कडू खाल्ल्याने उत्साह वाढेल का?

By किरण अग्रवाल | Published: August 3, 2017 09:05 AM2017-08-03T09:05:45+5:302017-09-07T20:17:58+5:30

सादेला प्रतिसाद देणे किंवा ‘आरे’ला ‘कारे’ने प्रत्युत्तर मिळणे जितके वा जसे स्वाभाविक मानले जावे, तितकेच अगर तसेच ते उपरोक्त मथळा अथवा प्रश्नाबाबतीत ठरावे.

Will eating cravings increase enthusiasm? | कडू खाल्ल्याने उत्साह वाढेल का?

कडू खाल्ल्याने उत्साह वाढेल का?

Next

सादेला प्रतिसाद देणे किंवा ‘आरे’ला ‘कारे’ने प्रत्युत्तर मिळणे जितके वा जसे स्वाभाविक मानले जावे, तितकेच अगर तसेच ते उपरोक्त मथळा अथवा प्रश्नाबाबतीत ठरावे. कारण, जास्त गोड खाल्ल्याने नैराश्याचा धोका वाढू शकतो या एका संशोधनाअंती काढल्या गेलेल्या निष्कर्षाच्या पार्श्वभूमीवर सदरचा प्रश्न उपजला आहे. गोड खाल्ल्याने नैराश्य येणार असेल तर कडू खाल्ल्याने ते टाळता येणार आहे का, असा हा प्रति, पण भाबडा सवाल त्यामुळेच उपस्थित व्हावा.

खरे तर ‘गोड’ बोलणे व त्यातही ‘अति’ गोड बोलणे जेव्हा कुणाकडून प्रत्ययास येते तेव्हा कसल्या का प्रकारातील असेना, पुढील संकटाची चाहूल मिळून जात असल्याचेच ते निदर्शक मानले जाते. त्रयस्थाकडून प्रदर्षित होणाऱ्या अति गोडव्यामागे अथवा अवचितपणे गोडीगुलाबीने वागण्यामागे छुपा ‘मतलब’ राहत असल्याचे अनेकांना अनेक बाबतीत अनुभवासही येते. गुळाला मुंगळा चिकटतो, ते उगाच नव्हे. तरी आपण गोडव्यामागे धावतो, हा भाग वेगळा. मकर संक्रांतीला तर आपण ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणूनच रटत असतो. गोड खाही आणि गोड बोलाही, अशी भावना त्यामागे अपेक्षित असते. यातील गोड बोलण्याबाबत प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. पण गोड खाणे मात्र (अर्थातच जास्तीचे) आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते म्हणे.  नाही तरी ‘अति तिथे माती’ या न्यायाने कोणत्याही बाबतीतला अतिरेक घातकच ठरतो, हा तसा आहारासह समाजशास्त्राचाही साधा सिद्धांत. त्यामुळे जास्तीचे गोड खाणेही अपायकारक ठरणे अगदी स्वाभाविक आहे. ब्रिटनमधील एका विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी याच अनुषंगाने तब्बल २२ वर्षे संशोधन करून अति गोडधोडाचे सेवन नैराश्यासारख्या मानसिक विकारांना निमंत्रण देत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. सदरचे संशोधन करणाऱ्या चमूतील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ अनिका नुपेल यांनी साखर आणि मानसिक विकारांदरम्यानचा संबंध अतिशय जवळचा असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे साखर वा गोडाचे अतिसेवन करणाऱ्यांना धोक्याचा इशारा तर मिळावाच, पण मग गोडाने असे होणार असेल तर कडू खाल्ल्याने नैराश्यापासून सुटका मिळेल का, असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित व्हावा.

यासंदर्भात ‘अमुक’ एक केल्याने ‘तमुक’ टळतेच वा होतेच असे खात्रीने सांगता येत नाही, ही तशी सर्वमान्य बाब. म्हणूनच जिज्ञासापूर्तीसाठी वैद्यक व्यवसायातील आयुर्वेदतज्ज्ञ व लायन्स क्लबसारख्या नामांकित समाजसेवी संस्थेचे प्रांतपाल राहिलेले वैद्य विक्रांत जाधव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही गोड पदार्थ व नैराश्याच्या संबंधाला दुजोरा दिला. गोड म्हणजे मधुर रसाचे जास्त प्रमाण स्थूलपणाला निमंत्रण देणारे असते. स्थुलत्वातून जडत्व आकारास येते व तेच नैराश्याकडे घेऊन जाणारे ठरू शकते, अशी त्यांची याबाबतची मांडणी. पण म्हणून कडू कारले खाण्याने नैराश्य टाळता येईल असे नाही. आहारानुसार शारीरिक व मानसिक अवस्था बदलते. त्यामुळे भारतीय संस्कृतीत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या षडरसांचा, म्हणजे गोड, आंबट, तिखट, लवण, तुरट व कडू असा सर्वपोषक रसांचा आहारच अधिक योग्य, असे वैद्य जाधव सुचवतात. अ‍ॅलोपॅथीतील मधुमेह विकारतज्ज्ञ डॉ. समीर पेखळे यांनी तर ‘साखरे’शी संबंधित मधुमेहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’च्या एका अहवालानुसार जगात मधुमेहाचे सुमारे ३५ कोटींपेक्षा अधिक रुग्ण असून, त्यातील सहा कोटींपेक्षा अधिक भारतात आहेत. त्यामुळे मधुमेह विकाराच्या बाबतीत सध्या भारताचा दुसरा क्रमांक असून, सन २०२५ पर्यंत तो प्रथम क्रमांकावर पोहोचण्याची लक्षणे आहेत. २०३० पर्यंत मधुमेह हा लोकांच्या मृत्यूस कारण ठरणारा सातव्या क्रमांकाचा मोठा आजजार ठरणार असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. बरे, हे केवळ श्रीमंतांचेच ‘दुखणे’ म्हणवत असले तरी ते खरे नाही. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणाअंती सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या घटकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. हेमाद्री चिकित्सालयाचे वैद्य संजीव सरोदे यांनी मधुमेहाच्या या वाढत्या प्रसाराला अलीकडची जीवनपद्धती (लाइफस्टाइल) कारणीभूत असल्याचे सांगितले. आयुर्वेदातील चरकसंहितेत ‘मेहनत करा’ म्हणजे व्यायाम करा, असा सल्ला दिला असून त्याद्वारे मधुमेहच काय, अन्यही व्याधींपासून दूर राहता येण्याचा दाखलाही वैद्य सरोदे यांनी दिला.

तात्पर्य काय, तर साखर ही गोड असली तरी मधुमेहासारख्या व्याधींना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकणारी आहे. त्यामुळे ‘गोड’ असो की ‘कडू’, त्याचे अति सेवन उपयोगाचे नाही. आहार हा ‘चौरस’ असावा हेच या संदर्भाने महत्त्वाचे म्हणायचे. बाहेर जेवायला जाताना ‘डिश’ सिस्टीमने जेवण घेण्याऐवजी आपली आपली ‘थाळी’ बरी, असेही या अनुषंगाने म्हणता यावे. असो. या विषयाला सुरुवात झाली ती ‘गोड’वरून. तेव्हा गोड बोलण्यापर्यंत ठीक असले तरी, गोड बोलणाऱ्यांबद्दल जसे सावध असणे गरजेचे असते तसे गोड खाण्याबद्दलही सावधान असलेलेच बरे!

Web Title: Will eating cravings increase enthusiasm?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.