राज्यातील निवासी डॉक्टरांना कोणी वाली मिळेल का? सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
By संतोष आंधळे | Published: August 12, 2024 08:56 AM2024-08-12T08:56:55+5:302024-08-12T09:00:34+5:30
कोलकाता येथील आर. जे. कर सरकारी रुग्णालयात दुसऱ्या वर्षाला श्वसनविकार विभागात शिकणाऱ्या निवासी डॉक्टरची ९ ऑगस्ट रोजी बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली.
प्रासंगिक - संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी
कोलकाता येथील आर. जे. कर सरकारी रुग्णालयात दुसऱ्या वर्षाला श्वसनविकार विभागात शिकणाऱ्या निवासी डॉक्टरची ९ ऑगस्ट रोजी बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या निवासी डॉक्टरचा मृतदेह रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. मृतदेहावर अनेक जखमा आढळल्या. या प्रकारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रसंगाने केईएम रुग्णालयातील अरुणा शानबाग प्रकरणाच्या कटु आठवणी जाग्या झाल्या.
फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोरडा) या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून डॉक्टरांना रुग्णालयात सुरक्षा पुरविली जावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशातील वैद्यकीय महाविद्यालयात रेसिडेंट डॉक्टर्स सोमवारपासून दिवसभरातील काही निवडक सेवा थांबवण्याचा इशारा दिला आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांची बरी परिस्थिती असली, तरीही निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून आणि समाजकंटकाकडून अनेकवेळा हल्ले झाले आहेत. एखादी अनुचित घटना घडली की, तात्पुरती मलमपट्टी करायची, हे धोरण सोडून ठोस निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे.
तहान भूक विसरून प्रचंड अभ्यास करायचा. कठीण असलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत पास व्हायचे. त्यानंतर ज्या रुग्णालयात काम करत आहोत, त्या ठिकाणी साध्या मूलभूत सुविधा नसलेल्या जागी तीन वर्षे राबायचे, रुग्णसेवा बजावत शिक्षण घ्यायचे. राहण्यासाठी चांगली निवासाची सोय नाही. मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांतील वसतिगृहे बरे असून, राज्यातील इतर भागांत निवासी डॉक्टरांची वसतिगृहांची परिस्थिती भयावह अशी आहे.
कोंबड्याच्या खुराड्यात राहावे, अशी अवस्था या गुणवंत विद्यार्थ्यांची आहे. कसेबसे राहून दिवस काढायचे ही त्यांची दिनचर्या. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांचा परिसर मोठा असून, निवासी डॉक्टरांना अनेकवेळा रुग्णसेवेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवेही नसतात. कुत्रे भुंकत असतात. या भयभीत वातावरणात निवासी डॉक्टर त्याचे कर्तव्य पार पाडत असतो. त्यासंदर्भात तक्रारही करत नाहीत. त्यांच्या करीता किमान संपूर्ण रुग्णालय परिसरात रात्रीची गस्त सुरक्षारक्षकांनी घातली पाहिजे, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने नियोजन करणे आवश्ययक आहे, कारण रुग्णालयात येणारा पहिला रुग्ण बघण्याचे काम हा निवासी डॉक्टर बघत असतो.
सध्याच्या घडीला राज्यात जवळपास ११,२११ निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. या निवासी डॉक्टरांनी दिवसभरात किती तास काम करायचे हे निश्चित नाही. २४ तास रुग्ण सेवा द्यायची. इतर राज्यांतील काही केंद्रीय सरकारच्या अखत्यारीतील वैद्यकीय संस्थेत निवासी डॉक्टरांनी किती काळ काम करावे, यावर काही नियम करण्याचे काम सुरू आहेत. त्यांना साप्ताहिक रजा असावी, यावरसुद्धा चर्चा सुरू आहे.
नियमित डॉक्टरांवर होणाऱ्या या हल्ल्याच्या विरोधात सरकाने केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा आणावा, अशी मागणी केली. अनेक वर्षे इंडियन मेडिकल असोसिएशन करत आहे. या घटनेनंतर फोरडा या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ती मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे. निवासी डॉक्टरांवर असेच हल्ले होत राहिले, तर एके दिवशी हॅशटॅग सेव्ह रेसिडेंट डॉक्टर्स मोहीम राबवायची वेळ येईल.