या अत्याचारांची दखल मुख्यमंत्री घेतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 01:20 AM2017-12-04T01:20:36+5:302017-12-04T01:20:56+5:30

१५ दिवसांपूर्वी तिच्या उभ्या पिकात ढोरे घुसवली व मोठे नुकसान केले. निरक्षर मंगला राज्यपाल, रामदास आठवले, पालकमंत्री सर्वांना भेटली.

Will the Chief Minister take charge of this atrocity? | या अत्याचारांची दखल मुख्यमंत्री घेतील का?

या अत्याचारांची दखल मुख्यमंत्री घेतील का?

Next

१५ दिवसांपूर्वी तिच्या उभ्या पिकात ढोरे घुसवली व मोठे नुकसान केले. निरक्षर मंगला राज्यपाल, रामदास आठवले, पालकमंत्री सर्वांना भेटली. एकेकाळी काही पारधी चोरी करायचे म्हणून लोकांनी मारले आणि आता गावात कष्ट करून जगायला तयार आहेत म्हणूनही मारतात. पारध्याचे आणखी किती बळी सामाजिक न्याय निर्माण व्हायला महाराष्टÑाला हवे आहेत?

दारिद्र्याच्या अभ्यासासाठी सध्या महाराष्टÑात फिरतोय. दारिद्र्याचे विषण्ण करणारे चित्रण बघताना पुरोगामी म्हणविणा-या महाराष्टÑात आजही जातीयता किती टोकाची आहे, त्याला हितसंबंधाची किनार असेल, तर वंचित जातींना किती टोकाच्या अन्यायाला तोंड द्यावे लागत आहे हे बघायला मिळत आहे. अविश्वसनीय वाटणारे अन्याय दडपले जात आहेत आणि ज्यांच्यावर अन्याय झालेत त्यांनीही ते जणू अपरिहार्यता आहे म्हणून मुकाटपणे स्वीकारले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात जोडतळा गावच्या पारधी जमातीच्या मंगलाबाई पवारांची वेदना खैरलांजीची आठवण करून गेली. १२ जून २०१४ रोजी त्यांच्या तीन मुलींना तलावात आंघोळीला गेल्यावर गावातील प्रस्थापित गुंडांनी बुडवून मारले. वडील वाचवायला गेले, तर त्यांनाही बुडवून मारले. या मुलींचा गुन्हा काय? यातील दोन मुलींवर गावातील प्रस्थापित जातीच्या तरुणांनी अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलींनी विरोध करून पोलीस केस केली. ते दोन खटले आजही सुरू आहेत. याची चीड येऊन या मुलींचा बदला घेतला. या मुली मुंबईत उच्चशिक्षण घेत होत्या. लहान बहीण-भाऊ यांनी हे खून बघितले आहेत. इतका थेट पुरावा असूनही पोलिसांनी एकमेकीला वाचवताना बुडाल्या असे पसरवले. पेपरला बातम्या तशाच आल्या. खूप आंदोलन केल्यावर ३०२ दाखल केला; पण एक महिन्यात जामीन दिला व तपासी अधिकाºयांनी पुरावे मिळत नाहीत, असा कांगावा केला. तीन वर्षे झाल्यावर आजही खटला पुढे सरकत नाही. साक्षीदार फोडले जात आहेत. जलदगती न्यायालयात खटला चालवला जात नाही. गावकरी त्रास का देतात? याचा शोध घेतला तर त्या गावची गायरान जमीन हे पारधी कसतात. आमच्या गावात पारधी नको यातून गावाने त्रास दिला. बहिष्कार टाकला व शेवटी जीव घेतले.
भटके विमुक्तांबाबत असेच वास्तव दिसत आहे. पूर्वी भटके विमुक्त गावगड्याला आपले वाटायचे; पण जसजसे ते गावात गायरान जागेत राहू लागले आणि त्या जागा नावावर करून मागू लागले तसतसे गावातील हितसंबंधी लोकांना खटकले. जमिनीच्या किमती वाढू लागल्या. तसतसे भटके ही अडचण होऊ लागली. त्यातून किमान तीन ठिकाणी भटक्यांच्या वस्त्यांवर गावकºयांनी हल्ले करून त्यांना हाकलून लावण्याचा प्रकार बघायला मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या भंडारा जिल्ह्यात भेटी दिल्या. भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात चोरखमारी येथे गोपाळ जमातीच्या मुलीने शेतातील वांगी घेतली म्हणून गावातील लोकांनी एकत्र येऊन वस्तीची तोडफोड केली व महिलांनाही मारहाण केली. याच भंडारा जिल्ह्यात लाखणी तालुक्यात पिंपळगाव येथे बहुरूपी लोकांच्या वस्तीवर गावाने हल्ला करून वस्ती पेटवली. ते घाबरलेले लोक गावातून निघून भंडाºयाजवळ राहतात. ते अजूनही भेदरलेले आहेत. या अन्यायाची मुळे भटक्यांना घरे देण्यासाठीच्या योजनेशी जाऊन भिडतात. बहुसंख्य भटक्यांना घरे नाहीत. त्यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०११ साली सुरू केली. यात ६० कोटींमधील फक्त चार कोटी खर्च होऊन सहा वस्त्या बनवल्या गेल्या. इतकी टोकाची अनास्था या पालावर राहणाºया माणसांविषयी राज्यकर्ते आणि प्रशासनाला आहे. तीच बाब गायरान जमीन कसण्याची आहे. वरील सर्व प्रकरणांत पोलीस आणि राजकीय नेते कसे वागले हे बघितले, तर नेत्यांनी सरळ त्या गावातील बहुसंख्याकांच्या बाजू घेतल्या आहेत. महिला अत्याचारांची आपली सारी चर्चा एका शहरी आणि मध्यमवर्गीय परिघात होते. या आत्याचारातही ‘भारत’ आणि ‘इंडिया’ असतो का? अत्याचार करणाºया मुलीची जात ही मोठ्या समूहाची आहे का? की ती अल्पसंख्य आहे? हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात का? आजकाल अत्याचारित मुलीच्या जातीने आक्रमक झाले, मोर्चे काढले तरच प्रशासन जागे होते. या गरीब मुलींसाठी तीन वर्षे कुणी रस्त्यावर उतरले नाही म्हणून हा अन्याय असाच दडपला जाईल का?
- हेरंब कुलकर्णी

Web Title: Will the Chief Minister take charge of this atrocity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.