‘दर्पण’कारांचे प्रतिबिंब दिसेल का? रविवार विशेष -- जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:50 AM2019-01-06T00:50:32+5:302019-01-06T00:52:52+5:30
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची कर्मभूमी असलेल्या ज्या मुंबईत स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे जतन व्हावे, तिचा स्वाभिमान बाळगावा, यावरून सत्तर वर्षे राजकारण करण्यात आले. मात्र मुंबईत त्यांचे स्मारक नाही. मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासाची नोंद घेणारी, तिचे जतन करणारी भव्य-दिव्य संस्था
- वसंत भोसले
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची कर्मभूमी असलेल्या ज्या मुंबईत स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे जतन व्हावे, तिचा स्वाभिमान बाळगावा, यावरून सत्तर वर्षे राजकारण करण्यात आले. मात्र मुंबईत त्यांचे स्मारक नाही. मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासाची नोंद घेणारी, तिचे जतन करणारी भव्य-दिव्य संस्था झाली पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीला प्रत्येकाने मदत केली पाहिजे.
आज, ६ जानेवारी! १८७ वर्षांपूर्वी याच दिवशी मराठी वृत्तपत्राची सुरुवात झाली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८६२ रोजी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात पोंभुर्ले या गावाचे सुपुत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईत हा पाया घातला. तो दिवस मराठी वृत्तपत्रसृष्टीत पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पत्रकार आणि पत्रकारितेच्या प्रवासाचा आढावा घेतला जातो. अनेक गुणी पत्रकारांचा गौरव केला जातोे. त्या दृष्टीने हा एक आनंददायी आणि सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा, असा हा दिन आहे.
नागपुरात दोन दिवसांपूर्वी जागतिक मराठी साहित्य संमेलन झाले. त्यात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, असे नमूद करीत दक्षिणेकडील तामिळ, कन्नड, तेलगू, भाषिक जनता ज्याप्रमाणे भाषेच्या प्रेमाबद्दल जागृत आहे. अभिमानी आहे, तसे आपणही असले पाहिजे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. हा कदाचित योगायोग असेल की, पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. यानिमित्त (पत्रकार दिन) एका व्यक्तीची आठवण नेहमी येते.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी ही संस्था चालविणारे साताऱ्यातील फलटणचे रवींद्र बेडकिहाळ यांची. मराठी वृत्तपत्रसृष्टीने जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची स्मृती जपली जावी. त्यांना अभिवादन करावे, आणि त्यांनी ज्या दिवशी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा प्रारंभ केला, तो दिवस मराठी भाषिकांना विनम्रपणे तसेच अभिमानाने साजरा करावा, अशी त्यांची मनोमन इच्छा असते. फक्त इच्छा व्यक्त करुन ते थांबत नाहीत. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून पंचवीस वर्षांपूर्वी (१९९३ मध्ये) दर्पणकारांच्या जन्मगावी पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे स्मारक उभे केले. त्यासाठी जांभेकर कुटुंबीयांनी त्यांना मदत केली. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने पंधरा लाख रुपये निधी उभा केला. मुख्यमंत्री निधीतून पाच लाख आणि खासदार सुरेश प्रभू यांनी एक लाख रुपये निधी दिला. अशा तºहेने फलटणच्या एका पत्रकाराच्या धडपडीतून मराठी वृतपत्रसृष्टीच्या जनकाचे पहिले वहिले स्मारक त्यांच्या निधनानंतर १४६ वर्षांनी उभे राहिले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मुंबईत मराठी वृतपत्राची सुरुवात केली. त्या मराठी माणसांच्या महाराष्ट्राच्या राजधानीत साधे स्मारक नाही की, एक स्मृतिदालन नाही, असे हे आचार्य जांभेकर गृहस्थ कोण होते? दक्षिणेतील भाषेप्रमाणे आपणही मराठी भाषेचा अभिमान बाळगावा, अशी अपेक्षा आपण व्यक्त करतो. पण त्यासाठी आज कृती काय केली? अभिमान बाळगायचा म्हणजे, प्रत्येकाने मराठी शिकलेच पाहिजे म्हणायचे का? दुकानावरील पाट्या मराठीत लिहिल्या गेल्या पाहिजेत, म्हणून दगडफेक करायची का? प्रत्येक सिनेमागृहात आग्रहाने मराठी चित्रपट लावलाच पाहिजे म्हणून दादागिरी करायची का? मला वाटते मराठी भाषेचा प्रवास, त्याची गोडी, समद्धी, त्यातील ज्ञान, त्याचा इतिहास उत्तम पद्धतीने जतन करावा, त्याचे संवर्धन करावे त्यात भर घालावी यासाठी आपण नियोजनपूर्वक प्रयत्न करायला हवेत आहेत. त्यासाठी एक स्पष्ट दिशा असावी लागते.
