भारत, चीन, रशिया एकत्र येणार? जगाचं लक्ष वेधणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 03:45 AM2019-06-20T03:45:41+5:302019-06-20T03:49:08+5:30
तिन्ही देशांत सौहार्द व मैत्र राहावे, अशीच इच्छा अनेकांच्या मनात असली, तरी दुर्दैवाने यातील वास्तव मात्र वेगळे आहे.
भारत, चीन, रशिया एकत्र आल्यास निर्माण होणारी ताकद फार मोठी व साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधू शकणारी आहे. या तिन्ही देशांत सौहार्द व मैत्र राहावे, अशीच इच्छा अनेकांच्या मनात असली, तरी दुर्दैवाने यातील वास्तव मात्र वेगळे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग व रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची दिशेक या शहरी सुरू असलेली चर्चा आशिया खंडासह जगाच्या राजकारणात समीकरणे बदलू शकणारी व त्याला शांततेचा मार्ग दाखवू शकणारी आहे. भारताचे मनुष्यबळ, चीनचे अर्थबळ आणि रशियाचे शस्त्रबळ या आशिया खंडातील अतिशय मोठ्या व साऱ्या जगाला धास्ती घालू शकणाऱ्या बाबी आहेत. त्या तिन्ही एकत्र आल्या, तर त्यातून निर्माण होणारी ताकद फार मोठी व साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधू शकणारी आहे. या तीन देशांत सौहार्द व मैत्र राहावे, अशीच इच्छा यावेळी अनेकांच्या मनात असेल. दुर्दैवाने यातील वास्तव वेगळे आहे.
चीन पाकिस्तानच्या भूमीतून काढू पाहणारा औद्योगिक कॉरिडॉर हा जगाच्या भीतीचा विषय झाला आहे. भारताची त्याला मान्यता नाही. कारण हा कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मिरातून जाणारा आहे, शिवाय भारत व चीन यांच्यातला सीमाप्रश्न अजूनही कायम आहे. १९१३ मध्ये सुरू झालेला हा सीमावाद त्यावर १९६२ मध्ये एक युद्ध होऊनही अद्याप तसाच राहिला आहे. तिकडे रशियाची भारताशी असलेली मैत्री जुनी असली, तरी त्या देशाच्या सैन्याने पाकिस्तानी सैनिकांसोबत पाकव्याप्त काश्मीरच्या प्रदेशात अलीकडेच संयुक्त कवायती केल्या आहेत, शिवाय भारत व रशियातील पूर्वीचे मैत्रही आता पातळ झाले आहेत.
जैश-ए-महम्मद या संघटनेचा प्रमुख अजहर मसूद याला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरविण्याच्या प्रश्नावर चीनने दीर्घकाळ नकाराधिकार वापरल्याने त्याचे भारताशी व जगाशीही नाते दुरावले आहे. आता त्याने तो नकाराधिकार परत घेतल्याने, त्यात काहीशी दुरुस्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झालेच तर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे आता बरेच नमते घेऊ लागले आहेत. दहशतवादाची मोजावी लागणारी किंमत मोठी असते, हे त्यांनाही आता कळले आहे. परिणामी, त्यांची भूमिकाही नरमाईची झाली आहे.
अमेरिकेच्या ट्रम्प यांचे राजकारण, इंग्लंडचे ब्रेक्झिटचे धोरण व युरोपचे अमेरिकेशी दुरावलेले संबंध या साऱ्या पार्श्वभूमीवरही भारत, चीन व रशिया यांच्या संबंधांना महत्त्व आहे. साऱ्या जगावर अमेरिका व युरोपातील वसाहतवादी देशांनी गेली दीडशे वर्षे त्यांचा प्रभाव गाजविला आहे. जगाची बाजारपेठ म्हणून ते देश धनवंत झाले आहेत. भारताने आपल्या प्रगतीची सुरुवात १९४७ मध्ये तर चीनने १९४९ मध्ये केली. रशियाच्या खऱ्या विकासाचा आरंभही याच सुमारास झाला. आता ही राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत, स्वयंपूर्ण आणि एकसंघही आहेत, याउलट युरोपच विकासात माघारल्यागत तर अमेरिका हा देश आपले वर्चस्व शाबूत राखण्यात गुंतला आहे. ही स्थिती आशिया खंडातले जगावरील वर्चस्व वाढवायला अनुकूल आहे. या क्षेत्रातील दहशतवाद, अतिरेक व धर्मांधताच तेवढी आटोक्यात आणायची आहे.
झालेच तर या तीन देशांत असलेले जुने व नवे मतभेद मिटविण्यात त्यांनी यशस्वी होणे आवश्यक आहे. भारत आणि चीनसारखाच चीन व रशिया यांच्यातही सीमावाद आहे. मंचुरियाच्या प्रदेशावरील वर्चस्वाबाबत या दोन देशांत खडाजंगी आहे. अलीकडे चीनने भारताच्या काही प्रदेशांवर हक्क सांगितला असून, त्यातील अनेक शहरांना व क्षेत्रांना आपली नावे दिली आहेत. भारताच्या संमतीवाचून त्याच्या पूर्व टोकावर त्याने ब्रह्मपुत्रेवर धरण बांधले आहे. कोणत्याही क्षणी भारताचा पूर्व भाग पाण्याखाली आणणे त्यामुळे शक्य आहे.
भारत-पाकमधील संघर्षात चीनने सदैव पाकची तर रशियाने भारताची बाजू घेतली. शिवाय या तिन्ही मोठ्या देशात अंतर्गत अशांतता मोठी आहे. सोव्हिएत युनियनचे १५ तुकडे होऊन रशिया हा देश आता निर्माण झाला आहे. चीनच्या झीजियांग या प्रांतात अतिरेक्यांचा हैदोस आहे आणि तिबेटमध्ये धर्मगुरूंचे बंड आहे. भारतात हिंदू-मुस्लीम तेढ वाढीला लागण्याची लक्षणे आहेत, शिवाय या तीनही देशांचे काही कायमस्वरूपाचे प्रश्न आहेत. चीनला हाँगकाँगची डोकेदुखी, रशियाला जॉर्जियाचा उपद्रव तर भारतात काश्मीरचा प्रश्न. हे प्रश्न सामंजस्याने सोडवून या देशांना एकत्र येणे जमणार आहे.