पराभवाचे प्रायश्चित्त घेणार ?

By admin | Published: October 21, 2014 02:33 AM2014-10-21T02:33:48+5:302014-10-21T02:33:48+5:30

पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, अजित पवार, आर. आर. पाटील किंवा जयंत पाटील हे मंत्री आणि माणिकराव ठाकरेंसह त्यांची प्रदेश कार्यकारिणी हे सारेच एका राजकीय शिक्षेला पात्र होते

Will you take the penance of defeat? | पराभवाचे प्रायश्चित्त घेणार ?

पराभवाचे प्रायश्चित्त घेणार ?

Next

पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, अजित पवार, आर. आर. पाटील किंवा जयंत पाटील हे मंत्री आणि माणिकराव ठाकरेंसह त्यांची प्रदेश कार्यकारिणी हे सारेच एका राजकीय शिक्षेला पात्र होते. त्यांच्यातील काहींचा व्यक्तिगत तर काहींचा पक्षगत पराभव करून मतदारांनी त्यांना शिक्षा केली आहे. पृथ्वीराजांना स्वच्छ प्रतिमेचा माणूस म्हणून दिल्लीकरांनी मुंबईत पाठविले. त्यासाठी राज्यातील अनेकांना त्यांनी बाजूला सारले. मात्र, पृथ्वीराज आपले स्वच्छपण जोपासण्यात एवढे अडकले, की ते होते तेथे राहिले आणि त्यांचे सरकारही पुढे सरकताना कधी दिसले नाही. मुख्यमंत्र्यांचा आदर्श अशा स्थिरतेचा असल्याने बाकीचे मंत्रीही त्यांच्या खुर्च्या सांभाळत घट्ट व स्थिर राहिले. परिणामी राज्य स्थिरावले आणि कोणत्याही क्षेत्रात त्याला प्रगतीचे नवे पाऊल टाकणे जमले नाही. निवडणुका आल्या तेव्हा जाहिरातीचा खजिना उघडला गेला. पण, तोवर साऱ्यांच्या निष्क्रियतेविषयी जनतेची खात्री झाली होती. राणे मुजोरीत गेले, पवार असभ्यपणात गेले, आर.आर. आणि जयंत पाटील स्वत:ची छबी सांभाळण्यात गेले, तर माणिकराव ठाकरे सत्कार समारंभ आणि शानशौकात गेले. वरची माणसे अशी असतील, तर संघटना जशा संपायच्या तशाच संपणार. शरद पवार अधूनमधून त्यांच्या पक्षाला टोचण्या देत. पण, ते दिल्लीत परतले, की त्यांचे इथले पुढारी पुन्हा त्यांच्या त्याच कारवायात रमत. मग भ्रष्टाचाराला संरक्षण आले. सिंचन दडपणे झाले व आदर्शचा घोटाळा उडाला... लोक जागे आहेत, माध्यमांची नजर तीक्ष्ण आहे आणि कोणतीही बाब आता लपून राहणार नाही, या वास्तवाचा विसर पडण्याएवढे सारे आपल्या मस्तीत बेभान. जनतेला बदल हवा होता हे म्हणणे खरे असले, तरी त्याच वेळी या साऱ्यांना त्यांची जागा दाखवणेही तिच्या मनात होते. माणिकराव ठाकऱ्यांनी पराभवानंतर राजीनामा दिला. तो मानभावीपणा आहे. हा राजीनामा आधीच दिला असता, तर त्याचा काही उपयोग तरी झाला असता. आपल्या मुलाचे डिपॉझिट वाचवू न शकलेला प्रदेशाध्यक्ष अशी त्यांच्या नावाची नोंद यापुढच्या राजकारणात राहणार आहे. पक्ष असा बुडविल्यानंतर त्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आव आणण्यात अर्थ नाही. शरदरावांनीही त्यांच्या अनुयायांना किती सैल सोडावे? उच्चवर्णियांचा द्वेष दाखविल्याने आपण मते मिळवू शकू हा भ्रम त्यांचा, की त्यांच्या अनुयायांचा? मग ‘भांडारकर’ वर हल्ला चढव, केतकरांच्या घरावर चालून जा, दादोजी कोंडदेवांच्या पुतळ््याची विटंबना कर आणि रायगडवरची वाघ्या कुत्र्याची समाधी मोडून काढ. द्वेषाचे राजकारण फक्त वजाबाकीच करते, ते बेरजा घडवीत नाही, हे या अनुभवी राजकारण्याला कळत नसेल, तर यशवंतरावांकडून ते फारसे काही शिकले नाहीत असेच म्हणावे लागेल. मोदींची हवा होती, पण ती फारशी परिणामकारक नव्हती. ज्या ब्रह्मपुरीत व गोंदियात त्यांनी सभा घेतल्या तेथे त्यांचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले, भाजपा व सेनेची आघाडी त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच अधिक सांभाळली. काँग्रेस व राष्ट्रवादीचे बालेकिल्ले त्यांनीच साफ धुवून काढले. त्यांच्यात दिसलेली जिद्द काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत दिसली नाही. नाव आणि पैसा या बळावर निवडणूक जिंकणे संपले आहे. विजयासाठी लागणारे विधायक वातावरण तयार करणे आता गरजेचे झाले आहे. ते नेत्यांची स्वच्छ प्रतिमा, तडफदार कार्यशैली, सभ्य भाषा आणि प्रभावी लोकसंचार यांच्याच बळावर उभे करता येते. नागपुरातल्या सभांसाठी पृथ्वीराजांनी चोरट्यासारखे येणे व सभा संपताच कुणालाही न भेटता निघून जाणे यातून लोकसंग्रह होत नाही. महाराष्ट्रात याचमुळे त्यांच्याएवढा एकाकी माणूसही आज दुसरा नसावा. भाजपाने सारी शक्ती पणाला लावली, मोदींनी सभांचे मोहोळ उठविले, प्रचंड अर्थबळ वापरले व माध्यमे खिशात ठेवली हे कुणी नाकारत नाही. पण, या गोष्टी काँग्रेस व राष्ट्रवादीलाही करता येणे अशक्य नव्हते. तेवढे बळ त्यांच्याकडेही होते. मात्र, त्याच्या वापराला लागणारा जोम त्यांच्यात नव्हता. आपापले मतदारसंघ सांभाळण्यातच त्यांच्या पुढाऱ्यांची सारी शक्ती खर्ची पडली. पुढारी असे गुंतल्याने कार्यकर्ते एकाकी व दुर्लक्षित राहिले. वास्तव हे, की काँग्रेस व राष्ट्रवादीहून शिवसेनेची संघटना अधिक विस्कळीत आहे. मात्र, तिच्यातील जिद्द व लढाऊपण या दोहोंपेक्षा मोठे आहे. काँग्रेसच्या पराभवाचे दु:ख त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांत असणारच. मात्र, खरे दु:ख देशातील व राज्यातील धर्मनिरपेक्ष व निखळ लोकशाही संघटनांच्या पराभवाचे आहे आणि त्याच्या प्रायश्चित्तासाठी त्याच्या नेत्यांनी पायउतार होण्याची व नव्या दमाच्या युवकांना पुढे करण्याची आता गरज आहे. ही माणसे तसे करणार नाहीत, हे उघड आहे. कारण त्यांना संघटना व विचार याहून स्वत:विषयीची असलेली आसक्ती मोठी आहे.

Web Title: Will you take the penance of defeat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.