इलॉन मस्क काहीतरी मस्त मस्त देतील? - हा निव्वळ भ्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 10:03 AM2022-11-01T10:03:23+5:302022-11-01T10:03:39+5:30
मस्क यांनी कर्ज काढून ही कंपनी विकत घेतली, त्यामुळे ते ट्विटर वापरणाऱ्यांचे फुकटात कल्याण वगैरे करतील, हा भ्रम डोक्यातून काढून टाकलेला बरा!
- श्रीमंत माने
इलॉन मस्क हे कलंदर उद्योजक आहेत. थोडे विचित्र व विक्षिप्तही म्हणता येतील. तब्बल ३ लाख ६२ हजार कोटींना ट्विटर विकत घेतल्यानंतर दुसरे कोणी असते तर एखाद्या दिग्विजयी सम्राटाच्या थाटात नव्या मालकीच्या कार्यालयात पोहोचले असते. हे महाशय चिनी मातीचे वॉश बेसिनचे भांडे घेऊन कंपनीला योग्य तो संदेश देतच तिथे गेले. पहिल्याच दिवशी त्यांनी सीईओ पराग अग्रवाल, विधि अधिकारी विजया गड्डे, सीएफओ नेद सेगल यांची हकालपट्टी केली. त्यांना म्हणे अक्षरश: कार्यालयातून बकोटी धरून बाहेर काढले. नोकरी सोडण्यासाठी विजया गड्डेंना ६१० कोटी, नेद सेगलना ५४४ कोटी, तर पराग अग्रवाल यांना ५३६ कोटी रुपये असा भलामोठा आर्थिक मोबदला दिला. साहजिकच इतर अधिकारी व कर्मचारी नोकरी जाण्याच्या भीतीने धास्तावले. तेव्हा, ‘घाबरू नका, सांगतो तसे बिझनेस मॉडेल तयार करून द्या, नोकऱ्या टिकतील’, असे संकेत मस्क यांनी दिले.
आता, अशा बातम्या येताहेत, की नव्या बिझिनेस मॉडेलसाठी सर्वांना ७ नोव्हेंबरची डेडलाइन देण्यात आली आहे. हे मॉडेल ब्लू टिकभोवती गुंफलेले असेल. व्हेरिफाइड यूझर्सना ही ब्लू टिक मिळते. तिला मोठी प्रतिष्ठाही आहे. रोजच्या २४ कोटी यूझर्सपैकी साधारणपणे वीस टक्क्यांकडेच ही ब्लू टिक आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बडी मंडळी, कार्पोरेट्स यांचा त्यात समावेश आहे. सोशल मीडियावर अत्यंत प्रभाव असलेल्या याच मंडळींच्या खिशातून पैसे कमावणे यावर मस्क यांचा डोळा दिसतो. काही वाढीव फीचर्स देऊन अशा अधिकृत हँडल्सकडून दरमहा पाच डॉलर्स वसूल केले जातील. त्याचप्रमाणे व्हेरिफाइड हँडल म्हणून ब्लू टिक देण्यासाठी वीस डॉलर्स घेतले जातील, अशी माहिती समोर येत आहे.
अशा ब्लू टिकवाल्या हँडल्सना काही अतिरिक्त फीचर्स विकत देण्याची सुरुवात ट्विटरने वर्षभरापूर्वीच केली आहे. आधीच ब्लू टिकवाला एलाइट वर्ग ट्विटरवर आहेच. आता नवा अल्ट्रा-एलाइट वर्ग तयार होईल. पूर्णपणे व्यापारी मनोवृत्ती हे मस्क यांचे वैशिष्ट्य आहे. टेस्ला व स्पेसएक्स यांसारख्या बड्या कंपन्या उभ्या करताना त्यांनी दाखवून दिले, की बाकी कशाहीपेक्षा पैसा महत्त्वाचा आहे. स्पेसएक्सचे बाजारमूल्य ट्विटरच्या तिप्पट, तर टेस्लाचे जवळपास वीसपट आहे. ट्विटरचे नवे मालक सगळे बदल व्यापारी दृष्टिकोनातूनच करतील. कारण, मायक्रोब्लॉगिंग साइट म्हणून ट्विटरचे कितीही नाव असले तरी हे विसरायचे नाही, की गेल्या दहा वर्षांपैकी आठ वर्षे ही कंपनी तोट्यात आहे.
ट्विटरची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे आल्यानंतर चर्चेत असलेले प्रश्न हे आहेत- ट्विटरची चिमणी खरेच मुक्त होऊन सोशल मीडियाच्या आकाशात झेप घेईल का? फेक न्यूज, प्रोपगंडा, ट्रोलिंग, मिसइन्फॉर्मेशन व डिसइन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सामान्यांचा बुद्धिभेद बंद होईल का? नितळ सत्य समोर आले तर जगभरातील राजकीय नेते किंवा महासत्तांना धोका निर्माण होईल का?- या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इलॉन मस्क यांच्या व्यापारी दृष्टिकोनात दडली आहेत. ट्विटरचे काय होईल, या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्पेसएक्स प्रयोगाकडे बारकाईने पाहावे लागेल. क्लिष्ट अंतराळ विज्ञान, रॉकेट सायन्स, उपग्रह, स्पेस शटल व स्पेस स्टेशन अशा गुंतागुंतीत अडकलेले विज्ञान मस्क यांनी पैसेवाल्यांसाठी खुले केले. मंगळावर वस्तीचे स्वप्न दाखवले.
मोठ्या रकमेची अंतराळ सफारी सुरू केली. ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे, अशांना मस्क यांनी रोमांच विकला. टेस्लाच्या माध्यमातूनही ते असेच वाहनांच्या मालकीचे भविष्य विकत आहेत. ट्विटर विकत घेणे हा मस्क यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. ती कंपनी रोखीने विकत घेऊ अशा बाता त्यांनी मारल्या खऱ्या; प्रत्यक्षात इतर कंपन्यांमधील शेअर्स त्यांना विकावे लागले, कर्ज काढावे लागले. त्यामुळे ते ट्विटर वापरणाऱ्यांचे फुकटात कल्याण वगैरे करतील, हा भ्रम डोक्यातून काढून टाकलेला बरा. राहिला प्रश्न राजकीय नेते व महासत्तांचे काय होईल, तर त्याचेही उत्तर पैशांमध्येच आहे.