चार खोके मिळतील का..? त्यानं एकदम डोळे वटारुन पाहिलं

By अतुल कुलकर्णी | Published: September 18, 2022 10:00 AM2022-09-18T10:00:23+5:302022-09-18T10:01:02+5:30

साहेब मला खोके मिळेनात. त्यामुळे पंचाईत होत आहे... परवा पेपरात बातमी आली होती, पन्नास खोके... एकदम ओके...!

Will you get four boxes..?, polical satire on Shivsena rebel MLA and Eknath Shinde | चार खोके मिळतील का..? त्यानं एकदम डोळे वटारुन पाहिलं

चार खोके मिळतील का..? त्यानं एकदम डोळे वटारुन पाहिलं

googlenewsNext

अतुल कुलकर्णी

प्रिय साहेब,
नमस्कार
साहेब, अर्जंट गरज पडली म्हणून तुमचा वट असणाऱ्या दुकानात गेलो... त्याला तुमचं नाव सांगून चार खोके द्या म्हणालो... मला वाटलं तुमचं नाव सांगितलं की तो पटकन चार खोके देऊन टाकेल... झालं उलटच... त्यानं एकदम डोळे वटारुन पाहिलं... म्हणाला तू केवढा... तुझा जीव केवढा... तुला रे कशाला हवेत चार खोके...? त्याला म्हणालो, महत्त्वाचं काम आहे... खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकूनच घ्यायला तयार नाही... वरतून म्हणतो, जे होतं-नव्हतं ते ऑलरेडी पॅक झालं... सुरत, गुवाहाटी, गोवामार्गे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावात रवाना झालं... आता काही उरलेलं नाही, जे उरलंय ते भंगार आहे... बाबारे, मला समजेल असं बोलशील का..? असं म्हणालो, तर त्याने डोळे वटारून, चला व्हा पुढं... असं म्हणत मला हाकलून दिलं... पुढच्या दुकानात गेलो. त्यांना तुमचं नाव सांगितलं... म्हणालो, बाबारे तुझ्याकडे चार खोके आहेत का..? लवकर दे... नाहीतर तुम्हाला सांगेन म्हणून जरा दमात बोललो... तर त्यानं माझ्यापेक्षा दुप्पट आवाजात मला, चला व्हा पुढं... असं म्हणून बाहेर काढलं.

साहेब मला खोके मिळेनात. त्यामुळे पंचाईत होत आहे... परवा पेपरात बातमी आली होती, पन्नास खोके... एकदम ओके...! मला तर चारच खोके पाहिजे होते. पण एकही दुकानदार द्यायला तयार नाही... खोके पाहिजे असं म्हणालो की प्रत्येकजण माझ्याकडे डोळे वटारून बघतो... आपला महाराष्ट्र एवढा संपन्न तिथं खोक्याची टंचाई का बर व्हावी...? हा प्रश्न मला सतावत आहे...

आमची सौ. रोज मला बोलते... लोकांना पन्नास पन्नास खोके मिळाले... तुम्हाला चार खोके आणता येईनात... असं म्हणून सकाळी सकाळी सुनावत राहते... सकाळचा चहा गोड लागेना... आज चहा देताना म्हणाली, आता तुम्ही थेट पोलिसातच जा. तुम्हाला ते पोलीस रोज सलाम करतात.... काय चाललंय विचारतात... बघा ओळखीचा काही फायदा होतो का ते... ते कोणाला तरी सोय करायला सांगतील. तिचं ऐकून घराजवळच्या ठाण्यात गेलो. पोलीस दादा ओळखीचे होते. नमस्कार चमत्कार झाला. त्यांनी माझ्यासाठी एक कट मागवला.... चहा पिता पिता आजूबाजूला पाहून घेतलं... हळूच त्यांना विचारलं, दादा चार खोके पाहिजेत...? कुठे मिळतील...? माझा प्रश्न ऐकल्याबरोबर त्याने अंगावर पाल पडावी तसं मला झटकून टाकलं... म्हणाला, तुम्ही रोज इथे दिसता, म्हणून तुम्हाला या बसा म्हणालो... बोट धरायला दिलं तर हातच घेऊन टाकता राव तुम्ही... तुम्हाला कशाला पाहिजे चार खोके...? गप गुमान निघा, नाहीतर मोठ्या साहेबांना सांगून आतच टाकून देईन... असं म्हणत त्याने उरलेला चहा पण मला पिऊ दिला नाही... तरी मी माझा मुद्दा पुढे रेटला... त्याला म्हणालो, दादा रे, लोकांना पन्नास खोके मिळतात, सगळं एकदम ओके होतं... मला चारच खोके पाहिजेत... तू एवढा का चिडतोस... तर, त्यांनी माझी कॉलर पकडून थेट मोठ्या साहेबांपुढे नेलं आणि त्यांच्या कानात काहीतरी पुटपुटला... त्याबरोबर मोठ्या साहेबांनी दरवाजा बंद करायला लावला... माझ्याकडे नजर रोखून म्हणू लागले, तुम्हाला कशाला हवे चार खोके...? कोणाकडून आला आहात तुम्ही...? ची ती नजर पाहून मला घामच फुटला... मी त्याला म्हणालो, दोन दिवस झाले. सगळीकडे फिरतोय... कोणी खोके देईना... खोके मागितले की लोक डोळे वटारतात, आणि पुढे जा म्हणून सांगतात... दसरा-दिवाळी आलीय. घर आवरायला काढलंय. जुनी पुस्तकं बाजूला काढली आहेत. जुन्या आठवणीच्या वस्तू पोराला, सुनबाईला आवडेनात म्हणून काढून ठेवल्या आहेत. हे सगळं सामान ठेवायसाठी किमान चार खोके लागतील, म्हणून सगळीकडे फिरतोय. पण एकजण खोके द्यायला तयार नाही... आणि घरी गेलो की बायको बसू द्यायला तयार नाही... तुम्हीच सांगा आता, मी काय करू...? त्यावर त्या साहेबांनी कपाळावर हात मारला... आणि म्हणाले, चला व्हा पुढं... आता साहेब, तुम्ही तरी चार खोके कुठूनतरी आणून द्या... म्हणून तुम्हाला हे पत्र लिहायला घेतलंय... चुकलं माकलं माफ करा... पण चार खोके द्यायची सोय करा....   - तुमचाच बाबूराव

(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक, आहेत)

Web Title: Will you get four boxes..?, polical satire on Shivsena rebel MLA and Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.