International Women's Day 2021: ...या स्त्रियांचा कान आपण कधी धरणार की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:09 AM2021-03-08T02:09:20+5:302021-03-08T02:11:29+5:30

हिशेबीपणाने धोके पत्करून संभाव्य फायद्यांसाठी विवेक गुंडाळून ठेवलेल्या सज्ञान, सक्षम स्त्रियांना समाजाची सहानुभूती का मिळावी?

... will you ever listen to these women? | International Women's Day 2021: ...या स्त्रियांचा कान आपण कधी धरणार की नाही?

International Women's Day 2021: ...या स्त्रियांचा कान आपण कधी धरणार की नाही?

googlenewsNext
ठळक मुद्देपरस्पर सहमतीने निर्माण झालेल्या लैंगिक संबंधांचा विचका होऊन एखादे नाते बिघडून चव्हाट्यावर येते, तेव्हा त्यातल्या पुरुषाला दूषणे मिळणे, सत्तास्थाने सोडावी लागणे हे ओघाने आलेच

अपर्णा वेलणकर

आपल्या स्त्रित्वाचे पुरते भान असलेली, विशी ओलांडलेली सज्ञान तरुणी. तारुण्य, सौंदर्य आणि पाणी खोल असूनही त्यात पाऊल घालण्याची बेदरकार हिंमत इतक्या भांडवलावर तिला स्वप्ने सत्यात उतरवायची घाई आहे. पैसा, प्रसिद्धी आणि सत्तेसाठी समाजमान्य चौकटी, नीतिमूल्ये तर सोडाच ; साधा विवेक आणि शहाणपणही तिने खुंटीवर टांगले आहे. 

या तरुणीची कुणीतरी शिकार करतो. ते जाळे बलिष्ठ ‘सत्तेच्या खुर्ची’वरून फेकलेले असल्याने ती स्वखुशीने - घाईनेच- त्या जाळ्यात शिरते. कालांतराने ती ‘त्याला’च  सावज बनवते आणि देवाण-घेवाणीचा खेळ रंगतो. कोण कुणाला कशासाठी वापरून घेते आहे, कळेनासे होते. न्याय-अन्यायाच्या व्याख्या उलट्या-पालट्या होतात, शिकारी-सावजाच्या भूमिकाही बदलत राहतात. परस्पर हितसंबंधांचा व्यवहार चोख चालू असतो, तोवर तक्रार नसते. ‘वापरून घेण्या’चे आरोप नसतात कारण ‘वापरू दिल्या’च्या बदल्यात जे हवे ते ‘मिळत’ असते. देण्या-घेण्याचे गणित बिघडले, अपेक्षा आणि वास्तवातले अंतर ताणले गेले की, मग मात्र संघर्षाला तोंड फुटते. हाती असावीत म्हणून पुराव्यांची शस्रे आधीपासूनच जमवलेली असतात. फोटो, व्हॉइस क्लिप्स, कॉल्सचे रेकॉर्डिंग, रात्रीच्या मुक्कामांचे तपशील. त्या आधाराने बदनामी सहजशक्य करणारे चव्हाटे काय, हल्ली एका क्लिकवर! पण ही बदनामीची शस्रे उगारून ब्लॅकमेलिंगच्या लढाया लढवणे परवडूच नये, अशा  सत्तेच्या खुर्चीवर या दोघातला कुणी असला, की बघताबघता प्रकरण हाताबाहेर जाते. दुसऱ्याला नाहीसे करणे, ते शक्य नसेल तर स्वत:च स्वत:चा कडेलोट करून घेणे असे टोकाचे पर्याय उरतात - मग काय घडते हे महाराष्ट्राने नुकतेच दोन सलग प्रकरणांमध्ये पाहिले. वर उल्लेखिलेल्या तरुणीचे आयुष्यच संपले/संपवले गेले! आधीच्या प्रकरणात ‘नाडली गेल्याने न्याय मागणारी 'स्त्री’ अचानक ‘तसे काही नव्हतेच’ म्हणाली! यातली नावे सोडा, महत्त्वाचे आहे ते स्त्री-पुरुषांमधल्या बदलत्या नातेसंबंधांचे परिमाण!... आणि  एक विचित्र नैतिक गोंधळ!

