लाखो प्राण घेणाऱ्यांचे मूळ शोधले जाईल?; ‘कोविड-१९’च्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनाच संशयाच्या घेऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:25 PM2020-05-24T23:25:15+5:302020-05-24T23:26:23+5:30
हे केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नाही. जपान व रशियाही कधीकाळी महाशक्ती होत्या.
>> विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आपल्याला वरकरणी दिसते तशी नसते. तिच्या बाह्यरूपामागे बरेच काही दडलले असू शकते, बरीच कपट-कारस्थाने त्यामागे असू शकतात. सध्या जगातील महाशक्तींमध्ये जे अदृश्य युद्ध सुरू आहे त्याचे दुष्परिणाम लाखो निष्पाप व्यक्तींना निष्कारण भोगावे लागत आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. या युद्धात लोक आपल्या प्राणांची किंमत मोजत आहेत. हा एक खूप गंभीर प्रश्न आहे. सर्व जगात सध्या हाहाकार माजला आहे. लोकांची स्वत:च्या घरांमध्येच बेघरांसारखी अवस्था झाली आहे. लाखो लोक प्राण गमावून बसले आहेत. अनेकांवर भिकेची पाळी आली आहे. पण, छुपे युद्ध खेळणाऱ्या या शक्तींना त्याचे काही सोयर-सूतक नाही. त्यांचा नंगानाच सुरूच आहे. या छुप्या दहशतवाद्यांचे आश्रयस्थान कुठे आहे, हे कोणी शोधून काढू शकेल? त्यांच्या मुसक्या आवळणे कधी खरंच शक्य होईल?
कोरोना महामारीने थैमान घातलेले असताना हे प्रश्न लोकांना सतावत आहेत. कधी अन्नधान्याच्या, कधी औषधांच्या, कधी शस्त्रास्त्रांच्या, कधी अणूयुद्धाच्या, तर कधी जैविक युद्धाच्या नावान या महाशक्तींनी संपूर्ण जगास वेठीस धरलेले आहे. पैसा त्यांचा आहे, अक्कलहुशारी, वैज्ञानिक त्यांचे आहेत. एवढेच नव्हे, तर हवा, पाणी व आकाशावरही त्यांचीच हुकूमत आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाची कदर कोण करणार? या शक्तींच्या उचापतींमुळे पृथ्वीवरील प्रत्येक खंडात दरवर्षी लाखो लोक प्राणास मुकत असतात. किती लोक मरतात किंवा बेघर होतात याची त्यांना काहीच फिकीर नसते! त्यांना केवळ आपल्या हिताची काळजी असते. जगाला आपल्या तालावर नाचविण्यात स्वारस्य असल्याने ही मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात!
हे लोक जगाच्या कल्याणाची भाषा करतात; पण वास्तव काही वेगळेच असते. हे लोक चलाख आहेत व पाताळयंत्रीही! अगदी बेमालूमपणे ते लोकांची मने काबीज करतात. स्वत:ची भाग्यरेखा बळकट करण्यासाठी ते इतरांच्या भाग्यावर वरवंटा फिरवतात. यांच्या कुटिल कारस्थानांची हजारो उदाहरणे इतिहासाने पाहिली आहेत.
पूर्वी आपल्या देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली तेव्हा अमेरिकेने उदार होऊन आपल्याला लाल गहू दिला होता. तो गहू एवढा खराब होता की, त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी अमेरिकेला उद्देशून म्हणाल्या होत्या की, आमच्याकडची जनावरेही हा गहू खात नाहीत. तुमच्याकडची माणसे तो खात असतील तर त्यांनाच खायला घाला! असे म्हणतात की, त्या गव्हात मिसळून त्यावेळी गाजर गवताचे बीसुद्धा आपल्याकडे पाठविले गेले. त्या गाजर गवताची डोकेदुखी आपण आजही भोगत आहोत.
