माणसाने निर्मिलेले AI माणसालाच हुसकावेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 08:55 AM2023-07-26T08:55:31+5:302023-07-26T08:57:01+5:30

एखाद्या नव्या शोधामुळे संकट वाटू शकतील, असे धोके निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपण यापूर्वीही अशा परिस्थितीतून गेलेले आहोत..

Will human-created AI supersede humans Article by Bill Gates | माणसाने निर्मिलेले AI माणसालाच हुसकावेल?

माणसाने निर्मिलेले AI माणसालाच हुसकावेल?

googlenewsNext

बिल गेट्स, संस्थापक, ‘मायक्रोसॉफ्ट’

सध्या जगभरात सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स-कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) निर्माण झालेल्या धोक्यांची चर्चा  सुरू आहे.  एका अपरिचित आणि सर्वव्यापी तंत्रज्ञानाचा उदय होत असताना ही धास्ती वाटणे अस्वाभाविक नाही. या बुद्धिमान तंत्रप्रणालीमुळे ज्यांच्या नोकऱ्या जातील त्यांचे काय होईल? AI निवडणुकीवर प्रभाव टाकून जनभावनेशी खेळ करील काय?  भविष्यात AIला असे वाटले की, माणसाची आता यापुढे गरज नाही, त्याच्यापासून सुटका करून घेतलेली बरी, तर काय होईल? माणसानेच निर्माण केलेले हे तंत्रज्ञान माणसालाच हुसकावून लावण्याइतके बलिष्ठ होईल काय? हे सगळे प्रश्न अगदी खरे आहेत; परंतु आपण हा सगळा विषय नीट हाताळू शकतो, असे मानायलाही जागा आहे. एखाद्या नव्या शोधामुळे संकट वाटू शकतील असे धोके निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपण यापूर्वीही अशा परिस्थितीतून गेलेले आहोत.
मोटारी आल्या, संगणक आणि इंटरनेटचा वापर वाढला; आपण अशा बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना केला आणि त्याचे उत्तम परिणामही मानवजातीला अनुभवायला मिळाले आहेत.  पहिली मोटार रस्त्यावर आल्यानंतर पहिला अपघातही झाला होता; पण अपघात होऊन माणसे मारतील म्हणून आपण मोटारीवर बंदी आणली नाही, तर वेगावर नियंत्रण, सुरक्षिततेचे उपाय, परवाना आवश्यकता, दारू पिऊन गाडी चालविण्यास प्रतिबंध करणारे कायदे आणि रस्ते वाहतुकीचे इतर नियम लागू केले.

AI : माणसांनी घाबरून जावे, की स्वागत करावे?

सध्या आपण एका नव्या व्यापक बदलाच्या प्रारंभिक अवस्थेत आहोत; AI चे नवे युग येत आहे. हे तंत्रज्ञान इतक्या वेगाने विकसित होते आहे की, ते नक्की कोणत्या दिशेने जाईल याचा अंदाज लावणे मुश्कील! या तंत्रज्ञानामध्ये असलेली अफाट क्षमता, लोक ते नक्की कोणत्या हेतूने वापरातील याबद्दलची साशंकता आणि या तंत्रज्ञानामुळे समाजाच्या; तसेच व्यक्तीच्या एकूणच  जगण्या-वागण्याचा बदलणारा पैस; यामुळे काळजीचे ढग दाटून येणे स्वाभाविक आहे; परंतु नव्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेले प्रश्न सोडविता येतात, याला इतिहास साक्ष आहे.  आरोग्य, शिक्षण, हवामानबदल आणि अन्य काही क्षेत्रांतील किचकट प्रश्न सोडवायला AI आपल्याला मदतच करील, याची मला खात्री वाटते. 

AI मुळे आकाश कोसळणार असल्याची भाकिते करणारे लोक आणि या तंत्रज्ञानामुळे माणसाचे सगळेच प्रश्न सुटतील असा भाबडा आशावाद बाळगणारे लोक; या दोघांशीही माझे मतभेद आहेत. या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारे धोके खरे आहेत; पण त्यातून मार्ग काढणे माणसाला अशक्य नाही, एवढे मला नक्की वाटते.  

AI चा राक्षस माणसांच्या नोकऱ्या फस्त करील काय? 

काही महत्त्वाचे मुद्दे : १. AI मुळे निर्माण होणाऱ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे शोधायला काही  ऐतिहासिक दाखले आपल्याला मदत करू शकतील.  उदाहरणार्थ  या नव्या तंत्रज्ञानाचा शिक्षणावर मोठा परिणाम होईल, हे तर खरेच! पण काही दशकांपूर्वी कॅल्क्युलेटर्समुळे मुलांच्या गणिती क्षमता खालावतील का, यावरून  निर्माण झालेले शंकांचे वादळ आपण अनुभवलेले  आहे आणि अगदी अलीकडे वर्गात संगणक वापरायला परवानगी देण्यात आली तेव्हाही आपल्याला भीती वाटलीच होती. म्हणजे असे टप्पे याही आधी आलेले आहेत आणि आपण त्यातून मार्ग काढू शकलेलो आहोत.  

२. AI मुळे निर्माण होणारे बरेचसे प्रश्न याच तंत्रज्ञानाची मदत घेऊन सोडविता येऊ शकतील.  
३. आपल्याला अनेक जुन्या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, अधिक सुसंगत असे नवे कायदे करावे लागतील. 

- अर्थात, AIचे तंत्रज्ञान अधिक विकसित होऊन पुढले टप्पे गाठील तेव्हा मानवतेसमोर काही गंभीर प्रश्न तयार होतील, हे खरे आहे; पण तो या लेखाचा विषय नाही.  AI स्वतःच आपली  उद्दिष्टे  ठरवू लागली तर काय? थेट मानवाशीच पंगा घेतला तर काय? - आणि तसे होणार असेल तर ही अशी ‘सुपर कृत्रिम बुद्धिमत्ता’ माणसाने मुळात  तयार करावीच का?- हे प्रश्न खरे आहेत आणि अधिक गुंतागुंतीचे आहेत. 

- मात्र या लेखात मी नजीकच्या भविष्यकाळात आपल्याला विचार करावा लागेल, अशा काही प्रश्नांबाबत लिहिणार आहे.
१. डीपफेक्स (AI ने तयार केलेली खोटी माहिती/चित्रे/फोटो) लोकशाही देशांच्या  निवडणुकांमध्ये हस्तक्षेप घडवू शकेल का? 
२. व्यक्ती तसेच सरकारवर हल्ले चढवणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सोपे होऊन बसेल, मग काय करणार?
३. AI मुळे लोकांच्या नोकऱ्या जातील, याला उपाय काय?
४. जगभरातील सामाजिक दुभंग असलेल्या इंटरनेटवरील तपशिलावरच AI पोसले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात गटागटांमध्ये दुफळी निर्माण करणारे सामाजिक वितुष्ट अधिक वाढणार नाही का?
५. शाळा-कॉलेजातली मुले लिहिणे-वाचणे विसरतील, कारण त्यांचे सगळे काम मुळात AI च करील!- हा प्रश्न आपण कसा सोडविणार?
६. या सगळ्या गोंधळाचे पुढे काय होईल? 
- या प्रश्नांची उत्तरे पुढच्या भागांमध्ये!   

(बिल गेट्स यांनी ‘गेट्स नोट्स’ या ब्लॉगवर लिहिलेल्या लेखाचा अनुवादित, संपादित सारांश) 

Web Title: Will human-created AI supersede humans Article by Bill Gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.