आज मराठी आश्वासक नाही. मराठी चित्रपटसृष्टीची नाही आणि मराठी साहित्यात दर्जेदार साहित्यकृतींची भर पडत नाही. हे सर्व आपोआप घडणार नाही. नागपूररच्या सभेत टाळ्या पडल्या असतील किंवा किती स्पष्टपणे हा माणूस बोलतो म्हणून वाहवाही झाली असेल. मात्र शासनकर्त्यांनी अधिक सहजता दाखविली पाहिजे. दर्पणात प्रतिबिंब उमटायला प्रतिमा काही तरी समोर उभी करावी लागेल ना?
रवींंद्र बेडकिहाळ यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे चरित्र लिहिले आहे. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर चरित्र आणि कार्य’ असे त्याचे नाव आहे. त्याचा संदर्भ शोधत ते मुंबईतील एशियाटिक सोसायटी आॅफ मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयात गेले. या भव्य टाऊन हॉलमध्ये राज्य शासनाचे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात सर्व पुस्तके आणि दैनिकांसह सर्व नियतकालिके ठेवण्याची सोय आहे. ‘द पे्रस अँड रजिस्ट्रेशन आॅफ बुक्स अॅक्टनुसार या ग्रंथालयास दोन प्रति पाठविण्याची सक्ती आहे. बेडकिहाळ यांनीही आचार्य जांभेकर यांच्या चरित्र्याचा पुस्तकाच्या दोन प्रती दिल्या. मात्र त्या कोठे गेल्या समजलेच नाही. त्या ग्रंथालयात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक असलेल्या गृहस्थाची तसबीर नाही. ग्रंथ नाहीत.
आचार्य जांभेकर हे १८३४ मध्ये मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होते. त्या महाविद्यालयातही जांभेकर यांची स्मृती जपलेली नाही. दि एशियाटिक सोसायटी आॅफ मुंबई (तेव्हाचे बॉम्बे)ची स्थापना २६ नोव्हेंबर १८०४ रोजी झाली आहे. ही संस्था म्हणजे एक प्रकारे मुंंबई प्रांताची वृत्तसंस्थाच मानली जात होती. या संस्थेचा इतका मोठा इतिहास आहे की, जगभरातील संशोधक भारतात संशोधनास येताच तिचा आधार घेतात. या सोसायटीचा जर्नलसमध्ये आचार्य जांभेकर यांची आठ शोधनिबंध लिहिले आहेत. या जर्नल्सचे संपादक प्रा. ए. बी. आर्लेबार यांनी आचार्य जांभेकर यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहताना म्हणाले होते की, बाळशास्त्री जांभेकर यांच्या निधनाने एशियाटिक सोसायटीची अपरिचित हानी झाली आहे.
भारतातील इतिहास आणि संस्कृती यावरचे त्यांचे लेखन अभ्यासपूर्व होते. सोसायटीच्या कार्यात त्यांचे १८६४ पासून योगदान महत्त्वाचे होते. संपूर्ण भारतातील ते एकमेव पहिले भारतीय प्रोफेसर आहेत की, त्यांनी या सोसायटीच्या जर्नल्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन लेख लिहिले आहेत’’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी एकूण सोळा ग्रंथांचे लेखन केले. ‘ज्ञानेश्वरी’ या चिरंतर आध्यात्मिक साहित्यकृतीचे शिळा प्रेसवर पाहिले मुद्रण त्यांनी १८४५ मध्ये केले. बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी ही पहिली लायब्ररी त्यांनी सुरू केली. पुढे त्याचे ‘पिपल्स प्री रीडिंग रूममध्ये रुपांतर झाले. दि एशियाटिक सोसायटी आॅफ मुंबईशी जवळचा संबंध असून, त्या इमारतीत त्यांचे साधे तैलचित्र नाही. शताब्दी साजरी करण्याच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापक होते. तेथे त्यांची स्मृती जतन करणारे काही नाही.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची कर्मभूमी असलेल्या ज्या मुंबईत स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे जतन व्हावे, तिचा स्वाभिमान बाळगावा, यावरुन सत्तर वर्षे राजकारण करण्यात आले. मात्र मुंबईत त्यांचे स्मारक नाही. मुंबईत असंख्य पुतळे झाले, स्मारके झाली. शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये झाली. मात्र शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, इतिहासाचा, चौदा भाषेंचा जाणकार आणि पहिले वहिले मराठी वृत्तपत्र सुरू करणाºया आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव एकाही ठिकाणी नसावे, याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या जन्मगावी भव्य-दिव्य स्मारक करण्यास मर्यादा येतात. केले तरी त्याचा वापर करणे आवश्यक होते. त्याचा संवर्धनाचा मोठा खर्च येतो शिवाय ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आडवळणी गाव आहे.