हे केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नाही. जपान व रशियाही कधीकाळी महाशक्ती होत्या. आता त्या रांगेत चीन येऊन उभा ठाकला आहे. कोणतीही महाशक्ती जगात असेच कुटिल खेळ खेळत असते. या महाशक्ती नवनवीन प्रकारची बी-बियाणी तयार करतात. विकसनशीलच नव्हे, तर विकसित देशांच्या सरकारांवरही दबाव आणून तेथे ही बी-बियाणी विकली जातात. शेतकऱ्यांना आमिष दाखविले जाते. थोड्याच वर्षांत जमीन नापिक होते व शेतकरी कंगाल होतो. अशा प्रकारे इतर देशांची अर्थव्यवस्था दुबळी करण्यात त्यांना यश मिळते.
आपली महाकाय जहाजे उभी करता यावीत यासाठी या शक्तींनी आफ्रिकेत पाण्यावर कब्जा केला. उपग्रह पाठवून आकाशावरही सत्ता काबीज केली आहे. एवढेच नव्हे, तर कोणत्या देशात कोण पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष व्हावे हेही या महाशक्तीच ठरवितात. तुर्कस्तान, सीरिया व इराक यांसारखे देश याची उदाहरणे आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या गेल्या निवडणुकीत रशियाच्या कथित हस्तक्षेपावरून झालेला वाद आठवत असेलच.
आपले इप्सित साध्य करण्यासाठी या महाशक्ती इतर देशांना उघडपणे धमक्याही देतात. काही दिवसांपूर्वी भारताने हायड्रोक्लोरोक्विन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:चे मित्र म्हणविणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच दुसऱ्याच दिवशी उघड धमकी दिली. पैशापासून व्यापारापर्यंत अनेक बाबतीत या शक्ती इतर देशांना आपल्याला हवे त्याप्रमाणे झुकवत असतात. इतर देशांना त्रास देण्यासाठी या महाशक्ती उचापती करून या देशांचे शेजारी देशांशी असलेले संबंध बिघडवितात. यासाठी कधी शस्त्रांस्त्राचे, तर कधी पैशाचे गाजर दाखविले जाते.
अमेरिकेने पाकिस्तानला पैसे व शस्त्रे देऊन भारताचे नुकसान केले. आता नेपाळ व श्रीलंकेच्या माध्यमांतून चीन तेच उद्योग करीत आहे. भारतात येणारी अवैध शस्त्रे सर्वांत जास्त प्रमाणात कुठून येतात, हे उघड गुपित आहे. चीन हे त्याचे उत्तर आहे. एखादा देश थोडा जरी शक्तिवान होताना दिसला की या शक्ती त्याला लगेच खाली खेचायला टपलेल्या असतात. इराण हे त्याचे ताजे उदाहरण आहे. यातील विचित्र गोष्ट अशी की, अमेरिका इराकमध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरुद्ध लढते तर सीरियामध्ये त्याच इस्लामिक स्टेटला मदत करते. एखाद्या भागात शांतता नांदायला लागली तर या महाशक्तींना कोणीही विचारणार नाही! या शक्तींवर असाही आरोप केला जातो की, त्या औषध कंपन्यांना रग्गड पैसा देऊन आधी औषधे तयार करून घेतात व त्यानंतर त्या औषधांनुरुप रोग पसरविले जातात.
हे सर्व चित्र पाहता सध्याच्या ‘कोविड-१९’च्या महामारीचा उगम नेमका कसा व कुठून झाला याचा प्रामाणिकपणे व योग्य शोध घेतला जाईल, यावर कोणी विश्वास कसा ठेवावा? ज्यांनी याची चौकशी करायची ती जागतिक आरोग्य संघटनाच सध्या संशयाच्या घेऱ्यात आहे. पक्षपातीपणे चीनला पाठीशी घातल्याचा आरोप या संघटनेवर केला जात आहे. त्यामुळे लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या या महामारीच्या प्रसाराला नेमके जबाबदार कोण याचा शोध घेऊन कोणाला त्याबद्दल दंडित केले जाईल, अशी आशा बाळगण्यात काही अर्थ नाही.