फास आवळेल?

By admin | Published: August 5, 2015 10:23 PM2015-08-05T22:23:13+5:302015-08-05T22:23:13+5:30

प्रदीर्घकाळ भारतीय क्रिकेटच्या (चेंडू-फळी नव्हे तर पैशाच्या) खेळावर ज्यांनी आपली एकहाती हुकुमत गाजविली आणि भल्याभल्यांना आपल्या हुकुमाचे

Will the trap be filled? | फास आवळेल?

फास आवळेल?

Next

प्रदीर्घकाळ भारतीय क्रिकेटच्या (चेंडू-फळी नव्हे तर पैशाच्या) खेळावर ज्यांनी आपली एकहाती हुकुमत गाजविली आणि भल्याभल्यांना आपल्या हुकुमाचे ताबेदार बनविले, त्या ललित मोदी यांच्याविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक हुकुम बजावल्यामुळे आता खरोखरीच मोदी यांच्याविरुद्धचा फास आवळला जाईल असे अनेकाना वाटू शकते. मोदींना आता थेट इंग्लंडमधून मुसक्या आवळून भारतात आणले जाईल आणि मग आपोआपच ते स्वत: आणि सुषमा स्वराज व वसुंधराराजे यांच्यातील नात्याचे बंध खुले होतील असेही काहींना वाटू शकते. या दोन्ही भगिनींच्या तसेच आणखीही काही अज्ञात भावा-बहिणींच्या सहकार्यामुळे ललित मोदी गेली तब्बल सात वर्षे भारतीय कायदे धाब्यावर बसवून विदेशात सुखेनैव कालक्रमण करीत आहेत. स्वराज आणि राजे आज सत्तेत नसते व त्यांचे ललित-साह्य उजेडात आले नसते तर आणखीही काही काळ मोदी मजेत राहिले असते. पण तसे झाले नाही. विशेषत: सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस पक्ष अडून बसला व त्याने संसदेचे काम रोखून धरले तेव्हां कुठे अंमलबजावणी संचालनालय जागे झाले वा त्याला जागे केले गेले. ‘आयपीएल’ नावाच्या क्रिकेटच्या सर्कशीच्या खेळाचे दूरचित्रवाणी हक्क प्रदान करताना ललित मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर डॉलर्सची अफरातफर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सात वर्षांपूर्वी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन सदरहू आरोप ठेवला गेला आहे. तसे असताना हा संपूर्ण काळ अंमलबजावणी संचालनालय आणि त्याचे बोलविते धनी असलेले सरकार हात बांधून गप्प बसले होते. साहजिकच ललित यांच्याविरुद्ध अटकेचा हुकुम जारी करण्याची विनंती जेव्हां विशेष न्यायालयाकडे केली गेली तेव्हां या न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी, मोदी यांना अगोदरच अटक का केली नाही, असा रास्त सवाल केला. त्यावरील संचालनालयाचे उत्तर मोठे मासलेवाईक होते. मोदी सापडत नव्हते आणि त्यांच्या विरुद्धच्या आरोपांची चौकशी पूर्व प्राथमिक स्तरावर आहे! ती आजही तशीच आहे. आता अटकेचा हुकुम लंडनला जाईल. तो बजावला जाईल व मोदी अटकले वा अडकले जातील. पण लंडन अभी बहुत दूर है!

Web Title: Will the trap be filled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.