असेल काँग्रेसचा हरि... तर देईल खाटल्यावरी...!
By admin | Published: September 10, 2016 05:46 AM2016-09-10T05:46:51+5:302016-09-10T05:46:51+5:30
काँग्रेसला उत्तर प्रदेशात सत्तेच्या सिंहासनापर्यंत नेण्याचे स्वप्न राहुल गांधी पाहात आहेत
काँग्रेसला उत्तर प्रदेशात सत्तेच्या सिंहासनापर्यंत नेण्याचे स्वप्न राहुल गांधी पाहात आहेत. देवरीया ते दिल्ली अशी २५00 किलोमीटर्सची किसान महायात्रा त्यांनी त्यासाठीच सुरू केली आहे. या राज्यातल्या ३९ जिल्ह्यातील ५५ लोकसभा व २३३ विधानसभा मतदारसंघांमधून मार्गक्रमण करीत तीन आठवडे ही मॅरेथॉन यात्रा चालेल. राज्यातला दुर्लक्षित शेतकरी वर्ग महायात्रेचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. पुढल्या वर्षी तेथे विधानसभेची निवडणूक आहे. त्यापूर्वी राज्यात काँग्रेसचा माहोल तयार करण्यासाठी राहुल गांधींनी रोड शो च्या बरोबरीने जागोजागी खाट सभांचे आयोजन केले आहे. खाट सभेत श्रोत्यांची आसन व्यवस्था खुर्च्यांऐवजी विणलेल्या बाजांवर केली जाते. व्यासपीठावरचे नेतेही खाटांवर बसूनच शेतकऱ्यांशी खुला संवाद साधतात. देवरीया जिल्ह्यात रूद्रपूरला राहुल गांधींची पहिली खाट सभा झाली. शेती व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा उल्लेख करताना, राहुल गांधींनी राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास, सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, शेतमालाचा हमी भाव वाढवून दिला जाईल, निम्म्या दरात शेतीला वीजपुरवठा केला जाईल, अशा विविध आश्वासनांची खैरात केली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत, या सभेत पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवरही राहुल गांधींनी थेट हल्ला चढवला.
अभिनव खाट सभेसाठी काँग्रेसने कानपूरहून २५00 नव्या खाटा तयार करून आणल्या होत्या. खाटांवर विराजमान ग्रामीण शेतकरी, बाया-बापड्या, तरूण मुले लक्षपूर्वक राहुलचे भाषण ऐकत होते. सभा संपल्यावर राहुल व्यासपीठावरून उतरताच, उपस्थितांनी नव्या कोऱ्या खाटांची लूट सुरू केली. जवळपास १५00 खाटा श्रोत्यांनी खांद्यांवर आणि वाहनांवर लादून नेल्या. लुटालुटीच्या या स्पर्धेत उपस्थितांची बाचाबाची आणि भांडणेही झाली. राहुल गांधींच्या किसान महायात्रेचा शुभारंभ खरं तर दमदार झाला होता. वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रात मात्र महायात्रेच्या बातम्यांमधे राहुलच्या भाषणाऐवजी खाटांच्या लुटीलाच अधिक महत्व प्राप्त झाले. किसान यात्रेची सभा दुसऱ्या दिवशी गोरखपुरला होती. या सभेत राहुल म्हणाले, ‘खाट सभेतली एखादी खाट शेतकरी घरी घेऊन गेला तर त्याला लगेच चोर ठरवले जाते, मात्र बँकांचे नऊ हजार कोटी बुडवून कोणी परदेशात पळून गेला तर मोदी सरकार त्याला फक्त डिफॉल्टर संबोधते’. राहुल गांधींचा हा उल्लेख अर्थातच विजय मल्ल्यांना उद्देशून होता. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांवर ५९ हजार कोटींचे कर्ज आहे. गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारने सार्वजनिक बँकांचे १ लाख १४ हजार कोटींचे एनपीए माफ केले. कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपतींवर एकप्रकारे ही मेहरबानीच आहे. राहुलच्या या तर्कशास्त्रानंतर वृत्तवाहिन्यांवर खाट लुटीची चर्चा आपसूक बंद झाली.
उत्तर प्रदेशच्या राजकीय समरांगणात काँग्रेसच्या खाट सभेचा अभिनव प्रयोग गाजतो आहे. प्रत्यक्षात मध्य प्रदेशातल्या झाबुआ आणि अलीराजपूर जिल्ह्यात खाट सभांची परंपरा बरीच जुनी आहे. भिल्लांच्या बोली भाषेत खाटेला खाटला म्हणतात. या दोन जिल्ह्यात आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधण्यासाठी राजकीय नेते अनेक वर्षांपासून खाटला बैठका आयोजित करीत आले आहेत. अगदी ताजे उदाहरण द्यायचे तर, भाजपाच्या दिलीपसिंग भुरीयांच्या निधनाने रिक्त झालेल्या रतलाम झाबुआ लोकसभा मतदारसंघात गतवर्षी २१ नोव्हेंबरला पोटनिवडणूक संपन्न झाली. निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या कांतीलाल भुरीयांनी शेकडो खाटला बैठकांव्दारे आदिवासी मतदारांना संबोधित केले.
