क्रिप्टोकरन्सीचे मायाजाल ‘अधिकृत’ होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 08:46 AM2021-11-12T08:46:27+5:302021-11-12T08:46:44+5:30
भारतात क्रिप्टोकरन्सीसंदर्भात सरकारी नियमावली नाही; पण नेते, अभिनेते आणि खेळाडू यांच्यात हे आभासी चलन चांगलेच लोकप्रिय होते आहे.
- दीपक शिकारपूर
बिटकॉइनमुळे क्रिप्टोकरन्सी नावारूपास आले. क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन. चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजिटल वा व्हर्च्युअल यंत्रणा. या व्यवस्थेमध्ये खरेदीदार व विक्रेता नामानिराळे राहू शकतात. कोणत्याही देशाचे सरकार वा रिझर्व्ह बँक हे चलन ‘छापत’ नाही. क्रिप्टोकरन्सी फक्त ऑनलाइन उपलब्ध असते. मायनिंगच्या तंत्राद्वारे या चलनाची निर्मिती होते आणि फक्त ब्लॉकचेनमार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. जशा आपल्याला बँकांमधून चलनी नोटा मिळतात, तसेच इथेही ऑनलाइन साइटसवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येते. ही खरेदी केल्यावर तुमचे एक वॉलेट तयार होते, ज्यात हे चलन तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. या प्रक्रियेला माइनिंग म्हणतात. जशी जगभरात डॉलर, युरो, येन, पाउंड, अशी विविध चलने आहेत, तशीच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत. उदाहरणार्थ
बिटकॉइन, लाइटकॉइन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश इत्यादी. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी वितरित करायची तयारी करत आहे. बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी साधारण २०११ च्या आसपास उपलब्ध करण्यात आली होती. भारतात क्रिप्टोकरन्सीसंदर्भात सरकारी नियमावली नाही. भारतात सर्वसामान्य नागरिकांना याची जेमतेम माहिती आहे. एप्रिल २०१८ मध्ये रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. म्हणजे बँका किंवा कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्च्युअल करन्सीशी निगडित कोणतीही सेवा देता येणार नव्हती. कदाचित २०२२ च्या अर्थसंकल्पात याबद्दल सविस्तर माहिती येऊ शकते व भारतीय क्रिप्टो चलन बाजारात सादर केले जाऊ शकते.
अनेक प्रसिद्ध व्यक्ती क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करतात. त्यात अग्रगण्य आहेत बिल गेटस, एलन मस्क, पॅरिस हिल्टन, लिओनेल मेस्सी आणि भारतात सनी लिओनी, अमिताभ बच्चन इत्यादी. अमिताभ बच्चन, जे आता भारतीय क्रिप्टो एक्स्चेंज CoinDCX चे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. अमिताभ हे नॉन-फंगीबल टोकन्स (NFTs) च्या व्यापारातही प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आहेत. कला, संगीत, इन-गेम आयटम आणि व्हिडिओ यासारख्या ‘अद्वितीय’ वस्तूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या डिजिटल मालमत्ता आहेत; ज्या क्रिप्टोकरन्सी वापरून संग्रहणीय म्हणून खरेदी केल्या जाऊ शकतात. एनएफटी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म Colexion ने अलीकडेच सुनील शेट्टी, आमिर अली, मिका सिंग... या भारतीय कलाकारांना प्रायोजित केले आहे. काही गुंतणूकदार क्रिप्टो चलनात थेट गुंतवणूक न करता ज्या उद्योगांनी क्रिप्टो चलनात गुंतवणूक केली आहे, अशा उद्योगांचे भाग (शेअर ) विकत घेतात.
भारतामध्ये, क्रिप्टो व्यापार २०३० पर्यंत २४१ दशलक्ष डॉलरपर्यंत (अंदाजे १७९० कोटी) पोहोचेल, असा अंदाज नॅसकॉम या संस्थेच्या अहवालात व्यक्त केला आहे. बिटकॉइनचे भारतात मूल्य सतत बदलत असते. ४५००० ते ४९००० हे नोव्हेंबर २०२१ मधील मूल्य होते. इतर गुंतवणूक पर्यायांप्रमाणे (शेअर, म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता) क्रिप्टो चलनातील लाभ हा भारतीय आयकर पद्धतीत करप्राप्त असायला हवा. भांडवल वृद्धीकर त्यावर लावला जावा. वार्षिक आयकर विवरणपत्रात सर्व गुंतवणूक पारदर्शक तत्त्वाने दाखवावी लागते. त्यात क्रिप्टोचा उल्लेख नसतो. जगभरातील बिटकॉइनपैकी फक्त एक टक्क्याहूनही कमी मालकी भारतीयांकडे आहे. गूढ व अतर्क्य बिटकॉइनच्या किमतीत आतापर्यंतच्या उच्चांकावरून ४० टक्क्यांनी घसरण झाल्याचे वास्तव आहे. याची किंमत का वाढते, का कमी होते, हे अनिश्चित आहे. कदाचित भारतीयांच्या निरुत्साहाचे हे महत्त्वाचे कारण असू शकते. हे चलन अधिकृत होण्याची वाट अनेक जण पाहात आहेत.