परस्पर सहमतीने निर्माण झालेल्या लैंगिक संबंधांचा विचका होऊन एखादे नाते बिघडून चव्हाट्यावर येते, तेव्हा त्यातल्या पुरुषाला दूषणे मिळणे, सत्तास्थाने सोडावी लागणे हे ओघाने आलेच! त्यात काही गैरही नाही. गैर आहे ती अशा ‘नात्यां’मध्ये स्वत:हून शिरलेल्या, हिशेबीपणाने धोके पत्करून संभाव्य फायद्यांसाठी विवेक गुंडाळून ठेवलेल्या सज्ञान स्त्रियांना मिळणारी सहानुभूती! उदरनिर्वाहाचे / स्वप्नपूर्तीचे दुसरे अगणित पर्याय/मार्ग उपलब्ध असताना ज्या स्त्रिया स्वत:चे शरीर ‘चलन’ म्हणून बिनदिक्कत वापरतात, ‘आपला वापर केला जात आहे’ याची पूर्ण जाणीव असतानाही त्या जाळ्यातून बाहेर न पडता त्याबदल्यात अगणित फायदे उकळण्याची ईर्ष्या बाळगतात; अशा स्त्रियांना समाजाची सहानुभूती का मिळावी? हे सारे करणाऱ्या पुरुषांना त्यांच्या कृत्याचा जाब द्यावा लागतो; त्याच व्यवहारात स्व-खुशीने बरबटलेल्या स्त्रियांचे कान धरायची सुरुवात आपण कधी करणार?

हे खरे, की या प्रकरणांमधले खरे-खोटे तपासणे सोपे नसणार. ते कधीच नसते. निदान त्यातले सरसकटीकरण तरी आता आपण थांबवले पाहिजे. अपराधाचे  माप त्याच्याबरोबरच तिच्याही पदरात टाकायची तयारी दाखवली  पाहिजे. राजकीय नेते, अभिनेते, उद्योगपती, अधिकारी - सत्ता आणि संपत्तीच्या उतरंडीत उच्च स्थानावरच्या  पुरुषांचा बेरकी वापर करायला सोकावलेल्या स्त्रिया रंगाचा बेरंग होऊ लागला की, अचानक 
स्त्रित्वाचे कार्ड पुढे करून त्या आधारे ‘न्याया’ची अपेक्षा करतात. अशा स्त्रियांची बाजू घेणारे आक्रंदन हा स्त्री-वाद तर सोडाच, साधा शहाणपणाही नव्हे! अशा प्रकरणांमधल्या स्त्रियांच्या दोषांची, चुकांची जाहीर चर्चा होत नसल्याने मागून येणाऱ्या महत्त्वाकांक्षी तरुणींना भविष्यातल्या धोक्यांची योग्य ती जाणीव करून देण्याची संधीही आपण गमावत नाही का? याचा अर्थ सर्वच स्तरावरच्या स्त्रिया आपल्या फायद्यांसाठी सत्तास्थानांवरच्या पुरुषांना नादी लावण्याएवढ्या अविचारी अगर सक्षम  आहेत, असा मुळीच नव्हे. पण संबंधित स्त्री आर्थिक-सामाजिक-शैक्षणिकदृष्ट्या कोणत्या स्तरावर आहे; यासारखे काही प्रारंभिक निकष लावून समंजस विवेकाने यात तर-तम करावे लागेल.  खेडेगावात कुटुंबाच्या मानेवर सुरी ठेवणाऱ्या पुरुषाच्या धाकाला बळी पडणारी अगतिक स्त्री आणि उच्चपदस्थ पुरुषांचा सोईस्कर वापर करून स्वार्थ साधण्यात किंचितही विधिनिषेध न मानणारी सुशिक्षित, सक्षम  स्त्री यात आपण फरक करणार की नाही? 

भारत हा एकाचवेळी अठराव्या - विसाव्या आणि बाविसाव्या शतकात जगणारा विविध स्तरीय वास्तवाचा देश आहे. त्यापैकी अनेकानेक स्तरांवर असलेल्या स्त्री-पुरुषांचे वास्तवही वेगवेगळेच असणार. न्यायालयांनी  आणि मुख्य म्हणजे, माध्यमांनीही हा विवेक करायला  शिकले पाहिजे. कोणीही कुणाचा फायदा घेणे चूकच! पुरुषाने बळजोरी करून आपला सत्तागंड, भूक शमवण्यासाठी स्त्रीवर अत्याचार करणे जितके निंद्य; आपला फायदा करून देऊ शकेल अशा समर्थ पुरुषाला वश करून स्वार्थ साधण्याची स्त्रीची चटोर धडपडही तितकीच निंद्य... आणि करुणही! 

aparna.velankar@lokmat.com

Web Title: ... will you ever listen to these women?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.