भाजपा उमेदवार व दिलीपसिंग भुरीयांच्या कन्या निर्मला भुरीयांचा काँग्रेसने तब्बल ८८ हजार ८३२ मतांनी पराभव केला. मोदी लाटेनंतर काँग्रेसने जिंकलेली ही पहिली पोटनिवडणूक होती. मध्य प्रदेशात यशस्वी ठरलेला खाटला सभांचा हा प्रयोग, काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोरांनी उत्तर प्रदेशात खाट सभेच्या नव्या अवतारात सादर केला. ‘असेल माझा हरि.. तर देईल खाटल्यावरी’ ही मराठीतील एक प्रसिध्द म्हण आहे. त्यानुसार काँग्रेसला २७ वर्षांपासून हरवलेला आपला मतदार हरीच्या रूपात खाटल्यावर भेटेल काय? सत्तेच्या सिंहासनापर्यंत काँग्रेसचे पुनरागमन होईल काय? याचे उत्तर काळ देईल. राजकीय परिघात राहुल गांधींच्या खाट सभा मात्र तूर्त लक्षवेधी ठरत आहेत. उत्तर प्रदेशच्या इतिहासात २0 पैकी ११ मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे होते. १९५0 पासून १९८९ पर्यंत (मधल्या काही वर्षात चरणसिंह, रामनरेश यादव व बनारसीदासांचा अपवाद वगळता) राज्यात काँग्रेस पक्ष सतत सत्तेवर होता. १९८९ च्या डिसेंबर महिन्यात एन.डी. तिवारी राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले व त्यानंतर काँग्रेसच्या हातून त्या राज्याची सत्ता निसटली. तेव्हापासून जवळपास २७ वर्षे काँग्रेस या राज्यात सत्तेपासून दूर आहे. १९८९ नंतर आजतागायत तीनदा समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह, चारदा बसपाच्या मायावती, दोनदा भाजपाचे कल्याणसिंह, एकदा राजनाथसिंह आणि एकदा भाजपाच्या रामप्रकाश गुप्तांनी मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश हे मुलायमसिंह यादवांचे सुपुत्र आहेत.
२७ वर्षात उत्तर प्रदेशच्या राजकारणाने कधी धार्मिक तर कधी जातीपातीचे वळण घेतले. काँग्रेसला एकेकाळी इथे ब्राह्मण, दलित व मुस्लीमांची एकगठ्ठाा मते मिळायची. यादव, जाट मतदार पूर्वीपासून काँग्रेसच्या विरोधात होते. रामजन्मभूमी आंदोलनानंतर ब्राह्मण भाजपाच्या दिशेने, दलित मायावतींबरोबर तर बहुसंख्य मुस्लीम मुलायमसिह यादवांकडे वळले. जाती धर्माच्या या नव्या समीकरणांमधे उत्तर प्रदेशातील परंपरागत मतदार काँग्रेसपासून दूर गेला. विधानसभेच्या गेल्या पाच निवडणुकांमधे काँग्रेसला ३३ पेक्षा अधिक जागा जिंकता आलेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीतही अमेथी, रायबरेली सारखी दोनच बेटे काँगे्रसकडे आहेत.
एका पडक्या राजवाड्याच्या स्थितीतल्या काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ब्राह्मण शीला दीक्षितांची मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी घोषित केली आहे. अभिनेते राज बब्बर हा काँग्रेसचा ओबीसी मुस्लीम चेहरा आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत. प्रचार मोहिमेच्या रणसंग्रामासाठी प्रियंका गांधींसह तमाम आघाडीचे फलंदाज मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. राहुल गांधींची महत्वाकांक्षी किसान महायात्रा नुकतीच सुरू झाली आहे. या तमाम प्रयत्नांंती काँग्रेसला या राज्यात आपले गतवैभव प्राप्त करता येईल? हा प्रश्न आज अनुत्तरित आहे.
उत्तर प्रदेशात गेली काही वर्षे काँग्रेस आणि भाजपामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी स्पर्धा सुरू होती. लोकसभा निवडणुकीच्या मोदी लाटेत भाजपाने राज्यात ७१ जागा जिंकून सर्वांना मागे टाकले व नवा विक्रम प्रस्थापित केला. ‘हरहर मोदी घरघर मोदी’ ही घोषणा राज्यात सर्वत्र दुमदुमली. अलीकडे डाळीचे भाव भरमसाठ वाढले. त्यामुळे या घोषणेचे सध्या ‘अरहर मोदी’पर्यंत विडंबन झाले, हा भाग वेगळा. आगामी निवडणुकीत मतदार हरी नेमका कोणाच्या दिशेने झुकेल? काँग्रेसच्या खाट सभा सुरू आहेत. असेल काँग्रेसचा हरि.. तर देईल खाटल्यावरी..! तूर्त इतकेच म्हणता येईल.
-सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)