तेथे छोेटेसे स्मारक पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून उभे राहिले आहे. ते पुरेसे आहे. त्याला थोडे बळ द्यावेत. मात्र मुंबई ही मराठी माणसांची राजधानी आहे. तेथे मराठी भाषिकांचे राजकारण आग्रहाने मांडले जाते. तेथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व्हायला हवे.
स्मारकांचा आग्रह यासाठीच की, इतिहासाची नोंद झाली पाहिजे. मराठी भाषेच्या संवर्धनातील तसेच प्रवासातील दर्पण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मराठी भाषेचा प्रवास हा प्रामुख्याने मौखिकच झाला आहे. ज्या काळात ज्ञानेश्वरी लिहिली गेली. अनेक संतांनी काव्यसुमने गुंफली ती सर्व मौखिकच पद्धतीनेच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली होती. या सर्वसामान्य माणसांनी तिचे जतन केले. जात्यावरील ओव्या गाणाºया महिला कोणत्या मराठी शाळेत गेल्या होत्या? त्यामुळे मराठी माणसांची ही मराठी भाषा त्यांनी येथपर्यंत आणून सोडली आहे. ही भाषा ज्ञानभाषा व्हावी, अशी अपेक्षा राजकर्ते आणि विद्वान, लेखक साहित्यिकच करतात. खरेतर त्यांनीच यासाठी कृती कार्यक्रम आखायचा असतो. तो प्रत्यक्षात आणायचा असतो. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषांनी अभिमान जरूर बाळगला आहे. मात्र, ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचाच आश्रय येतात. स्थानिक पातळीवर राबणारा रस्त्यावरचा माणूस स्थानिक भाषा बोलतो. तिचा वापर करतो, अभिमान बाळगतो. त्या भाषेत आजही उत्तम साहित्यनिर्मिती चित्रपटनिर्मिती आणि काव्यनिर्मिती होत आहे. तसा प्रयत्न मराठीनेही करावा. परवा मृणाल कुलकर्णी यांचा ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असते, हा मराठी चित्रपट पाहिला.
शहरीकरणाच्या वातावरणातील कौटुंबिक संबंध आणि त्याचे झालेले वैश्विकीकरण याचा उत्तम मिलाफ त्यात आहे. असे उत्तम विषय मराठी चित्रपटांनी हाताळले पाहिजेत. समाजात प्रचंड बदल झाला आहे. याची नोंद घ्यायला हवी आहे. सैराट हा चालला कारण खेड्यातील बदल त्यात नेमकेपणाने टिपले आहेत. आणखीन दहा वर्षांने ते जुनाट वाटेल. एक गाव बारा भानगडी उत्तम असला तरी तो कालबाह्य झाला आहे. मात्र, त्याचे जतन आवश्यक आहे. कारण तो मराठी भाषेच्या प्रवासाचा दस्तऐवज आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन हा एकप्रकारे पत्रकार दिनच आहे. कारण त्यांचा जगण्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीला जन्म दिला. त्यांच्या योगदानाला महत्त्व दिले पाहिजे. मुंबई महाराष्ट्रात राहावी, ती मराठी भाषिकांची असावी, म्हणजे काय? मराठी वृत्तपत्रांची मुहूर्तमेढ रोवली, त्याचे स्मरण म्हणजे मराठी माणसांची मुंबई असा अर्थ होत नाही का?
आज सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना मुंबईत जेथून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा प्रारंभ झाला. त्या मुंबईत मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासाची नोंद घेणारी, तिचे जतन करणारी भव्य-दिव्य संस्था झाली पाहिजे. त्यासाठीमहाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीला आपण प्रत्येकांनी मदत केली पाहिजे. मराठी पत्रकारांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान याच्यासाठी दाखवा
की, मराठी वृत्तपत्रसृष्टीचा इतिहास जेथून सुरू झाला तेथून त्याचे जतन करू या! सर्व पत्रकारांना शुभेच्छा !