालकांनीही त्यांना समज दिली. गोरक्षण करताना कुणाच्या भावना दुखावतील असे कृत्य अथवा हिंसाचार होता कामा नये. कायद्याचे पालन करूनच गोरक्षण झाले पाहिजे, असे या हैदोस घालणा-या गोरक्षकांना त्यांनी समजावून सांगितले. पण या दोघांच्याही आवाहनांचा फारसा काही परिणाम झाला नाही. त्यांना न जुमानता देशातील तथाकथित गोरक्षकांनी आपल्या कारवाया सुरुच ठेवल्या. त्यामुळेच कदाचित सर्वोच्च न्यायालयाने आता या गोरक्षकांना नियंत्रणात आणण्याकरिता बडगा उगारला आहे. गोरक्षणाच्या नावावर होणा-या हिंसाचाराला पायबंद घालण्याच्या दृष्टीने सर्व राज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाºयाची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोबतच गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्याकरिता कुठली पावले उचलली याचा अहवालही मागितला आहे. खरे तर देशात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारांची आहे. पण दुर्दैवाने त्यांनी या घटनांची पाहिजे तेवढ्या गांभीर्याने दखल न घेतल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयालाच या कामी पुढाकार घ्यावा लागला. आतातरी शासनाचे डोळे उघडतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. या देशातील गोरक्षक कधी नव्हे एवढे आक्रमक झाले आहेत. गोरक्षणाच्या नावावर निष्पाप लोकांची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. गेल्या तीन वर्षांतील घटना बघितल्या की हे स्पष्ट होते. उत्तर प्रदेशातील दादरी येथे एका इसमास गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जमावाने ठार केले होते. त्यानंतर गुजरातेत उनामध्ये मृत गाईचे कातडे काढणाºया दलितांना बेदम मारहाण करण्यात आली. कर्नाटकच्या उडिपीमध्ये गाई चोरट्या मार्गाने कत्तलखान्याकडे नेण्याचा ठपका ठेवत एका ग्राम स्थायी समितीच्या प्रमुखास त्याचा जीव जाईपर्यंत मारहाण करण्याचा नृशंस प्रकार घडला. अलवरमध्ये काही लोक गाई घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्लाबोल झाला. पण गोरक्षकांचा हा वाढता उन्माद थांबविण्याच्या दिशेने केंद्र अथवा संबंधित राज्य सरकारांनी कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. उलटपक्षी कुठल्याना कुठल्या पद्धतीने गोरक्षकांचेच लांगूलचालन करण्यात आले. झुंडशाहीत सद्सद्विवेकबुद्धी, कायदा पालन अशा गोष्टींना अजिबात थारा नसतो. तेथे असतो तो केवळ उन्माद. त्यामुळे अशी मानसिकता बाळगणा-यांना कठोर शासन हाच पर्याय असतो.