सलोख्याची कबुतरं टेनिसच्या कोर्टावरून उडतील काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 03:10 AM2021-03-15T03:10:38+5:302021-03-15T03:11:16+5:30

टेनिसच्या कोर्टवर एकत्र आल्याने, गझलांच्या मैफलीतून राजकीय प्रश्न सुटत नसतात. पण म्हणून ते प्रयत्नच होऊ नयेत, असेही काही नाही.

Will the pigeons of peace fly off the tennis court? | सलोख्याची कबुतरं टेनिसच्या कोर्टावरून उडतील काय?

सलोख्याची कबुतरं टेनिसच्या कोर्टावरून उडतील काय?

Next

सुकृत करंदीकर, सहसंपादक, लोकमत, पुणे - 

'सरहद के इस पार' म्हणजेच भारतातला रोहन बोपण्णा आणि 'सरहद के ऊस पार'चा पाकिस्तानी ऐसाम उल हक कुरेशी ही जोडी टेनिसच्या कोर्टवर एकत्र आली त्याला यंदा अकरा वर्षे होतील. या दोघांच्या सुदैवाने या दोन्ही शेजारी देशांमध्ये टेनिसला क्रिकेटइतकी लोकप्रियता नाही, त्यामुळे अजूनतरी या दोघांना दोन्ही देशातल्या 'राष्ट्रवाद्यां'नी देशद्रोही ठरवलेलं नाही. पण उलट टेनिस जगतानं या दुकलीचे स्वागत 'इंडो-पाक एक्सप्रेस' असेच केले. पंधरा मार्चपासून मेक्सिकोत खेळल्या जाणाऱ्या डबल्सच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा टेनिस कोर्टवर उतरणार आहे. सध्या हे दोघे एटीपी डबल्सच्या क्रमवारीत जगातल्या पहिल्या पन्नास खेळाडुंमध्ये आहेत. पण 2010 मध्ये जेव्हा बोपण्णा-कुरेशी पहिल्यांदाच एकत्र आले तेव्हा त्यांनी थेट युएस ओपन्सच्या फायनलमध्ये आणि त्याचवर्षी विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारुन चांगलाच दबदबा निर्माण केला होता. पुढच्याचवर्षी पॅरीस डबल्समध्येही त्यांनी जोरदार खेळ केला आणि डबल्सच्या दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या दहात येण्यापर्यंत कामगिरी उंचावली. ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी. पुढे यात सातत्य राहिले नाही आणि सन 2014 मध्ये तर ते चीनमध्ये शेवटचे एकत्र खेळले. आता सात वर्षांच्या खंडानंतर ही जोडी पुन्हा मेक्सिकोच्या कोर्टवर एकत्र उतरते आहे. बोपण्णा-कुरेशी हे दोघे मेक्सिकोत फार मोठी मजल मारतील अशी शक्यता नाही. खेळाच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान एकत्र येत आहेत हीच काय ती मोठी गोष्ट. (Will the pigeons of peace fly off the tennis court?)


अर्थात इतर बहुतेक क्षेत्रांप्रमाणेच टेनिसमध्येही पाकिस्तान भारताच्या तुलनेत फारच मागास आहे. पाकिस्तानच्या जन्मापासून ग्रॅंडस्लॅमसाठी पात्र ठरलेला कुरेशी हा पहिलाच यावरुन ते लक्षात यावे. बोपण्णासोबत कुरेशीने युएस ओपनची अंतिम फेरी गाठल्यानंतर पाकिस्तानातल्या अनेकांना टेनिस माहिती झाले. तेव्हापासून कुरेशी पाकिस्तानी टेनिसचा 'स्टार' बनला. पाकिस्तानी टेनिसच्या प्रगतीसाठी तो खूप प्रयत्न करतो. खेळाडू घडवण्यासाठी निधी उभा करतो. बोपण्णासह रॉजर फेडरर, राफेल नदाल, सानिया मिर्झा यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी कुरेशीला या कार्यात भरघोस आर्थिक मदत केली आहे. पण कुरेशी ज्याप्रमाणे पाकिस्तानी टेनिस विश्वाचा 'रोल मॉडेल' आहे, तशी स्थिती भारतात बोपण्णाची नाही. भारतात बोपण्णा एकटा नाही. लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा यांची लोकप्रियता टिकून आहे. भारतात टेनिसची लोकप्रियता आणि प्रसार वेगाने होतो आहे. 'इंडस्ट्री' म्हणून टेनिसने चांगलेच हातपाय पसरले आहेत. पाकिस्तानात हेच घडवण्याचा प्रयत्न कुरेशीचा आहे. चाळीशी उलटल्यानंतरही मेक्सिकोत बोपण्णासोबत खेळण्याचा फायदा त्याला जो काय आहे तो हाच.  


बोपण्णा-कुरेशी हे टेनिसच्या माध्यमातून भारत-पाकिस्तानातली कटूता कमी करण्यासाठीही पुढाकार घेतात. 'स्टार्ट वॉर, स्टार्ट टेनिस,' ही मोहिम त्यांनी चालवली. यात अभिनव काहीही नव्हते पण तरी यामुळे शांततेसाठीचा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार या दोघांच्या पदरात पडला. वास्तविक बॉलिवुडच्या पडद्यावरुन, क्रिकेटच्या मैदानावरुन भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांततेसाठीची पांढरी कबुतरं यापूर्वीही चिक्कारदा उडवली गेली आहेत. कला-क्रीडेच्या व्यासपीठावरुन ही कबुतरं उडवणारे स्वप्नाळू दोन्ही बाजूला पुष्कळ आहेत. पण या सर्वाचा परिणाम फारच मर्यादीत आणि तात्कालिक असल्याचे आजवर सिद्ध झाले आहे. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना, त्यांच्या संघटनांना 'इस्लामाबाद'चा पूर्ण पाठिंबा असतो आणि पाकिस्तानी जनतेकडूनही त्यांना आश्रय दिला जात असल्याचे वास्तव आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा उघड झाले आहे. टेनिस कोर्टवर किंवा गझलांच्या मैफलीतून राजकीय प्रश्न सुटत नसतात म्हणून प्रत्येक ठिकाणी तलवार काढूनच एकमेकांसमोर उभे ठाकले पाहिजे असेही नाही. कला, क्रीडा, शेती, व्यापार, उद्योग या माध्यमातून होईल तेवढे आदानप्रदान होत राहिले पाहिजे. म्हणूनच - ''हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल को बहलाने के लिए गालिब, ये खयाल अच्छा है!" या वास्तवाचे भान ठेऊनच बोपण्णा-कुरेशीच्या एकत्र टेनिसची मजा लुटावी हे अधिक व्यवहार्य.
 

Web Title: Will the pigeons of peace fly off the tennis court?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.