साध्वी प्रज्ञासिंह, शाप देऊन मतं मागणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 04:47 AM2019-04-25T04:47:45+5:302019-04-25T06:53:50+5:30
भाजपमधील काही समंजसांना जाग आली आणि त्यांनी ‘प्रज्ञासिंहना तिकीट देऊ नका, ते पक्षाला बदनाम करणारे ठरेल’ असे म्हटले. भाजपच्या वरिष्ठांनी त्याविषयीचा त्यांचा अंतिम निर्णय अजून जाहीर केला नसला, तरी यातून भाजपचा चेहरा मात्र उघड झाला आहे.
प्रज्ञासिंह ठाकूर असे नाव असलेल्या आणि स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या उमेदवाराचे भोपाळमधील तिकीट भारतीय जनता पक्षाने कापण्याचा व तेथे डमी म्हणून उभ्या केलेल्या उमेदवारालाच रिंगणात ठेवण्याचा विचार सुरू केला असल्याचे वृत्त दिलासा देणारे आहे. उद्या ते चुकीचे ठरले आणि भाजपने आपला निर्ढावलेपणा तसाच कायम ठेवून त्यांना दिलेली उमेदवारी कायम केली, तरी त्या पक्षात किमान काही माणसे तरी चांगले विचार करणारी व शहिदांचा सन्मान करणारी आहेत, हेही यानिमित्ताने समोर येईल.
भोपाळची उमेदवारी पक्षाने जाहीर न करता दीर्घकाळ गुलदस्त्यात ठेवली, तेव्हाच त्यात काही डाव असावे असा संशय साऱ्यांना आला होता. काँग्रेसने त्या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने अचानक प्रज्ञासिंह यांचे नाव तेथे आणले आणि देशात एक चर्चेचा गदारोळ उभा राहिला. प्रज्ञा ठाकूर या दहशतखोरीच्या आरोपावरून कित्येक वर्षे तुरुंगात राहिलेल्या व पुढे निव्वळ संशयाचा फायदा मिळून बाहेर आलेल्या महिला आहेत. मालेगावात बॉम्बस्फोट घडवून दोन डझन निरपराध व्यक्तींचा बळी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आजारी असल्याने सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाची चौकशी हेमंत करकरे या साऱ्या देशाला अभिमान वाटावा, अशा चोख व इमानदार अधिकाऱ्याने केली आहे. ती करताना त्यांनी धर्म किंवा जात यांचा विचार न करता केवळ गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित केले.
प्रज्ञासिंग यांनी तुरूंगात झालेल्या छळाचे वर्णन करून त्याबद्दलही करकरेंना दोष दिला. मात्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने तर त्याचे खंडन केले. शिवाय तुरूंगात असतानाच्या काळात त्यांनी केलेल्या अशा तक्रारींची शहानिशा केल्याचे आणि त्यात तथ्य न आढळल्याचे तपशील जाहीर करून अन्य यंत्रणांनीही त्यांना तोंडघशी पाडले. त्या तुरुंगात असतानाच मुंबईवर झालेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडून करकरे शहीदही झाले. असा तेजस्वी इतिहास असलेली ही व्यक्ती ‘मी दिलेल्या शापामुळे मरण पावली आणि त्यांचा मृत्यू झाल्याने माझे सुतक संपले,’ असे उद्गार या प्रज्ञासिंह यांनी काढले. त्यावर पोलीस दलातील अधिकारी, करकरे यांना ओळखणारे व त्यांच्या पथकातील सारे संतापले. त्यांच्या उद्गारांचा निषेध महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशासह सर्वत्र झाला. सर्वत्र निदर्शने झाली. पण भाजपचा निर्ढावलेपणा असा, की त्या निषेधालाच प्रसिद्धी समजून त्या पक्षाने या वक्तव्याची राळ उडालेली असतानाही प्रज्ञासिंह यांना भोपाळचे तिकीट दिल्याचे जाहीर केले. त्याहून दुुर्दैव हे की ‘हे हिंदू दहशतवादाच्या आरोपाला दिलेले उत्तर आहे,’ अशा शब्दांत त्यांच्या या बेताल वक्तव्याचे समर्थन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मोदी आणि शहा कशाचे समर्थन करतील आणि कशाला पाठिंबा देतील, याचाही नेम राहिलेला नाही. ते पाकिस्तानशी क्रिकेट खेळायला नकार देतात आणि नवाझ शरिफांकडे मेजवानी झोडायला जातात. राजकारणी माणसाचे मन मतलबी व स्वार्थी असते, त्याचा अशा प्रसंगी फारसा विचारही करायचा नसतो. या परिस्थितीत भाजपतील काही शहाण्या व समंजसांना मात्र जाग आली आणि त्यांनी ‘प्रज्ञासिंह यांना तिकीट देऊ नका, ते पक्षाला बदनाम करणारे ठरेल,’ असे म्हटले. अर्थात भाजपच्या वरिष्ठांनी त्याविषयीचा त्यांचा निर्णय अजून जाहीर केलेला नाही. जे लोक अडवाणी, जोशींना रस्त्याच्या बाहेर टाकू शकतात ते प्रज्ञासिंहबाबत या समंजसांचे ऐकतीलच असे नाही. काही झाले तरी यातून भाजपचा खुनशी चेहरा मात्र उघड झाला आहे.
प्रज्ञासिंह यांच्या शापाने देशभक्त मरतात; तर त्या देशद्रोह्यांना आणि देशाच्या शत्रूंना शाप का देत नाही? याच न्यायाने ‘तुम्ही मला मत देत नसाल, तर मी करकरेंना दिला तसा शाप तुम्हाला देईन,’ असे त्या भोपाळच्या मतदारांना म्हणू शकतील की नाही? भाजपचे नेते त्यांच्या या शापवाणीच्या धाकात अडकल्यानेच तर त्यांना त्यांचा निर्णय तत्काळ बदलता येत नाही ना? देशात पुन्हा शापवाणी उच्चारणाºयांचे दिवस येत आहेत का? स्वत:ला साध्वी म्हटल्याने कुणी धार्मिक वा धर्मज्ञ होत नाही. तुमचे वक्तव्य व वर्तणूकच तुम्हाला ते पद देत असते. प्रज्ञासिंह यांनी ते गमविले आहे. आता त्यांचा निकाल देण्याची पाळी भाजपवर आहे.