वाहतूककोंडी फोडण्याची द्रुतगती योजना अंमलात येईल का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 05:52 AM2022-08-16T05:52:48+5:302022-08-16T05:56:32+5:30
वाहतूक नियोजनाअभावी असे प्रसंग वरचेवर घडत आहेत. यातून बोध घेत महामार्गांवरील वाहतूकव्यवस्थेत सुधारणा होणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
- रवींद्र राऊळ
(वृत्त संपादक, लोकमत, मुंबई)
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाला लागून आलेल्या शनिवार- रविवारच्या सुटीमुळे मुंबई शहराबाहेर मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या वाहनांमुळे सर्वच महामार्गांवर कोंडी होऊन वाहतूकव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. वाहतूक नियोजनाअभावी असे प्रसंग वरचेवर घडत आहेत. यातून बोध घेत महामार्गांवरील वाहतूकव्यवस्थेत सुधारणा होणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई महानगरात ये - जा करण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर रोड, मुंबई - गोवा महामार्ग, ईस्टर्न - वेस्टर्न, लाल बहादूर शास्त्री मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड अशा प्रमुख मार्गांचा वापर केला जातो. गेले तीन - चार दिवस या सर्वच हमरस्त्यांवर वाहतुकीची दैना होत आहे त्याला अनेक कारणे आहेत. ती दूर केल्याशिवाय महामार्गांवर होणारी वाहनचालक आणि प्रवाशांची परवड थांबण्याची शक्यता नाही. सध्याची कोंडी होण्याचा प्रकार नवा नाही. मुंबई, पुण्याहून वीकेंडच्या टूरवर निघालेल्या वाहनांच्या गर्दीमुळे मुंबई - पुणे द्रुतग्रती महामार्गावरील खंडाळा घाट विभागात गोंधळाची आणि वाहतूककोंडीची परिस्थिती निर्माण होते. मुंबई - गोवा महामार्गाचे कामही रखडलेलेच आहे.
मुंबईतील अंतर्गत रस्त्यांसह महामार्गांवर खड्डे हे कायमचेच. पण सध्या पावसाळ्यामुळे या खड्ड्यांमध्ये आणखीनच भर पडली आहे. हे खड्डे प्रवासाचा कालावधी वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतातच; शिवाय वाहनांचे अपघात होऊन प्राणहानीच्या घटनाही घडत आहेत. पण, सध्या मानवाच्या जीवितापेक्षा रस्ते कंत्राटातील घोटाळे अधिक महत्त्वाचे ठरत आहेत.
विविध घातक रसायने, वायू, तेल यांचे भलेमोठे टँकर तसेच अन्य अवजड यंत्रे वाहून नेणारी वाहने ऐन गर्दीच्या वेळी कधी घाटात तर कधी महामार्गावर बसकण मारतात. ही वाहने हटविण्यासाठी कधीकधी सहा - सात तास लागतात. तोवर वाहतूकव्यवस्था ढेपाळून हजारो नागरिकांचा वेळ वाया जाऊन मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूककोंडीही होते. अपघातात पंचनाम्यासारखे सोपस्कार पाडून वाहने हटविण्यावर जोर दिला जात असला तरी वेळ वाचविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार झाला पाहिजे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षभरापासून वाहनांना आगी लागून गंभीर घटना घडल्या आहेत. महामार्गावर अग्निशमन यंत्रणेसह अनेक सुरक्षा सुविधांची वानवा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळे हा महामार्ग वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. या महामार्गाच्या आजूबाजूला रासायनिक व इतर औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतींतून मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायने महामार्गाद्वारे इतरत्र पाठविली जातात. याचबरोबरीने गॅस टँकर, घरगुती गॅस सिलिंडर, ज्वलनशील पदार्थ अशी धोकादायक वाहने या महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात.
या वाहनांच्या अपघातांत अनेकदा तातडीने मदतकार्य मिळत नसल्यामुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटर लांबीच्या रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा होतो. महामार्गावर अपघातग्रस्त वाहने हटविण्यासाठी पुरेशी यंत्रणा तसेच अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णवाहिका किंवा प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध होत नाहीत. महामार्गांची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांनी तशी यंत्रणा न उभारल्यामुळे महामार्ग मृत्यूचे सापळे ठरत आहेत. सुरक्षायंत्रणेअभावी पोलीसही हतबल आहेत.
महामार्गावर अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे; त्याचबरोबर उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारणे, तशी सुरक्षा यंत्रणा तैनात करावी, अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. त्यानंतरही त्याची पूर्तता झालेली नाही.
महामार्ग बेजार करणाऱ्या या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून दूरदृष्टी ठेवत त्यावरील उपाययोजना द्रुतगतीने साकारल्यास नागरिकांना वरचेवर होणारा हा त्रास कमी करता येणार नाही का?